बिग-५ च्या सहवासात स्वाध्याय | Swadhyay big 5 chya sahavasat

बिग-५ च्या सहवासात स्वाध्याय | Swadhyay big 5 chya sahavasat|  Maharashtra State Board 9th Marathi Solution 

बिग-५ च्या सहवासात स्वाध्याय | Swadhyay big 5 chya sahavasat

1. केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:

प्रश्न 1. केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:
गेम ड्राइव्ह
SOLUTION:
जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे ‘गेम ड्राइव्ह’ करणे व जंगलातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे हे ‘थ्रिल’ असते. केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी चार-पाच तास ‘गेम ड्राइव्ह’ करण्याचा कार्यक्रम लेखकांनी आखला होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटाडोर गाड्या व फोरव्हीलर्स उपलब्ध होत्या. जंगलात फिरताना मोटारीचे छप्पर उघडण्यात येते.

त्यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसोक्त काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. हेतू हा की वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होतो. शिवाय कुठे एखादे दुर्मीळ जनावर दिसले, की तिथे पोहोचा, अशा प्रकारच्या सूचनाही देता येतात.

2. टिपा लिहा:

प्रश्न 1. केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका.
उत्तर : पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबत सरकारने काही नियम केले आहेत. मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. एखादा दुर्मीळ प्राणी दिसला, तरच तात्पुरते झुडपात शिरावे, पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.

जनावरांशी बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खादय देऊ नये. सिंह, गेंडा, लेपर्ड-चित्ता यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त मोटारींनी थांबू नये. जनावरांचा पाठलाग करू नये. त्यांना त्रास देऊ नये. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्कबाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील रेंजर्सना दिले आहेत.

प्रश्न 2. ‘बिग 5’चे थोडक्यात वर्णन.
SOLUTION:
सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे. तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना ‘बिग 5’ असे म्हणतात. सिंहाचे सुमारे तीस जणांचे कुटुंब असते. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. तो क्वचित शिकार करतो. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस होय. लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.

लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. तो सावजाला ओढत झाडावर नेतो. त्याचे आयुष्य वीस वर्षे असते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे. चित्ता हा सर्वांत अतिचपळ प्राणी ताशी 100 किमी वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो. शिकार खायची नसेल, तर ती पालापाचोळचाने झाबून ठवतो.

3. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION:
लेखक नकुरू ते मसाईमारा असा मोटारीने प्रवास करीत होते. दुपारचे जेवण आटोपून ते मारा सरिना लॉजकडे जात होते. इतक्यात फरीदने गाडी कमरेएवढ्या उंच गवतात घुसवली. पाहतात तो काय, गवतात वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते. सारे कुटुंब समोर आले. दोन-तीन सिंहिणी नि त्यांची दहा बाळे. शेजारी एक म्हैस मरून पडली होती. चारपाच बछडे व सिंहिणी त्यावर ताव मारत होत्या.

खाऊन झाल्यामुळे सिंहराज तृप्तीने विसावले होते. एक सिंहीण सिंहाजवळ आली आणि ‘मी पाणी पिऊन येते, तू जरा बछड्यांना सांभाळ’ सिंहाला सांगून निघून गेली, असा जणू त्यांचा संवाद झाला असावा, असे लेखकांना वाटले. सर्व सिंह कुटुंबीय मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त पहुडले होते. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळत होता. त्यावर सिंहाने पंजा उगारून जणू ‘त्रास देऊ नकोस’ असे त्याला बजावले असावे. हा सगळा चित्तथरारक सोहळा ‘डिस्कव्हरी चॅनेल’वर पाहावा, तसा लेखकांच्या कुटुंबीयांनी अनुभवला.

प्रवासवर्णन लिहूया:

प्रवासवर्णन म्हणजे एखादया स्थळाला भेट देऊन आल्यानंतर त्या ठिकाणचे घेतलेले अनुभव व त्या ठिकाणी पाहिलेल्या स्थळांचे बारकाव्यांसह निरीक्षण शब्दबद्ध करणे होय.

प्रश्न 1. प्रवासवर्णन कसे लिहावे?
प्रवास वर्णन लिहिताना त्यात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा.
1. प्रवासाचे ठिकाण: ठरवलेल्या ठिकाणची भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्ट्ये, तेथील हवामान स्थिती, नियोजित ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग या सगळ्याच्या पूर्वतयारीविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे.

2. नेमके काय पाहिले: जिथे भेट देणार तिथले लोकजीवन, संस्कृती, वेशभूषा, बोलीभाषा खाद्यपदार्थ आणि अर्थातच निसर्ग, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व इत्यादी.

3. सूक्ष्म निरीक्षण: प्रवास करताना निरीक्षणातून लक्षात आलेले छोटे बारकावे, तपशिलांची नोंद करून ठेवावी. लेख लिहिताना अशी काही निरीक्षणे नोंदवल्यास आपल्या लिखाणाला वेगळे परिमाण मिळते.

