वर्तमानपत्रे बंद झाली तर निबंध मराठी - Vartaman Patra Band Zali Tar Marathi Nibandh
वर्तमानपत्रे बंद झाली तर निबंध मराठी
एखादया दिवशी वर्तमानपत्रे प्रकाशित झाली नाहीत , तर सर्वांना चुकल्याचुकल्या सारखे होते . घरातला प्रत्येकजण एक दुसऱ्याला विचारतो , " अरे , आज पेपर आला नाही का ? " वर्तमानपत्र मिळाले नाही, तर काहीतरी बिघडल्यासारखे होते. इतके वर्तमानपत्राचे महत्त्व आज प्रत्येकाच्या जीवनात निर्माण झाले आहे. खरे पाहता, आज चोवीस तास बातम्या देणाऱ्या दूरदर्शनच्या अनेक वाहिन्या आहेत आणि बहुतेकजण दूरचित्रवाणी पाहत असतात. नभोवाणीवरील बातम्या ऐकत असतात. तरीपण वर्तमानपत्राची ओढ नाहीशी झालेली नाही. अशी ही वर्तमानपत्रे बंद झाली तर... तर सकाळच्या चहाची लज्जत कमी होते. चहा घेतलाच नाही असे वाटते किंवा चहा पिऊच नये असे वाटू लागते.
माहीत असलेली बातमी आणि त्यावर वृत्तपत्रकाराने केलेली मल्लिनाथी स्वत: वाचावी अशी जाणकार वाचकांची इच्छा असते. वर्तमानपत्रे बातम्यांशिवाय इतरही अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवीत असतात. कोणाला नोकरी पाहिजे, कोणाला नोकर पाहिजेत हेही वर्तमानपत्रे सांगतात. वधूवरांच्या अपेक्षा वर्तमानपत्रांतून सुचवलेल्या असतात. जाहिराती हा तर वर्तमानपत्र व्यापून टाकणारा मोठा भाग. कुठे काय मिळेल, कुठे सेल लागला आहे, कोणत्या नव्या गोष्टी बाजारात आल्या आहेत यांच्या अनेक रंगीबेरंगी आकर्षक जाहिराती वृत्तपत्रांत झळकत असतात. नाटक, चित्रपट यांबद्दलची रोजची हकिकत वृत्तपत्रे देत असतात. वर्तमानपत्रे बंद झाली, तर या सर्व गोष्टी सामान्य माणसांपर्यंत कशा पोहोचणार? वर्तमानपत्रे वेळोवेळी पुरवण्या काढत असतात. त्यांत चित्रपट - नाटकांची परीक्षणे आलेली असतात.
बहुतेकजण ही परीक्षणे वाचून चित्रपट - नाटक पाहायचे की नाही, हे ठरवतात. या पुरवण्यांत साहित्याशी संबंधित अशी सदरे असतात. त्यावरून कोणते पुस्तक वाचायचे, कोणता ग्रंथ खरेदी करायचा यांबद्दल निर्णय घेता येतो. वर्तमानपत्र आपल्याला रोजचे पंचांग म्हणजे कोणती तिथी, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त यांबद्दल ज्याप्रमाणे माहिती देते, त्याप्रमाणे आपल्या राशींचे भविष्यही आपल्याला सांगते. सोन्याचांदीचे भाव, लॉटरीचे निकाल, पौंड - डॉलर यांच्या रुपयातील किमती यांबाबतच्या बातम्या वृत्तपत्र घरबसल्या देतात. वृत्तपत्रे बंद झाली तर मग अनेकांची गैरसोय होईल. समाजात नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून वादळ उठत असते. मग लोकशाही राज्यात लोकांना आपली मते मांडायची असतात. वृत्तपत्र त्यांना उत्तम व्यासपीठ देते. जागतिक क्रिकेट स्पर्धेत भारत पराभूत झाला, तेव्हा भारतीयांच्या भावना भडकून उठल्या. मग वृत्तपत्रांतून पानेच्या पाने भरून जनमानस व्यक्त होऊ लागले.
'जनमनाचा कानोसा', लोकमानस', 'वाचकांची पत्रे' ही वृत्तपत्रांतील सदरे नेहमी अगदी जिवंत आणि झणझणीत असतात. अलीकडे वृत्तपत्रांतून विदयार्थ्यांचा अभ्यासही घेतला जातो. पुढील जीवनात कोणती शाखा निवडावी, कोणता अभ्यास करावा, यांबाबतही वृत्तपत्रे मार्गदर्शन करू लागली आहेत. अशी ही वर्तमानपत्रे समाजजीवनात चैतन्य निर्माण करतात. यशस्वी समाजाच्या नाड्या त्यांच्या हातात असतात. मग ती बंद पडून कसे चालणार?
वर्तमानपत्रे बंद झाली तर निबंध मराठी - Vartaman Patra Band Zali Tar Marathi Nibandh
मराठी निबंध | LINKS |
---|---|
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
वर्तमानपत्रे बंद झाली तर निबंध मराठी - Vartaman Patra Band Zali Tar Marathi Nibandh
Tags:
मराठी निबंध लेखन