आपुले जगणे आपुली ओळख स्वाध्याय इयत्ता नववी । Apule jagne apuli olakh swadhyay
1. खालील कोष्टक पूर्ण करा:
प्रश्न 1. खालील कोष्टक पूर्ण करा:
SOLUTION:
मानवाने करायच्या गोष्टी मानवाने टाळायच्या गोष्टी
1. दिवा होऊन जगाला उजळावे. 1. एक क्षणही कार्याविण दवडू नको.
2. पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत. 2. कुणाबाबतीत मनात अढी नको.
3. नम्र रहावे, सौम्य पहावे. 3. उगाच कुणाला खिजवू नको.
4. दुसऱ्यासाठी करुणा असावी.
2. आकृती पूर्ण करा:
प्रश्न 1. आकृती पूर्ण करा:
SOLUTION:
3. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा:
प्रश्न 1. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा:
[अ] पटकुर पसरू नको.
[आ] व्यर्थ कोरडा राहु नको.
[इ] कर्तृत्वाचे घडवी वेरूळ.
SOLUTION:
[अ] पटकुर पसरू नको: अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत. मंगलमय जीवन असावे. चिंध्या झालेले जीर्ण वस्त्र पांघरू नये. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वात केविलवाणेपणा व दीनवाणेपणा नसावा. दुसऱ्यांनी आपली कीव करावी, असे वर्णन करू नये.
[आ] व्यर्थ कोरडा राहु नको: स्वत:च्या दु:खाचे प्रदर्शन करीत रडत न राहता, हृदयात इतरांविषयी करुणा असावी. समाजातील दु:खांविषयी अंत:करणात ओलावा असावा. उगाचच कोते मन करून भावनाशून्यतेने वागू नये. म्हणजेच कोरडे राहू नये.
[इ] कर्तृत्वाचे घडवी वेरूळ: पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबादजवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली. पिढ्यान्पिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची पडल्या. आजमितीस वेरूळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे जीवन जगताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे, असे कवी म्हणत आहेत.
4. काव्यसौंदर्य:
प्रश्न [अ] ‘पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरू नको’ या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
SOLUTION:
माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात-श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे, योग्य नव्हे. म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये. मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. मन पवित्र हवे. मंगलतेची वस्त्रे घालावीत. स्वत:चे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दीनवाणे, लाचार असू नये. स्वत:च्या मनाचे मलीन, घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळींत मांडला आहे.
प्रश्न [आ] ‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको,’ या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION:
दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता असावी, हा बीजमंत्र कधी विसरू नये, अशी कवींनी या ओळीतून शिकवण दिली आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही. आरोग्य धोक्यात येत नाही. शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. गाडगेबाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत. सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा आपणांस दिला आहे. ‘स्वच्छता हा परमेश्वर आहे,’ असे सुवचन आहे. ‘शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे,’ या मूलमंत्रात स्वच्छतेची महती कवींनी सांगितली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे.
5. स्वमत:
प्रश्न [अ] स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल, ते सविस्तर लिहा.
SOLUTION:
स्वत:चे उत्तुंग कर्तृत्व हीच स्वत:ची ओळख आहे, हे , सांगताना कवींनी कवितेतून काही सुविचारांचे मार्गदर्शन केले आहे. दिवा होऊन जगाला प्रकाश दयावा. चाकूसारखी धार आपल्या है वागण्यात नसावी. नित्य वाचन, लेखन, मनन, व्यायाम करावा. एकही , क्षण कामाशिवाय वाया दवडू नये. मन पवित्र असावे. शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र ध्यानी ठेवावा.
नम्र असावे, उगाच अढी ठेवून कुणालाही खिजवू नये. उदात्त विचार बाळगावेत. लाचारी पत्करू नये. कुणाला छळू नये, वाद घालू नये. स्वसामर्थ्याने संकटाचा गोवर्धन पेलावा. दुसऱ्याविषयी मनात करुणा असावी. नवनवीन विचारांचे मार्ग अंगिकारावेत. चांगल्या मूल्यांवर श्रद्धा असावी. भेदरून न जाता, धैर्याने वागावे. मातृभूमीचे व मातीचे ऋण फेडावे. अशा प्रकारे स्वकर्तृत्वाचे वेरूळ [शिल्प] उभारावे असे मार्गदर्शक विचार कवितेत मांडले आहेत.