4. सहज संवादात्मक लेखन: प्रवासवर्णनाची शैली ही उत्कंठावर्धक तरीही सहज असावी. लिखाणातला ओघ कायम राहील याचे भान ठेवावे.

5. संस्मरणीय प्रसंग: प्रवासाचा आनंद घेता-घेता घडणाऱ्या अनपेक्षित घटना, प्रसंग, क्वचितप्रसंगी आलेल्या अडचणी, त्यांवर केलेली मात याचा उल्लेख प्रवासवर्णन लिहिताना जरूर करावा. प्रवासवर्णन म्हणजे प्रवासाच्या तयारीपासून सुरू होणारा हा सिलसिला प्रवास संपून, मूळ जागी येऊन स्वस्थता मिळेपर्यंत अव्याहतपणे आपसूक सुरूच असतो.

प्रवासातील वेगळेपण, निरनिराळ्या व्यक्ती, आलेले हटके अनुभव, काही अद्भुत गोष्टी या सर्वांची एक सुंदर अनुभूती तयार होते. सखोल निरीक्षणातून ती उठावदार बनते. त्यातून प्रवासवर्णन हा एक बोलका, अक्षरबद्ध नजारा तयार होतो. त्यामुळेच निरीक्षणे, माहिती, वैशिष्ट्ये, आलेल्या अडचणी आणि विलक्षण अनुभव तसेच केलेली धमाल, या सर्व गोष्टी सहजपणे लिहिल्या की प्रवासवर्णन तयार होते.

‘बिग 5’ च्या सहवासात Summary in Marathi

पाठाचा परिचय:
या पाठात लेखकांनी आफ्रिकेतील ‘बिग 5’ प्राण्यांची माहिती त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसह मांडली आहे. तसेच केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयी अनोखा तपशील दिला आहे.

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. जंगलांचा फेरफटका मारणे व त्यातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे, हे ‘थ्रिल’ असते.

2. आफ्रिकेतील जंगलांचे स्वरूप दोन प्रकारचे आहे: [1] काही ठिकाणी उंच, घनदाट झाडांचे जंगल. [2] काही ठिकाणी झुडपांचे व सुकलेल्या गवताचे जंगल. घनदाट झाडीपेक्षा झुडपांत किंवा गवतात जनावरांचा शोध घेणे सोपे असते. जंगलात फिरताना ‘चिकाटी’ व ‘नशीब’ या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

3. केनिया सफारीत रोज सकाळ-संध्याकाळ चार-पाच तासांचा ‘गेम ड्राइव्ह’ [जंगलातील भटकंती] करण्याचा कार्यक्रम होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटडोर गाड्या व फोरव्हीलर्सची व्यवस्था असते. जंगलात फिरताना या मोटारीचे छप्पर उघडण्यात येते. त्यामुळे जनावरांना जवळून पाहता येते व फोटो काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. त्यामुळे वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो; आणीबाणीच्या प्रसंगी उपयोग होतो व जनावरांच्या ठिकाणांच्या सूचना देता येतात.

4. वासोनैरो नदीच्या काठी वसलेले ‘सरोवा साभा लॉज’ची रचना आकर्षक आहे. जणू झाडांवर उभारलेली पंचतारांकित झोपडी. वासोनैरो नदीची वैशिष्ट्ये:
 • तिच्यात जवळजवळ सहा फूट लांबीच्या अजस्र शेकडो मगरी आहेत.
 • दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासींची वस्ती आहे.
 • आदिवासी मगरींच्या नजरा चुकवून धाडसाने नदी ओलांडतात.
 • कधी कधी सुस्त पडलेली मगर चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याला तोंडात पकडते.

5. अंबरडट्स नॅशनल पार्क हे घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. येथील आर्क लॉजची वैशिष्ट्ये:
 • संपूर्ण लाकडांच्या खोल्या व सभोवती पाण्याचे मोठे डबके.
 • डबक्याजवळ प्रचंड दलदलीत खनिजयुक्त मीठ मिसळल्यामुळे जनावरे आकर्षित होतात व पाणी पिण्यासाठी येतात.
 • लॉजच्या बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरी असल्यामुळे तिथून जनावरांचे दर्शन होते व फोटो काढता येतात.
 • रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाईट.
 • गॅलरीतला बार चोवीस तास उघडा असतो.
 • दुर्मीळ जनावरे आली की प्रवाशांना उठवण्यासाठी बेलची व्यवस्था.

