राजा भोज आणि गंगू तेली मराठी कथा - Raja bhoje ani gingu teli marathi goshat

राजा भोज आणि गंगू तेली मराठी कथा 


भोज राजा हा अतिशय गुणी आणि प्रजेचा आवडता राजा होता. विद्या आणि कला यांची त्याला आवड असल्याने त्याच्या दरबारात अनेक विद्वान पंडित, कवी व कलाकार होते. शाकुंतल नावाचं महाकाव्य लिहिणारे महाकवी कालिदासही त्याच्या दरबारी होते. एकदा काय झालं, दूरदेशातून एक विद्वान पंडित भोज राजाच्या दरबारात आला. तो राजाला म्हणाला, "राजन, तुम्ही गुणीजनांना आश्रय देता. विद्या आणि कलेची तुम्हाला खूप आवड आहे. तुमची कीर्ती ऐकून मी तुम्हाला भेटायला आलो. 

राजा म्हणाला, "फारच छान! परंतु तुम्ही कोणत्या कलेत पारंगत आहात ते कृपा करून सांगाल का?" पंडित म्हणाला, "राजन! मी एक पंडित आहे. मी असं ऐकलंय की, तुमच्या दरबारात फार मोठे विद्वान कवी कालिदास आहेत, त्यांच्याशी मला चर्चा करायची आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची जर त्यांनी बरोबर उत्तरं दिली तर मी समजेन की ते खरोखरंच विद्वान महाकवी आहेत; परंतु जर ते हरले तर त्यांच्या जागी माझी नेमणूक करावी.' पंडितजीने घातलेली अट ऐकून राजा विचारात पडला. कारण महाकवी कालिदास हे काही दिवसांकरिता बाहेरगावी गेले होते. तेव्हा राजा त्या पंडितजींना म्हणाला, "आपण काही दिवस विश्रांती घ्यावी. 
महाकवी कालिदास लवकरच येतील." तो म्हणाला, "ठीक आहे. पण आठ दिवसांपेक्षा अधिक काळ मी थांबू शकत नाही.' आठ दिवस लोटल्यानंतरही महाकवी परतले नाहीत. राजाकडे येऊन पंडित म्हणाला, “राजन, आपल्या दरबारात कालिदासांशिवाय असा एकही पंडित नाही, जो माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल?" राजाने अवंतीनगरीत दवंडी पिटवली. जो कोणी पंडितजींच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देईल त्याला मोठे बक्षीस दिले जाईल. नेहमीप्रमाणे दरबार भरला. परंतु दवंडी ऐकूनही कोणी पुढे येईना.

राजाची चिंता वाढू लागली. तेवढ्यात गंगू तेली नावाचा एक मळकट कपड घातलेला, एका डोळ्याने अधू असलेला माणूस डोक्यावरील मुंडासे सावरत गर्दीतून वाट काढत राजासमोर येऊन उभा राहिला. तो म्हणाला, "महाराज, तुम्ही चिंता करू नका. मी या पंडितजींच्या प्रश्नांची उत्तरं देणार." त्याच्याकडे पाहून राजाला काय बोलावे हेच कळेना. राजाने नाईलाजास्तव या गोष्टीला मान्यता दिली. चर्चेचा दिवस व वेळ ठरली. त्याप्रमाणे दोघेही प्रश्नोत्तरासाठी तयार झाले. चर्चेचा दिवस उजाडला.

 पंडित कोणते प्रश्न विचारतो नि गंगू तेली त्यावर काय उत्तरं देतो याची सर्वांना उत्सुकता लागली. त्यामुळे नेहमीपेक्षा दरबारात जास्त गर्दी जमली. उच्चासनावर दोघांनाही बसवले. पंडितजींनी अट घातली की, मी सर्व प्रश्न एकही शब्द न बोलता केवळ खुणेने विचारीन त्यावर उत्तरही खुणेने आले पाहिजे. गंगू तेली या गोष्टीला चटकन तयार झाला. पंडितजीने पहिला प्रश्न खुणेने विचारला. त्यावर गंगू तेलीनेही खुणेने उत्तर दिले. दुसरा प्रश्न विचारला. त्याचंही उत्तर बरोबर आलं. तिसऱ्या प्रश्नाकडे न वळता पंडितजीने आपली हार मान्य केली. पंडित म्हणाला, "माझ्या दोन्ही प्रश्नांची त्यांनी योग्य उत्तरं दिली. त्यामुळे जास्त काही विचारत नाही.