प्रश्न [आ] आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी, यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा.
SOLUTION:
आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आपल्या वर्तनातून आपली ओळख जगाला होते. त्यासाठी जगताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. एकही क्षण कार्याशिवाय वाया दवडू नये, कार्यरत असावे, पावित्र्याचे वास्तव्य मनात असावे. नम्रतेचे वर्णन असावे, दुसऱ्यांना खिजवून त्रास देऊ नये. उदात्त विचार मनी बाळगावेत.
शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ, हे मनी ठसवावे. वाद, भांडण करू नये. उलट दुसऱ्यांबद्दल मनात अपार करुणा असावी. उत्तम मूल्यांवर निष्ठा ठेवून संकटांचा मुकाबला करावा. न घाबरता धैर्याने व हिमतीने आयुष्य कंठावे. स्वकर्तृत्वाचे वेरूळसारखे शिल्प उभारून मातृभूमी व माती यांचे उपकार फेडावेत.
कृती 1 : [आकलन]
1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
प्रश्न 1. आकृती पूर्ण करा:
SOLUTION:
प्रश्न 2. सहसंबंध जोडा:
SOLUTION:
कृती 2 : [आकलन]
प्रश्न 1. पुढीलपैकी असत्य विधान ओळखा:
1. नव्या मार्गाने जाण्यास घाबरावे.
2. उगाचच वाद घालू नये.
3. ज्यावर श्रद्धा ते काम करावे.
4. भेकड होऊन मुळूमुळू रडू नये.
SOLUTION:
असत्य विधान : नव्या मार्गाने जाण्यास घाबरावे.
प्रश्न 2. चौकटी पूर्ण करा:
SOLUTION:
[शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे]
[जे उदात्त असते तेथे]
[वेरूळ]
[मातृभूमी] व [माती]
कृती 3 : [दोन ओळींचा सरळ अर्थ]
प्रश्न 1. नित्य घडावे वाचन, लेखन… क्षण कार्याविण दवडु नको
नित्य परवचा, व्यायामाविण झोप घ्यावया पडु नको!
SOLUTION:
माणसाने आयुष्यात वर्तन कसे करावे याविषयी उपदेश करताना कवी संदीप खरे म्हणतात की मन सुसंस्कृत करण्यासाठी नेहमी वाचन व लेखन करावे. एक क्षणही कार्य केल्याशिवाय राहू नये. नित्य नेमाने परवचा म्हणणे, व्यायाम करणे यांना डावलून झोपा काढू नयेत.
1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
प्रश्न 1. कविता – आपुले जगणे… आपुली ओळख!
SOLUTION:
आपुले जगणे… आपुली ओळख!
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संदीप खरे.
2. कवितेचा विषय → तरुण पिढीने कसे वर्तन ठेवावे व कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात यांचे मार्गदर्शन या कवितेत केले आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →
- दिवा = दीप
- कार्य = काम
- झोप = निद्रा
- पावित्र्य = मांगल्य
- नयन = डोळे
- अश्रू = आसू
- करुणा = दया
- पथ = मार्ग
- काटा = कंटक
- हिंमत = धैर्य.
4. कवितेतून मिळणारा संदेश → आपले जगणे सत्यम्, शिवम्, सुंदरम् करावे. लेखन-वाचनाने ज्ञान वाढवावे. माणुसकी जपावी. कुणाला कुत्सित बोलू नये, मत्सर करू नये. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.
5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → या कवितेत ‘फटका’ हा पूर्वापार चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एक संथ, लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.
6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → जीवनात कसे वागावे व कसे वागू नये, याचा परिपाठ दिला आहे.
7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ: ‘तुडवित राने खुशाल जावे, नव्या पथाला भिउ नको ज्यावर श्रद्धा प्राणाआतुन ते केल्याविण राहु नको!
→ माणसाने कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात -नवनवीन ज्ञानाची राने आनंदाने तुडवीत जावीत. नवीन मार्गाने चालण्यास म्हणजे नवीन विचार अंगिकारण्यास भीती बाळगू नये. ज्या तत्त्वांवर निष्ठा असेल, ती कार्ये केल्याशिवाय राहू नये.