6. नकुरू तलाव व पार्क हा आफ्रिकेतील महत्त्वाच्या व दुर्मीळ पक्ष्यांचा परिसर आहे. नकुरू तलाव व पार्कची वैशिष्ट्ये:
 • गुलाबी रंगाच्या दीड ते दोन लाख फ्लेमिंगोंचे वास्तव्य.
 • दुर्बिणीतून फ्लेमिंगोंच्या हालचाली, तुरुतुरु पळणे, त्यांची परेड प्रेक्षणीय असते.
 • चव्वेचाळीस चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा नकुरू तलाव खाऱ्या पाण्याचा आहे.
 • फ्लेमिंगो मूळचे इथले. याच्या निळ्याशार पाण्यात फ्लेमिंगो अन्न शोधतात.
 • पक्षिप्रेमींच्या दृष्टीने हा पार्क मोठा खजिनाच आहे.
 • काळे व पांढरे मिळून जवळजवळ 80 गेंडे या पार्कमध्ये आहेत.

7. ‘बिग 5’ म्हणजे आकाराने मोठे असलेले पाच प्राणी :
 • सिंह
 • लेपर्ड-चित्ता
 • गेंडा
 • हत्ती
 • जंगली म्हैस.
 • या पाचही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणे अत्यंत कठीण असते.

8.  नकुरू तलाव ते मसाईमारा हा प्रवास लेखकांनी मोटारीने केला; कारण गवतात दुर्मीळ प्राणी दिसण्याची शक्यता अधिक होती. सरिना लॉजमध्ये जायच्या आधी लेखक व त्यांच्या साथीदारांना वनराज सिंह व त्याचे कुटुंब यांचे दर्शन घडले.

9. सिंहाची वैशिष्ट्ये:
 • दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. बहुतेक शिकार सिंहिणीच करतात.
 • सिंहीण अडचणीत असली, तरच सिंह धावून जातो. तो शिकार क्वचितच करतो.
 • सिंह ताशी 60 किमी वेगाने पळतो. पण त्याचा स्टॅमिना खूप कमी. म्हणून 200 मीच्या टप्प्यात असलेलेच सावज पकडतो.
 • सुमारे 30 जणांचे कुटुंब असते.
 • सिंहाचे आयुष्य 15 ते 20 वर्षे असते.
 • सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. तरस त्याची पिल्ले पळवतात.
 • नैसर्गिकरीत्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा मिळत नाही; कारण तरस त्यांना खातात.
 • सिंहाचा एकमेव शत्रू माणूस आहे.

10. लेपर्डची वैशिष्ट्ये:
 • लेपर्डच्या मानेत जबरदस्त ताकद असते. मारलेले जनावर तो ओढत झाडावर चढवू शकतो.
 • लेपर्डची शेपटी लांब असते. टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.
 • लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो.
 • त्याची दृष्टी व श्रवणयंत्रे खूप तीक्ष्ण असतात.
 • त्याचे आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते.
 • लेपर्डच्या कातड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जबरदस्त मागणी आहे.

11. चित्ता व त्याची वैशिष्ट्ये:
 • जगातील सर्वांत चपळ प्राणी. ताशी 100 किमी वेगाने पळतो.
 • त्याचे शरीर गोंडस, लवचीक, छाती भरदार व पाय लांब असतात.
 • शिकार करायची पद्धत वेगळी आहे. सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला चढवतो नि गुदमरून टाकून त्याला मारतो.
 • शिकार खायची नसेल तर पालापाचोळ्याने झाकून ठेवतो; कारण तरस आयती मिळालेली शिकार खाऊन टाकतात.

12. केनियाची अर्थव्यवस्था प्रमुख चार प्रकारच्या उत्पन्नांवर आधारित आहे:
 • पर्यटन
 • कॉफी
 • चहा
 • फुले [गुलाब]. यात पर्यटन महत्त्वाचे आहे.
 • केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत सरकारची भूमिका: पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना पाळावयाचे नियम:
 • मोटारीतून फिरताना शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. अगदीच दुर्मीळ प्राणी दिसला, तर झुडपात शिरावे; पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.
 • जनावरांच्या जवळ बोलू नये; टाळ्या वाजवू नयेत, खायला घालू नये.
 • बिग 5’च्या सभोवताली पाचपेक्षा जास्त वाहनांनी थांबू नये.
 • जनावरांचा पाठलाग करू नये व त्यांना त्रास देऊ नये.
 • नियम मोडणाऱ्यांना दंड करून त्वरित पार्कबाहेर काढण्याचे अधिकार सरकारने रेंजर्सना दिले आहेत.

बिग-५ च्या सहवासात स्वाध्याय | Swadhyay big 5 chya sahavasat|  Maharashtra State Board 9th Marathi Solution 

जयप्रकाश प्रधान (१९५१) : प्रसिद्ध लेखक. ‘ऑफबीट भटकंती’ (भाग १), ‘ऑफबीट भटकंती’ (भाग २), ‘ऑफबीट भटकंती’ (भाग ३), ‘अनोखी सफर’, ‘बातमी मागची बातमी’ (बातम्या मिळविण्यामागचं रंजक नाट्य) इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. ऑफबीट भटकंती यांवर त्यांचे दृकश्राव्य कार्यक्रमही सादर होतात. आफ्रिकेतील ‘बिग ५’ प्राण्यांची विविध वैशिष्ट्ये लेखकाने पाठातून व्यक्त केली आहेत. केनयाच्या अर्थव्यवस्थेविषयीची पाठात आलेली माहिती अत्यंत रंजक आहे. प्रस्तुत पाठ हा ‘ऑफबीट भटकंती’ भाग १ या पुस्तकांतून घेतला आहे.