 पण एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की, एक साधारण व्यक्ती एवढी विद्वान आहे, तर प्रत्यक्ष कालिदास किती हुशार असतील? राजन, धन्य आहे तुझी!" असे गौरवपूर्ण उद्गार काढत पंडित परतीच्या तयारीला लागला. राजाने निरोप देण्यापूर्वी पंडितजीला विचारले, "पंडितजी, तुम्ही हातवारे करून कोणते प्रश्न विचारले? आणि त्यांची योग्य उत्तरे आमच्या विद्वानाने कशा प्रकारे दिली ते कृपया सांगाल काय?" पंडित म्हणाला, "राजन, ज्यावेळी मी एक बोट वर केलं, त्याचा अर्थ असा की, जगाचा पालनकर्ता एक आहे. परंतु तुमच्या विद्वान गृहस्थानं सांगितलं की, एक नाही, दोन आहेत. असं म्हणून त्यांनी तुमच्याकडे पाहिलं.

 तेव्हा मला पटलं, की जगाचा पालनकर्ता एक ईश्वर आहे, पण प्रजेचा पालनकर्ता आणखी एक आहे, तो म्हणजे राजा. कारण राजा हा सुद्धा ईश्वराचाच प्रतिनिधी असतो. म्हणून हे उत्तर अतिशय समर्पक होतं.""दुसरा प्रश्न होता पाच बोटे दाखवून मी विचारले की, पाच तत्त्वाचं कार्य कोणतं?" त्यावर उत्तर आलं की, "पाच तत्त्व एकत्र येऊन जी ताकद येते, त्या आधारे आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. आता पुढे मी आणखी काय विचारणार? खरोखरच एक साधारण दिसणारा मनुष्यही किती विद्वान आहे. 

यावरून आपण आणि आपली प्रजा खूपच गुणी आहात हे दिसून येते.” पंडित जे काही सांगत होता, त्यावर राजाचा विश्वास बसेना. पण काही का असेना गंगू तेलीमुळेच आपली अब्रू वाचली. पण गंगू तेल्याला हे खुणेने विचारलेले प्रश्न कळले कसे? आपल्याला तर बुवा काहीच समजले नाही. आपण आता गंगू तेलीलाच विचारू या, असा विचार करीत राजा दरबारात गेला. त्याने गंगू तेल्याला बोलावून घेतले. त्याचा यथोचित सत्कार केला आणि विचारले, "गंगू, तुला पंडितजीने एक बोट दाखविले तेव्हा त्याचा अर्थ कसा समजला?" "महाराज, त्यात काय अवघड?" गंगू तेली म्हणाला, "तो एक बोट दाखवून मला म्हणाला की, मी तुझा एक डोळा फोडीन.

त्यावर मी दोन बोटं दाखवून म्हटलं की, मी तुझे दोन डोळे फोडीन. तसा मग गप्प बसला. दुसऱ्यांदा त्याने मला हाताचा पंजा उगारून दाखविला. त्यावर मी म्हटलं, तू काय मला थोबाडीत देशील, मीच तुला ठोसा मारून आडवा पाडीन! आणि मग काय.. त्याने सरळ माघार घेतली. गंगू तेलीचे उत्तर ऐकून राजा आणि दरबारी पोट धरधरून हसू लागले. गंगू तेल्याला काही कळेना की हे सारे कशासाठी हसाताहेत म्हणून  मित्रांनो, गंगू तेल्याने जरी पंडितजींना चर्चेत हरवले तरी तो काही महाकवी कालिदासाची बरोबरी करु शकणार नाही. पूर्णपणे सम आल्याशिवाय आपल्याला एखादी गोष्ट कळली असे होत नाही. अपूर्ज्ञा न हे प्रगतीस बाधक ठरते.

राजा भोज आणि गंगू तेली मराठी कथा - Raja bhoje ani gingu teli marathi goshat

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post