8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → या कवितेत तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन केले आहे. आपले जगणे कसे मूल्यवान व अर्थपूर्ण व्हावे, याचा नेमक्या शब्दांत व थेट उपदेश केला आहे. लाचारीचे जिणे नको; तर स्वाभिमानाने जगणे कसे असावे, याचा पाठ या कवितेत दिला आहे. आधुनिक वैफल्यग्रस्ततेत आशादायी व आदर्श जीवनाचे चित्रण या कवितेत केले असल्यामुळे ही कविता मला भावली.
1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:
प्रश्न 1. ‘कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकू नको!’
SOLUTION:
आशयसौंदर्य : तरुण पिढीने आपली वागणूक कशी ठेवावी व कोणत्या सकारात्मक गोष्टी कराव्यात नि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे डोळस मार्गदर्शन कवी संदीप खरे यांनी ‘आपुले जगणे… आपुली ओळख!’ या कवितेत केले आहे. आपले जगणे मूल्यवान असावे. माणुसकी जपावी. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याची शिकवण ही कविता देते.
काव्यसौंदर्य: कवितेत नवीन तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन करताना कवी म्हणतात-आपले जीवन मूल्यवान व अर्थपूर्ण करून स्वाभिमानाने जगावे. उपरोक्त ओळीत त्यांनी वेरूळच्या लेण्याचा संदर्भ दिला आहे. वेरूळचे लेणे हे महाराष्ट्राचे भूषणावह शिल्प आहे. अशा प्रकारे आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरूळची लेणी घडवावी. उत्तुंग कर्तृत्व करावे. कर्तव्याला कधी नाकारू नये. या मातृभूमीचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्या उपकारांची परतफेड करायला चुकू नये.
भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘फटका’ या पूर्वापर चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एक संथ, लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.
[अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती:
भाषाभ्यास:
1. समास:
प्रश्न 1. विग्रहावरून समास लिहा:
SOLUTION:
- ऊन आणि पाऊस → इतरेतर द्वंद्व
- सात स्वर्गांचा समूह → द्विगू
- गुरे, वासरे वगैरे → समाहार वंद्व
- महान असे ऋषी → कर्मधारय
- न्याय किंवा अन्याय → वैकल्पिक वंद्व
[आ] भाषिक घटकांवर आधारित कृती:
1. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1.
समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा:
SOLUTION:
दिवा = दीप
नयन = डोळे
भेकड = भित्रा
करुणा = दया.
प्रश्न 2. विरुद्धार्थी शब्द लिहा:
- भेकड
- व्यर्थ
- नम्र
- श्रेष्ठ.
SOLUTION:
- भेकड × धीट
- व्यर्थ × सार्थ
- नम्र × उद्धट
- श्रेष्ठ × कनिष्ठ.
प्रश्न 3. शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा:
- दररोज प्रसिद्ध होणारे
- आठवड्याने प्रसिद्ध होणारे
- महिन्याने प्रसिद्ध होणारे
- वर्षाने प्रसिद्ध होणारे
SOLUTION:
- दैनिक
- साप्ताहिक
- मासिक
- वार्षिक
प्रश्न 4. एकवचन लिहा:
- वस्त्रे
- वाटा
- मंत्र
- राने.
SOLUTION:
- वस्त्र
- वाट
- मंत्र
- रान.
2. लेखननियम:
प्रश्न 1. अचूक शब्द ओळखा:
SOLUTION:
1. कर्तृत्व, कर्तृत्त्व, करुत्व, कतृत्व. – कर्तृत्व
2. गोर्वधन, गेवर्धन, गोवधर्न, गोवर्धन. – गोवर्धन
3. पारिभाषिक शब्द:
प्रश्न 1. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी अर्थ लिहा:
1. General Meeting
2. Bonafide Certificate.
SOLUTION:
1. सर्वसाधारण सभा
2. वास्तविकता प्रमाणपत्र.
आपुले जगणे…आपुली ओळख! Summary in Marathi
कवितेचा आशय:
जीवनामध्ये कसे वागावे व कसे वागू नये, याचा आदर्शपाठ या कवितेत कवीने सोप्या शब्दांत मांडला आहे. उत्तुंग कर्तृत्व करावे व मातीचे ऋण फेडावे, हा संदेश दिला आहे.