बिग-५ च्या सहवासात स्वाध्याय | Swadhyay big 5 chya sahavasat|  Maharashtra State Board 9th Marathi Solution 

 जंगलांचा फेरफटका मारणं, त्यातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणं, त्यांची माहिती मिळवणं यात एक निराळंच ‘थ्रिल’ असतं. काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ‘क्रुगर नॅशनल पार्क’मधील तीन दिवसांच्या मुक्कामात याचा अनुभव घेतला होता. त्यामुळेच या वेळेस केनया व झिंबाब्वे इथल्या विविध पार्क्स (इथे जंगलांना पार्क म्हणतात) मध्ये मनसोक्त फिरायचे, ‘बिग ५’ प्राण्यांना जास्तीत जास्त जवळून पाहायचं यासाठी जवळजवळ बारा-तेरा दिवसांची सहल आयोजित करून घेतली. 

त्यामुळे आम्हांला ‘जंगल लाइफ’ खूप जवळून पाहता व अनुभवता आलं. जंगल म्हटलं म्हणजे आपल्याकडचं जे चित्र समोर येतं, ते म्हणजे घनदाट झाडी व त्यात लपलेली जनावरं; पण आफ्रिकेत जंगलांचं स्वरूप निरनिराळं आहे. काही ठिकाणी उंच, घनदाट झाडांचं जंगल आहे, तर बऱ्याच ठिकाणी झुडपांचं व सुकलेल्या गवतांचं. ही झुडपं किंवा गवतही कमरेपेक्षा जास्त उंचीचं असू शकतं. पण घनदाट झाडीपेक्षा या झुडपांत किंवा गवतात जनावरांचा शोध घेणं त्यामानाने सोपं जातं. अर्थात जंगलांत फिरताना ‘चिकाटी’ आणि ‘नशीब’ या दोन बाबी फार महत्त्वाच्या असतात. चार-चार दिवस भटकंती करूनसुद्धा दुर्मीळ जनावरं दृष्टीसही पडत नाहीत; पण एखादा दिवस असा उजाडतो, की सिंह, लेपर्ड, चित्ता, पांढरा गेंडा या सर्वांचंच अगदी जवळून दर्शन होतं. 

त्यांच्या बारीकसारीक हालचाली पाहता येतात. कॅमेऱ्यात टिपता येतात. जणू साऱ्या श्रमाचं चीज होतं. तो क्षण अक्षरश: अत्यानंदाचा असतो. केनयाच्या नैरोबी विमानतळावर उतरल्यानंतर ‘आफ्रिकन क्वेस्टर’ कंपनीच्या प्रतिनिधीनं ‘जँबो’ (म्हणजे हॅलो) म्हणत आमचं स्वागत केलं. आम्हीही त्याला ‘मसुरी’ (फाइन) असं प्रत्युत्तर दिलं. या सफरीत आम्ही माउंट केनया, सांबारू, ॲबरडटस्, लेक नकुरू व मसाईमारा इथल्या पार्कमध्येफिरणार होतो. पहिला मुक्काम होता माउंट सफारी क्लबमध्ये. नयनरम्य परिसर व माउंट केनयाच्या उतारावर तो असून, ५, १९९ मीटर्स उंचीवरील माउंट केनयाचं शिखर इथून दिसतं. ते शिखर सर करणं ही सर्वच गिर्यारोहकांची इच्छा असते. ग्लेशिअर्स, रानटी हत्ती, म्हशी यांचे अडथळे पार करून त्यात यशस्वीहोणारे धाडसी पर्यटकही मोठ्या प्रमाणात आढळून येतात. केनया सफारीत रोज सकाळ - संध्याकाळ प्रत्येकी सुमारे चार-पाच तासांचा गेम ड्राइव्ह (जंगलातील भटकंती) करण्याचा कार्यक्रम होता.

 संपूर्णप्रवासासाठी इथे चांगल्या मजबूत मॅटेडोर गाड्या उपलब्ध होत्या. थोडे जास्त पैसे मोजले तर फोरव्हीलर्सचीही व्यवस्था होती. जंगलातील खराब व अरुंद रस्त्यांवर त्यामुळे प्रवास बराच सुकर होतो. जंगलांत फिरताना या मोटारीचं छप्पर उघडण्यात येतं. त्या छपरातून जनावरांना अगदी जवळून पाहून त्यांचे मनसोक्त फोटोही काढता येतात. तसंच या प्रत्येक मोटारीत एक वायरलेस सेट असतो. त्यामुळे जंगलात फिरणाऱ्या सर्व वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी तर त्याचा उपयोग होतोच पण कुठे काय जनावरं आहेत, तिथे लगेच जा - अशा प्रकारच्या सूचनाही एकमेकांना देता येतात. माऊंट केनयावरून आम्ही वासोनैरो नदीच्या किनारी वसलेल्या ‘सरोवा साभा लॉज’मध्ये पोचलो. 

