मातीची सावली इयत्ता नववी स्वाध्याय । Matichi Savli Swadhyay Marathi
1. खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा:
[अ] मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.
[आ] आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.
[इ] वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.
SOLUTION:
[अ] उन्हाळा जितका तीव्र, तितके मडक्यातले पाणी गार असते. अतिथंड पाण्याचा चटका बसतो. मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते. त्याचा गारवा प्रसन्न असतो. जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते.
[आ] आईचा पदर म्हणजे आईची माया. कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श, आईचा सहवास सुखद, प्रेमळ व हवाहवासा वाटणारा असतो. फरसूला चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती.
[इ] चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत, भिरभिरत खाली येतात. फुलपाखरे थव्याथव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर, मनोहारी असते. चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते.
2. खालील तकता पूर्ण करा.
प्रश्न 1. खालील तकता पूर्ण करा.
SOLUTION:
घटना | परिणाम / प्रतिक्रिया |
1. फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसला. | 1. सून येऊन डाफरली. |
2. मनूला फरसूने शिकवले. | 2. मनू कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले. |
3. वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. | 3. आठवड्याभरातच कोसू मरण पावली. |
4. मनूने जमीन विकायला काढली. | 4. फरसूने बैलासारखी मान डोलावली. |
3. आकृती पूर्ण करा:
प्रश्न [अ]
SOLUTION:
प्रश्न [आ]
पाठाच्या आधारे फरसूचे पुढील मुद्दयांना अनुसरून वर्णन करा:
SOLUTION:
1. छंद: फरसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या साध्या गोष्टींतून तो सुख मिळवायचा. घराच्या पायरीवर बसायचे, फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची, झाडावर चढणाऱ्या खारीचे बागडणे न्याहाळायचे हा त्याचा आवडता छंद होता. चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे.
2. मेहनत: फरसू मेहनतीत कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पानन् पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवी. भाताचे पीक झाले की, तेथेच वांगी, दुधी यांसारख्या भाज्यांचे पीक घेई. फरसू व त्याची बायको ही उभयता पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची. शेवटपर्यंत मातीचीच चाकरी करायची, झाडापानांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्याचा निर्धार होता.
3. दुःख: फरसूचे दुःख मात्र मोठे होते. बिल्डरच्या नादाला लागून मुलाने जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकून टाकले. फरसूचा तो तर जगण्याचा आधार होता. मात्र, त्याच्या भावनेची मुलाला, सुनेला कदर नव्हती. सून तर त्याच्यावर डाफरायची. त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटत होती.
4. माणूसपण: फरसूने माणूस म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली होती. दोन्ही मुलींची लग्ने करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली. मुलाला खूप शिकवले. पण शहरीकरणाची वावटळ त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त करीत होता. एकंदरीत फरसूची कहाणी मनाला व्याकूळ करून टाकते.
4. ओघतक्ता तयार करा:
प्रश्न 1.
ओघतक्ता तयार करा:
SOLUTION:
5. खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा:
प्रश्न [अ]
“आमसा जलम या मातीत गेल्ता मणून थोडं वायीट वाटते.”
SOLUTION:
“आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते.”
प्रश्न [आ]
“त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.”
SOLUTION:
“त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी.”
6. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा:
प्रश्न [अ]
टकळी चालवणे –
1. सूत कातणे
2. सतत बोलणे
3. वस्त्र विणणे.
SOLUTION:
सतत बोलणे
प्रश्न [आ] नाळ तुटणे –
1. मैत्री जमणे
2. संबंध न राहणे
3. संबंध जुळणे.
SOLUTION:
संबंध न राहणे
7. खालील अर्थांची वाक्ये पाठातून शोधून लिहा.
[अ] फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले –
[आ] फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला –
[इ] फरसूचे झाडांबाबतचे प्रेम –
8. स्वमत.
प्रश्न [अ] ‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास, त्याची कारणे सोदाहरण लिहा..
SOLUTION:
‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. माणूस स्वत:च्या इच्छाआकांक्षांसाठी जगतो. तसेच, इतर माणसांबद्दल वाटणारा बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. बंधुभाव नष्ट झाला, तर माणूसपण नष्ट होते. शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहोत. नैसर्गिक गोष्टींपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षक वाटू लागल्या आहेत.
शहरात आपल्या अंगाला माती लागत नाहीच, पण दिसतही नाही. सिमेंट काँक्रीट, डांबर, दगड, विटा यांनी आपण माती झाकून टाकली आहे. झाडेपाने दिसेनाशी झाली आहेत. आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे. याचा कळतनकळत परिणाम होत आहे. आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. बंधुभाव नष्ट होत आहे. साहजिकच, आपण माणूसपण गमावत आहोत. हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे.