शब्दार्थ:
- उपरे – परके, खोटे, लटके.
- नित्य – नेहमी, सतत.
- कार्याविण – कामाशिवाय.
- दवडू नको – वाया घालवू नको.
- पावित्र्य – मांगल्य, पवित्रता.
- वस्त्रे-कपडे.
- पटकूर – चिंध्या झालेले कापड.
- आदिमंत्र – मूलतत्त्व.
- नम्र – शालीन, लीन.
- सौम्य – फिकट, साधे.
- उगा – उगाच, बळेच, मुद्दाम.
- अढी – डंख, हेवा, मत्सर, अटकळ.
- खिजवणे – चिडवणे, त्रास देणे.
- तयावर – त्याच्यावर.
- फुकाची – फुकटची, उगीच.
- लोचट – हावरेपणा.
- बुळचट – बावळट, मिळमिळीत.
- उदात्त – भव्य, दिव्य.
- ताठर – ताठ, गर्विष्ठ.
- माथा – मस्तक, शीर, डोके.
- पेल – उचलून धर, धरून ठेव, झेल.
- वाद – भांडण.
- नयनी – डोळ्यांत.
- दुसऱ्यास्तव – इतरांसाठी.
- करुणा – दया.
- व्यर्थ – निरर्थक, फुकट.
- पथाला – रस्त्याला, मार्गाला.
- श्रद्धा – निष्ठा, विश्वास.
- भेकड – भित्रा.
- गुळमुळ – गुळमुळीत.
- मातेसह – आईसकट [मातृभूमी].
- देणे – ऋण, कर्ज.
टिपा:
1. परवचा – पाढे पाठ करणे.
2. गोवर्धन – गोकुळातील एक पर्वत. अतिवृष्टीपासून लोकांना वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी हा पर्वत एका करंगळीवर उचलून धरला, अशी आख्यायिका आहे.
3. कंस – श्रीकृष्णाचा मामा. याने श्रीकृष्णाच्या आईवडिलांना [देवकी-वसुदेव] कैदेत ठेवले होते.
4. वेरूळ – डोंगरात खोदलेली लेणी. [औरंगाबाद]
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:
अढी नसणे – [कुणाबद्दल मनात] डंख नसणे.
कडी करणे – वरचढ ठरणे.
हांजी हांजी करणे – लाचारी पत्करणे.
धमकावणे – धमकी देणे.
भेदरणे – घाबरणे.
मातीचे देणे फेडणे – मातृभूमीचे उपकार फेडणे.
कवितेचा भावार्थ:
माणसाने आयुष्यात कसे वागावे, हे सांगताना कवी म्हणतात – आपले जीवन हीच आपली ओळख असते. दुसऱ्यांच्या गुणांची नक्कल करून आयुष्य अर्धवट जगू नये. दिवा होऊन जगाला प्रकाश दयावा. चाकू बनून कुणाचेही म्हणणे कापू नको. [दुष्टपणा करू नये, क्रूर होऊ नये.] नेहमी वाचन-लेखन करावे. त्याने मन सुसंस्कृत होते. कामाशिवाय एकही क्षण वाया दवडू नको. आळशीपणा करू नको. नित्यनेमाने परवचा म्हणणे, व्यायाम करणे, यांशिवाय उगाच झोप काढू नको.
पवित्रतेची वस्त्रे अंगावर नेस. स्वत:चे जगणे फाटलेले वस्त्र होऊ देऊ नको. मनात मांगल्य असावे, उथळ बडेजावापेक्षा, कचकड्या शोभेपेक्षा स्वच्छता मोठी असते, हा मूलमंत्र कधीही विसरू नको. [साधी राहणी, पवित्र विचार अंगिकारावा, उगाच बेगडी फुशारकी करू नये.] नम्रपणा असावा. शांत वृत्तीने पाहावे. उगाचच मनात दुसऱ्याबद्दल अढी ठेवू नये. दुसऱ्याला चिडवण्यासाठी उगाचच वरचढपणा करू नये.