या वासोनैरो नदीला दोन महिन्यांपूर्वी महापूर आला होता. त्यात अनेक लॉजेस अक्षरश: वाहून गेली; पण त्यातून हे सरोवा लॉज बचावलं. या लॉजची रचना मोठी आकर्षक वाटली. जणू झाडावर उभारलेली पंचतारांकित झोपडी. या लॉजच्या समोरून जी वासोनैरो नदी वाहते तिचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शेकडो मगरी. पुराच्या वेळेस या मगरी चिखलात लपून बसल्या आणि पाणी ओसरल्यानंतर परत बाहेर आल्या. किनाऱ्याच्या बाजूला निदान सहा फूट लांबीच्या अनेक अजस्र मगरी पडलेल्या दिसून येतात. इथे दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासींची वस्ती आहे.

 ते आदिवासी या मगरींची नजर चुकवून किनाऱ्याच्या कडेकडेने नदी ओलांडण्याचे धाडस पत्करतात; पण कधीकधी मोठा बाका प्रसंग उद्भवतो. सुस्त वाटणारी मगर एकदम चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याला तोंडात पकडते. असा भयानक प्रसंग वर्षातून एखादं वेळेस दिसतो, असं तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितलं. समुद्रसपाटीपासून सुमारे सात हजार फूट उंचावर असलेला व ७६७ चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा ‘ॲबरडट्स नॅशनल पार्क’ हा घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध.त्यामुळे तिथे मोठ्या जनावरांचं दर्शन तसं दुर्मीळ आहे. यासाठी इथून थोड्या उंचावर जंगलात आर्क लॉज उभारण्यात आलं आहे. तिथे संपूर्ण लाकडाच्या खोल्या असून, त्याच्या सभोवताली पाण्याचं मोठं डबकं आहे.

 तिथे अनेक जनावरं पाणी पिण्यासाठी येतात, तसेच त्याच्या जवळ प्रचंड दलदल असून त्यात निराळ्या प्रकारचं खनिजयुक्त मीठ मोठ्या प्रमाणात मिसळण्यात येतं. ते जनावरांना आकर्षित करायला उपयुक्त ठरतं. या लॉजला बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरीज असून , तिथून जनावरांचं दर्शन होतं व फोटोही काढता येतात. पर्यटकांसाठी इथे आणखी एक चांगली सोय करण्यात आली आहे. रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाइट असतात. गॅलरीतला बार चोवीस तास उघडा असतो; पण तुम्ही तुमच्या खोलीत झोपला आहात व दुर्मीळ जनावर पाणी पिण्यासाठी आलं तर तुम्हांला उठवण्यासाठी बेलची व्यवस्था करण्यात आली आहे. एकदा बेल वाजली तर हत्ती आले आहेत, दोन वेळा वाजली तर ऱ्हायनो, तीनवेळा लेपर्ड व चार वेळा बेल वाजली तर काहीतरी आगळं-वेगळं दृश्य आहे असं समजायचं. 

मात्र या डबक्यात एप्रिल-मे महिन्यांत केवळ एकदाच लेपर्ड आल्याची नोंद होती. हत्ती, जंगली म्हशी, हरणे आदींचा संचार मात्र मुक्तपणे होता. हत्ती व दुर्मीळ गेंड्यांचा वावर गॅलरीतून मस्त पाहता आला. अर्थात एप्रिल-मे महिन्यात इथे पाऊस चांगला पडतो. ठिकठिकाणी पाणी साचतं, झाडं हिरवीगार होतात. त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी, खाद्यासाठी फार लांब जावं लागत नाही. गुलाबी रंगाच्या व निदान दीड ते दोन लाख फ्लेमिंगोंचं वास्तव्य असलेला नकुरू तलाव व त्याच्या आजूबाजूचा पार्कहा संपूर्ण अाफ्रिकेतील महत्त्वाच्या व दुर्मीळ पक्ष्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या तलावाच्या किनाऱ्याला, फ्लेमिंगो पक्ष्यांची गुलाबी किनार अगदी लांबपर्यंत पसरलेली दिसते. त्यांच्याजवळ जाणं तसं कठीण.