प्रश्न [आ] पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
SOLUTION:
फरसू हा कष्टाळू गरीब शेतकरी होता. पाठीचा कणा दुखेपर्यंत तो व त्याची पत्नी शेतात राबत. मातीशी नाते असण्यातच माणूसपण असते, अशी त्याची श्रद्धा होती. जमिनीवर, झाडाझुडपांवर त्याचे जिवापाड प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत जमिनीची सेवा करायची, झाडाझुडपांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्याचा निश्चय होता. हा कोणत्याही शेतकऱ्याचा पारंपरिक विचार आहे. मला हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो.
अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून लोक पांढरपेशे बनत चालले आहेत. बरेच जण कष्ट करायला राजी नसतात. शेतीला कमी लेखतात. यामुळे जीवनात विकृत्या शिरल्या आहेत. कोणत्याही कारणासाठी झाडे सहज तोडली जातात. प्रदूषणामुळे नदयांची गटारे झाली आहेत. समुद्रसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. जमिनीपासून, शेतीपासून माणसे दूर गेल्यामुळे ती निसर्गापासूनसुद्धा तुटली आहेत. ती निसर्गाची नासधूस करीत आहेत. यामुळे माणूस स्वत:चेच जीवन धोक्यात आणीत आहे. यातून बाहेर पडायचे असेल, तर फरसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे.
प्रश्न [इ] ‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
उपक्रम:
प्रश्न 1. प्रस्तुत पाठाचे नाट्यरूपांतर करून वर्गात सादर करा.
प्रश्न 2.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे ‘उदयाच्या सुंदर दिवसासाठी’ – हे पुस्तक वाचा.
भाषा सौंदर्य:
प्रश्न 1. आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचारांची उदाहरणे लिहा:
SOLUTION:
उत्तर:
शरीर अवयवावर आधारित | चेहरा काळवंडणे उत्तरे: (1) डोळे मिटणे (2) पोटात दुखणे (3) डोके फिरणे (4) बुडत्याचा पाय खोलात. |
प्राणी व पक्षी यांवर आधारित | पोटात कावळे ओरडणे. उत्तरे: (1) चिमणीच्या चोचीने खाणे (2) कोल्याला द्राक्षे आंबट (3) गाढवाला गुळाची चव काय? (4) माकडाला चढली भांग. |
मानवी भावभावना | जिवाची उलघाल होणे. उत्तरे: (1) हृदयात कालवाकालव होणे (2) मन चिंती ते वैरी न चिंती (3) भित्यापाठी ब्रह्मराक्षस (4) प्राणपणाने लढणे. |
अन्नघटक | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. उत्तरे: (1) वड्याचे तेल वांग्यावर (2) खाई त्याला खवखवे (3) तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले (4) दुधाची तहान ताकावर. |
इतर घटक | दगडापेक्षा वीट मऊ. उत्तरे: (1) एक ना धड भाराभर चिंध्या (2) इकडे आड, तिकडे विहीर (3) पळसाला पाने तीनच (4) तळे राखी तो पाणी चाखी.’ |
भाषाभ्यास:
तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तुम्ही धडे वाचता, कविता वाचता. धडे आणि कविता म्हणजेच गय आणि पदध यांच्या रचनेत फरक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. हा फरक असतो मुख्यतः लयीचा. पदध गाता येते किंवा लयीत वाचता येते. गदयाचे तसे नसते. कवितेमध्ये लय निर्माण कशी होते? कुठल्या गोष्टीमुळे होते? हे आज आपण बघणार आहोत. वृत्त, छंद यांसारख्या गोष्टींमुळे कवितेला लय मिळते. कवितेची लय समजण्यासाठी आपण त्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत.
वृत्त किंवा छंद म्हणजे काय ? लय निर्माण करण्यासाठी कवितेची जी विशिष्ट शब्दरचना केली जाते. व्हस्व, दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो, त्याला ‘वृत्त’ म्हणतात. याचा अर्थ कविता एका विशिष्ट वृत्तामध्ये रचलेली असते, म्हणून ती आपल्याला लयीत म्हणता येते. गणितात जशा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संकल्पना येतात, तशा वृत्तविचारामध्ये काही संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्या संकल्पना आपण आधी समजून घेऊया.