हांजी हांजी करून फुकटची लाचारी करू नये. असा लोचटपणा व बुळचटपणा घातक असतो. पण जर एखादे भव्य-दिव्य काही कार्य दिसले, तर त्याबाबत ताठरता, दुरभिमान मुळीच बाळगू नको. तुझ्या सामर्थ्याने तू गोवर्धन पेल. संकटे झेल. कंसासारखे इतरांना छळू नको. उगाचच वाद, भांडणे करू नयेत, परंतु कुणी धमकी दिली तर पळू नये. निडरपणे बोलावे. स्वार्थीपणे स्वत:च्या दु:खाने डोळ्यांत आसवे आणू नको. दुसऱ्यासाठी मनात करुणा, दया असावी. परोपकार करावा. मनात E मायेचा ओलावा असावा. मन उगाचच कोरडे, भावनाशून्य ठेवू नकोस.
आनंदाने नवनवीन क्षेत्रांतील ज्ञान मिळवावे. राने तुडवावीत. नवीन मार्गावर चालण्यास, नवीन विचारांना अंगिकारण्यास घाबरू नये. अंतर्मनातून ज्या तत्त्वांवर निष्ठा असेल, ते कार्य केल्याशिवाय राहू नये. [जिथे इच्छा तिथे मार्ग] मार्गात काटेही [संकटे] असतात पण त्यांना भिऊन राहू नको, डगमगू नको. जो धैर्य दाखवतो, त्याची जगात किंमत राहते. जग त्याला नावाजते. भेकडपणा, गुळमुळीतपणा, पळपुटेपणा धरून मुळूमुळू रडत बसू नये. आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरुळाची लेणी घडव. उत्तुंग अकल्पित कर्तृत्व कर. कर्तव्याला नाकारू नको. या मातृभूमीचे ऋण तुझ्यावर आहे. या मातीचे उपकार फेडायला चुकू नको.
आपुले जगणे आपुली ओळख स्वाध्याय इयत्ता नववी । Apule jagne apuli olakh swadhyay
संदीप खरे(१९७३) : प्रसिद्ध कवी. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’, ‘अग्गोबाईऽऽ
ढग्गोबाईऽऽ’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध. स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. हिंदी व मराठी
चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन. शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित.
दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये, याविषयीचे भाष्य कवीने सोप्या शब्दांत कवितेतून व्यक्त केले
आहे. प्रस्तुत कविता ‘अग्गोबाईऽऽ ढग्गोबाईऽऽ’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
आपुले जगणे आपुली ओळख स्वाध्याय इयत्ता नववी । Apule jagne apuli olakh swadhyay
आपुले जगणे... आपुली ओळख! उपरे, अर्धे जोडु नको
दिवा होऊनि उजळ जगाला... चाकू होऊन कापु नको!
नित्य घडावे वाचन, लेखन... क्षण कार्याविण दवडु नको
नित्य परवचा, व्यायामाविण झोप घ्यावया पडु नको!
पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको
शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको!
नम्र रहावे, सौम्य पहावे; उगा कुणास्तव अढी नको
उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको!
नको फुकाची ‘हांजी हांजी’... लोचट, बुळचट काहि नको
परंतु दिसता उदात्त काही; ताठर माथा मुळि नको!
पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळु नको
नको उगाचच वाद परंतु कुणि धमकवता पळु नको!
अपुल्या अपुल्या दु:खासाठी नयनी अश्रु ठेवु नको
पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा; व्यर्थ कोरडा राहु नको!
तुडवित राने खुशाल जावे, नव्या पथाला भिउ नको
ज्यावर श्रद्धा प्राणाआतुन ते केल्याविण राहु नको!
जेथे वाटा, तेथे काटा! उगा भेदरुन अडु नको
करता हिंमत, जगात किंमत ! भेकड, गुळमुळ रडु नको!
कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको
मातेसह मातिचे देणे फेडायाला चुकु नको!
आपुले जगणे आपुली ओळख स्वाध्याय इयत्ता नववी । Apule jagne apuli olakh swadhyay
- Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख!
- Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
- Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! [कविता]
- 9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 20 आपुले जगणे…आपुली ओळख! Textbook Questions and Answers
- आपुले जगणे आपुली ओळख कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
- आपुले जगणे आपुली ओळख कविता
- आपुले जगणे आपुली ओळख स्वाध्याय
- आपुले जगणे आपुली ओळख कविता स्वाध्याय
Please give download link
ReplyDeleteHo Nakki
Delete