 कारण ते लगेच उडून जातात; पण दुर्बिणीतून त्यांच्याहालचाली, पाण्यात तुरुतुरु पळणं, परेड खरोखरच पाहण्यासारखी असते. चव्वेचाळीस चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा नकुरू तलाव हा खाऱ्या पाण्याचा आहे. त्या निळ्याभोर पाण्यात फ्लेमिंगो आपलं अन्न शोधत असतात. फ्‍लेमिंगो मूळचे इथलेच; पण फेब्रुवारी-मार्च महिन्यांत मात्र त्यांचं स्थलांतर टांझानियात होते. त्यांच्याखेरीज निदान ४५० जातींचे पक्षीही या पार्कमध्ये आढळून येतात. त्यामुळे पक्षीप्रेमींच्या दृष्टीने हा पार्क म्हणजे मोठा खजिनाच म्हणावा लागेल.

 अत्यंत दुर्मीळ असा पांढरा गेंडा नकुरू पार्कमध्येदिसण्याची शक्यता आहे असं गाइड फरीदने आम्हांला आधीच सांगितलं होतं. त्याचबरोबर काळे गेंडेही इथे आहेत. फ्लेमिंगो पक्ष्यांची रांग पाहून परतत असताना फरीदने अचानक गाडी झुडपात घुसवली. सुरुवातीला तीन-चार काळे गेंडे दिसले. त्यांच्या मागे पांढरा गेंडा चरत होता. त्याची कातडी अगदी पांढरी होती. ही पांढरी कातडी चांगलीच उठून दिसत होती. काळे व पांढरे मिळून जवळजवळ ८० गेंडे या पार्कमध्ये आहेत. पांढऱ्यांची संख्या मात्र जेमतेम १५ ते २० इतकीच आहे.

संपूर्ण आफ्रिकेत ‘बिग ५’ हा शब्द प्रयोग फार पूर्वीपासून परिचित आहे. हे पाच बिग कोण? सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस. ते आकाराने मोठे आहेत. म्हणून त्यांना ‘बिग ५’ म्हटलं जात नाही, तर या पाचही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणं अत्यंत कठीण असतं म्हणून त्यांना ‘बिग ५’ असं संबोधलं जातं. त्यांपैकी गेंडा, हत्ती व जंगली म्हैस यांचं मनसोक्त दर्शन आत्तापर्यंत झालं होतं. राहिलेल्या दोन पण सर्वांत महत्त्वाच्या ‘बिग’चे दर्शन होणार की नाही? हा महत्त्वाचा प्रश्न होता. लेक नकुरू ते मसाईमारा हा जवळजवळ ३५० कि. मी. चा प्रवास, आतल्या अत्यंत खराब रस्त्यामुळे त्रासदायकच वाटला. 

त्यात मसाईमारा येथील मारा सरोवा कॅम्पमध्ये दुपारचं जेवण घेऊन आणखी सव्वापाच हजार फूट उंचीवरच्या मारा सरिना लॉजला आम्हांला जायचं होतं. वस्तुत: तिथे जाण्यासाठी नैरोबीहून विमानाची सोय आहे. पण त्रास झाला तरी मोटारीनेच जा, कारण त्या गवतात दुर्मीळ प्राणी दिसण्याची शक्यता अधिक असा सल्ला माहितगारांनी दिला होता. दुपारचं जेवण आटोपून आम्ही मारा सरिना लॉजमध्ये कूच केलं. जाता जाता फरीदने गाडी एकदम थांबवली आणि जवळजवळ कमरेएवढ्या वाढलेल्या सुक्या गवतात घुसवली. ‘बहुधा तिथे सिंह दिसतो आहे’ या त्याच्या वाक्याने मी एकदम सावध झालो. 

जयंताने कॅमेरा सरसावला आणि उघड्या टपातून आम्ही आजूबाजूला पाहू लागलो. मोटार जोरात जात होती आणि अचानक थांबली... समोर वनराज गवतात मस्त आराम करत होते. थोडं पुढे गेलो तर त्यांचं सारं कुटुंबच समोर आलं. दोन-तीन सिंहिणी व त्यांची दहा बाळं. शेजारीच एक म्हैस मारली होती. दोन सिंहिणी व चार-पाच बछडे अद्याप त्या म्हशीच्या सांगाड्यातच बसून ताव मारत होते...काहींचं भोजन पूर्ण झालं होतं तर काहींची भूक अद्याप भागली नव्हती. फरीदच्या अंदाजानुसार ही म्हैस त्यांनी काही तासांपूर्वीच मारली असावी. कारण निम्मे कुटुंबीय अद्याप ताटावरून उठले नव्हते... ‘आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन’ अशी आमची स्थिती झाली होती. किती फोटो काढू, कसं शूटिंग करू यात आम्ही मग्न होतो. 