उतारा क्र. 1
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : [आकलन]
प्रश्न 1. फरक लिहा:
तरुणपणाचा काळ | म्हातारपणाचा काळ |
उत्तर:
तरुणपणाचा काळ | म्हातारपणाचा काळ |
सुखी, समाधानी | खिन्न, शोकाकुल |
कृती 2 : [आकलन]
प्रश्न 1. आशय स्पष्ट करा:
1. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला.
2. आपली खरबरीत बोटं त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली.
SOLUTION:
1. आपण आनंदाने चालतो, तेव्हा आपले पाय सहज, भरभर पडतात. फरसूचे पाय असे आनंदाने पडत नाहीत. पाय उचलण्यासाठी त्याला कष्ट पडतात. पाय ओढावे लागतात. म्हणजे फरसू दुःखीकष्टी मनाने पायरीवर येऊन बसतो.
2. खरबरीत बोटे म्हणजे भरपूर कष्ट केलेल्या हातांची बोटे. या खरबरीत बोटांना गुळगुळीत पायऱ्या सुखाच्या वाटत नाहीत. पायऱ्यांचा गुळगुळीतपणा दूरचा, परका वाटतो.
प्रश्न 2.
माहिती लिहा:
पूर्वीच्या गोष्टी | आताच्या गोष्टी |
1. | 1. |
2. | 2. |
उत्तर:
पूर्वीच्या गोष्टी | आताच्या गोष्टी |
1. चिंचेचे झाड, मंगलोरी कौले, भिरभिरत येणारी चिंचेची पाने. | 1. गुळगुळीत पायऱ्या, गुबगुबीत खुर्च्या. |
2. चिंचेच्या मुळावर बसून मित्रांसोबत केलेल्या गप्पागोष्टी. | 2. आता गप्पा मारायला कोणीही नाही. आता फक्त एकट्याने आभाळाकडे बघत राहणे |
प्रश्न 3. उताऱ्यातील सासरे-सून यांच्यातील नाते स्पष्ट करा.
SOLUTION:
सुनेला वाटते की, सासऱ्यांनी तिच्या इच्छेप्रमाणे वागावे. सासरे ।
त्यांच्या जीवनातील सर्व जुन्या गोष्टी नष्ट झाल्याने दुःखी आहेत. सासऱ्यांच्या मनातील भावना सून लक्षात घेत नाही
आणि त्यांच्यावर डाफरत राहते.
प्रश्न 4. कोष्टक पूर्ण करा:
घटना | परिणाम |
1. इनूस मास्तर परदेशातल्या घटना सांगायचे. |
उत्तर:
घटना | परिणाम |
1. इनूस मास्तर परदेशातल्या घटना सांगायचे. | फरसू व आबू यांना नवल वाटायचे. |
कृती 3 : [स्वमत/अभिव्यक्ती
प्रश्न 1. या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारी फरसूची मन:स्थिती लिहा.
SOLUTION:
दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठतो. त्याच्या पायांची हाडे कडकडतात. यावरून तो उतारवयात आहे, हे लक्षात येते. त्याला आताचे वातावरण प्रिय नाही. चकचकीत, ऐषारामी वातावरणात त्याचे मन रमत नाही. तो उदास, विमनस्क स्थितीत वावरतो. त्याच्या खरबरीत बोटांना गुळगुळीत पायरीचा स्पर्श सुखद वाटत नाही.
गुबगुबीत खुर्चीतही त्याला अवघडल्यासारखे होते. त्याला हवेहवेसे वाटणारे दृश्य त्याच्या मनात जागे होते. ते असते पूर्वीचे, त्याच्या तरुणपणातील. चिंचेचे झाड, मंगलोरी कौले, इकडून तिकडे बागडणाऱ्या खारी यांनी बनलेले वातावरण त्याला समाधान दयायचे. आता ते सर्व नाहीसे झाले आहे. त्याच्या फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत. या आठवणींनी फरसू उदास होतो आणि आभाळाकडे बघत राहतो.
उतारा क्र. 2
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : [आकलन]
प्रश्न 1. आकृती पूर्ण करा:
9
SOLUTION:
10
प्रश्न 2. का ते लिहा:
1. गावकरी फरसूवर मनोमन जळायचे.
2. पाठीचा कणा दुखेपर्यंत फरसू पत्नीसहित राबणे चालू ठेवायचा.
SOLUTION:
1. पावसाळ्यात फरसूचे भातशेत हिरवेगार दिसायचे. पिकल्यानंतर ते भात झळाळणाऱ्या सोन्यासारखे दिसे. त्यामानाने इतरांचे शेत पिकत नसे.