शिकार केल्यानंतर खाण्याचा पहिला मान सिंहाचा. त्यामुळे खाऊन तृप्त झाल्याने सिंह सुस्तावला होता. त्याला बहुधा ‘मी पाणी पिऊन येते. तोपर्यंत बछड्यांना सांभाळ’ असं सांगून एक सिंहीण निघून गेली. जाताना ती सिंहाच्या जवळ जाऊन एक मिनिटभर थांबली... त्यांच्यात खरोखरच असाच संवाद झाला असेल का? आता सर्व सिंह कुटुंबीय आमच्या मोटारीच्या सावलीत अगदी मोटारीला खेटून पहुडलं. फरीदने गाडी केव्हाच बंद केली होती. अजिबात हालचाल न करण्याच्या सूचना तो आम्हांला खुणांद्वारे करत होता. समजा, सिंह किंवा सिंहिणीने जेमतेम दोन-तीन फूट उंचावरील उघड्या छताच्या दिशेने उडी घेतली असती तर... सारंच चित्तथरारक होतं. आम्हांला लवकर पोहोचायचं होतं.

 हे तर आम्ही कधीच विसरून गेलो होतो. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळण्याचा प्रयत्न करत होता. सिंहाने ते थोडावेळ सहन केलं. पण नंतर एक हलकासा पंजा मारून, ‘त्रास देऊ नकोस’ म्हणून बछड्याला सुनावलं. हे सर्व नाट्य जवळजवळ अर्धा-पाऊण तास चाललं होतं... जणू डिस्कव्हरी चॅनेल...फरक एवढाच होता, की या वेळी आम्ही केवळ तिघं त्याचे साक्षीदार होतो. अखेर फरीदने गाडी सुरू केली. सिंह, दोन सिंहिणी, सहा-सात बच्चे थोडे बाजूला झाले. त्यांना काहीही इजा पोहोचणार नाही अशा दक्षतेने फरीदने तिथून गाडी काढली. पुढच्या प्रवासात जंगलाच्या या राजाची जी वैशिष्ट्यंसमजली ती फारच उद्बोधक वाटली. दिवसाचे जवळजवळ वीस तास सिंह हा आळसटून पडलेला असतो. बहुतेक शिकार सिंहिणीच करतात. मात्र कुठेही त्या अडचणीत असतील, तर मात्र तो त्यांच्या मदतीला धावतो. 

तो क्वचित शिकारही करतो. वस्तुत: सिंह तासाला ६० कि. मी. च्या वेगाने पळू शकतो. पण त्याचा स्टॅमिना खूपच कमी असतो. त्यामुळे त्याला शिकार करायची असेल तर पहिल्या २०० मीटर्सच्या टप्प्यातच तो सावज पकडतो. अन्यथा सोडून देतो. त्याचं कुटुंब हे सर्वसाधारणत: तीस जणांचं असतं व आयुष्य १५ ते २० वर्षं. सिंहाला जंगलात तसा एकही शत्रू नाही. तरस (हायना) त्याची पिल्लं पळवतात व खातात. मात्र मोठ्या सिंहावर किंवा सिंहिणीवर हल्ल करण्याची कोणाचीच हिंमत होत नाही; पण विशेष म्हणजे नैसर्गिकरीत्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा शक्यतो कधीच मिळत नाही, कारण वृद्धत्वाने किंवा आजाराने सिंह मरायला टेकला की त्याचा वास तरसांना बरोबर येतो व ते त्याचा पुरता फडशा पाडतात. सिंहाचा एकमेव शत्रू म्हणजे मनुष्यप्राणी.

 त्या भागातही मनुष्यप्राण्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळेच सिंहांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.... ‘बिग ५’च्या दर्शनाच्या बाबतीत या वेळी आमचं ग्रहमान चांगलं अनुकूल आहे याची झलक तर मिळाली होती. मारा सरिना लॉज अगदी उंचावर बांधलं आहे. प्रत्येक खोलीतून समोरच्या जंगलातला परिसर मस्त दिसतो. खोलीत पाऊल टाकलं आणि थोड्या अंतरावर हत्तीच्या कळपाचं दर्शन झालं. बबून (अजस्र माकडं) पासून सावध राहण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्याहोत्या. तिथल्या तीन दिवसांच्या मुक्कामात रोज निदान पाच-सहा तासांचा गेम ड्राइव्ह करायचा होता. 

त्यासाठी साधारणत: पाच-सहा गाड्या एकदम बाहेर पडतात व शक्यतो बरोबर राहतात. एखादी गाडी जंगलातील चिखलात फसली, रस्ता चुकला किंवा काही बाका प्रसंग निर्माण झाला तर मदत मिळावी हा त्यामागचा हेतू. एकदा दुपारच्या वेळेस रस्त्यावर पाच-सहा गाड्या उभ्या होत्या व सर्वांचं लक्ष थोड्या दूरवर असलेल्या झाडाकडे होतं. आम्हीही त्या तांड्यात सामील झालो. कॅमेरा, दुर्बीण त्याच झाडाच्या दिशेने रोखली तर झाडाच्या फांदीवर एक लांबलचक लेपर्ड बसला होता. शेजारीच त्याने मारलेलं हरिण लटकत होतं. लेपर्डच्या मानेत जबरदस्त ताकद असते. त्यामुळेच मारलेलं जनावर ओढत तो झाडावर चढवू शकतो. लेपर्ड व चित्ता यांच्यात फरक आहे. लेपर्डची शेपटी लांब असते व टोकापासून मध्यापर्यंत त्याच्यावर ठिपके असतात. लेपर्ड सर्वसाधारणपणे सूर्यास्ताच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस शिकार करतो.

 त्याची दृष्टी व श्रवणेंद्रिय फार तीक्ष्ण असते. त्याचं आयुष्य साधारणत: वीस वर्षांपर्यंत असतं. त्याच्या कातड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जबरदस्त मागणी आहे. एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास आम्ही मोटारीने लॉजच्या मागच्या बाजूस गेलो. तिथून एक छोटी नदी वाहत होती. त्या ठिकाणी काही जनावरं दिसतात का याचा शोध घ्यायचाहोता. आमच्याबरोबर आणखी एक गाडी होती. आम्ही पुढे निघून जात होतो. इतक्यात वायरलेसवरून संदेश आला, की लगेच मागे फिरा. सुमारे पाचशे मीटर्स मागे आलो तर समोर चित्तीण व तिची तीन बाळं उभी होती. तिच्या हालचाली कमालीच्या मोहक होत्या. बच्चेकंपनीही आईबरोबर रुबाबात उभं राहून जणू आम्हांला फोटोसाठी पोज देत होते. चार-पाच मिनिटं हे फोटो सेशन झालं आणि समोरच्या गवतात सर्व कुटुंब गायब झालं. चित्ता हा जगातील सर्वांत चपळ प्राणी. तो तासाला १०० कि. मी. च्या वेगाने पळतो.

 पण त्याचा हा वेग पहिल्या ५०० मीटर्सपर्यंतच असतो. त्याचं शरीर गोंडस, लवचीक, छाती भरदार व मुख्य म्हणजे पाय लांब असतात. शिकार करण्याची त्याची पद्धत निराळी असते. तो आपल्या सावजाच्या जवळ दबकत, दबकत जातो आणि एकदम हल्ला चढवतो. त्या जनावराला गुदमरून टाकून तो त्याला मारतो व शिकार लगेच खायची नसेल तर पालापाचोळ्याने झाकून ठेवतो. अन्यथा तरस त्या आयत्या मिळालेल्या शिकारीवर डल्ला मारतात. केनयाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने चार प्रकारच्या उत्पन्नांवर आधारित आहे. ते म्हणजे- (१) पर्यटन (२) कॉफी (३) चहा (४) फुलं (गुलाब). त्यात पर्यटनाचा क्रमांक पहिला आहे. 

केनया सरकार पर्यटन क्षेत्र विकसित करायचा खूपच प्रयत्न करत आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना काय दक्षता घ्यावी याचे नियम करण्यात आले आहेत. उदा. मोटारीतून फिरताना शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये, अगदी दुर्मीळ प्राणी दिसला तरच झुडपांत शिरावं, पण परत लवकरात लवकर मुख्य रस्त्यावर यावं, जनावरांच्या जवळ बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खायलाही घालू नये. सिंह, गेंडा, लेपर्ड-चित्ता यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त वाहनांनी थांबू नये, जनावरांचा पाठलाग करू नये व त्यांना त्रास देऊ नये इत्यादी... या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड करून त्वरित पार्कबाहेर काढण्याचे अधिकार रेंजर्सना आहेत. सरकार याबाबत अतिशय दक्ष असल्यानेच केनया सफरीला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.

बिग-५ च्या सहवासात स्वाध्याय | Swadhyay big 5 chya sahavasat|  Maharashtra State Board 9th Marathi Solution 


Maharashtra State Board 9th Std Marathi Kumarbharati Textbook Solutions
Chapter 1 वंद्य ‘वन्दे मातरम्’ (गीत)
Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव
Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई
Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
Chapter 4 नात्यांची घट्ट वीण
Chapter 5 एक होती समई
Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
Chapter 6 या झोपडीत माझ्या (कविता)
Chapter 7 दुपार
Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या
Chapter 9 मी वाचवतोय (कविता)
Chapter 10 यंत्रांनी केलं बंड
Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
Chapter 11 मातीची सावली
Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया (पोवाडा)
Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया
Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर
Chapter 15 निरोप (कविता)
Chapter 15.1 ‘बिग ५’ च्या सहवासात (स्थूलवाचन)
Chapter 16 वनवासी (कविता)
Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
Chapter 18 हसरे दुःख
Chapter 19 प्रीतम
Chapt er 20 आपुले जगणे…आपुली ओळख! (कविता)
Chapter 20.1 विश्वकोश (स्थूलवाचन)
उपयोजित लेखन

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post