2. भाताचे पीक झाल्यावर फरसू तिथे वांगी, कारली, दुधी वगैरे भाज्यांचीही पिके घ्यायचा. तो दुबार पिके घ्यायचा. त्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागायचे.
प्रश्न 3. पुढील वाक्य प्रमाणभाषेत लिहा:
त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.
SOLUTION:
त्यांचीच पुण्याई, ही विहीर नाही, नदी आहे नदी.
प्रश्न 4. पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा:
फरसने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले.
SOLUTION:
बापजादयांची कमायी रे पोरांनो!
कृती 2 : [आकलन]
प्रश्न 1. विधान पूर्ण करा:
फरसूच्या मते, बापजादयांच्या पुण्याईमुळे …………………..
SOLUTION:
फरसूच्या मते, बापजादयांच्या पुण्याईमुळे –
[अ] फरसूच्या विहिरीला वैशाखातही भरपूर पाणी असे.
[आ] फरसूने तीन मुलींची लग्ने करून त्यांना सासरी पाठवले. तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. इतकी सुबत्ता त्याला लाभली होती.
प्रश्न 2. आकृती पूर्ण करा:
11
SOLUTION:
12
कृती 3 : [स्वमत/अभिव्यक्ती]
प्रश्न 1. फरसूच्या यशा मागील तुम्हांला जाणवलेले रहस्य सांगा.
SOLUTION:
फरसूच्या यशामागे दोन गोष्टी आहेत. एक आहे त्याची श्रद्धा आणि दुसरी आहे त्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. त्याची चांगल्या, उदात्त मूल्यांवर श्रद्धा आहे. त्याच्या मते, कोणाच्याही कामात खोडा घालू नये. म्हणजे कोणाचेही वाईट करू नये. इतरांचे वाईट केल्यास आपले अकल्याण होते, असा त्याचा ठाम विश्वास आहे. आपल्या बापजादयांनी कोणाचीही फसवणूक केली नाही; कोणाला नाडले नाही; म्हणून आपली भरभराट झाली, असे त्याला वाटते.
दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. त्याने नैसर्गिक खतावरच पूर्णपणे भर दिला. रासायनिक खताचा वापर केला नाही. रासायनिक खताचा वापर न केल्यामुळे जमिनीचे नुकसान झाले नाही. त्याने चिंचेचा पाला शेतात पसरून त्याचेच खत होऊ दिले. तसेच, मुख्य भातपिकानंतर त्याने वांगी, कारली, दुधी वगैरे भाज्यांची पिके घेतली. या प्रकारच्या दुबार पिकांमुळेही जमिनीचा कस वाढण्यास मदत झाली. एकंदरीत, श्रद्धा व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यांमुळे फरसू यशस्वी झाला.
उतारा क्र. 3
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : [आकलन]
प्रश्न 1. पुढील कोष्टक पूर्ण करा:
घटना. | परिणाम |
तिघेही मुकाट जेवत होते. |
उत्तर:
घटना. | परिणाम |
तिघेही मुकाट जेवत होते. | मुलांशी प्रेमाचे नाते न राहिल्यामुळे डोळ्यांत आसवे येत होती. |
प्रश्न 2. कोष्टक पूर्ण करा:
सुनेचे उद्गार | सुनेच्या मनातला अर्थ |
1. काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे! | |
2. अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी? |
उत्तर:
सुनेचे उद्गार | सुनेच्या मनातला अर्थ |
1. काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे! | निरर्थक व निष्क्रिय आयुष्य जगत आहेत. |
2. अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी? | मला कष्ट करावे लागतात आणि यांचा काडीचाही उपयोग नाही. |
प्रश्न 3. nपुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा:
फरसूचे झाडांबाबतचे प्रेम.
SOLUTION:
पोटच्या पोरांइतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही, हा त्याचा निश्चय होता.
मातीची सावली इयत्ता नववी स्वाध्याय । Matichi Savli Swadhyay Marathi
कृती 2 : [आकलन]
प्रश्न 1. अर्थ स्पष्ट करा:
1. पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत.
2. आपला आधार तर कधीच तुटून पडला.
SOLUTION:
1. झाडापानांवर प्रेम असल्यामुळे कष्ट कधी जाणवलेच नाहीत.
2. फरसूची पत्नी मरण पावली. त्यामुळे त्याचा आधार तुटून पडला.
प्रश्न 2. फरक लिहा:
फरसू | मनू |
1. | 1. |
2. | 2. |
3. | 3. |
उत्तर:
फरसू | मनू |
1. तिसरी-चौथीच्या पुढे गेला नव्हता. | 1. फरसूने मनूला शिकवले. |
2. जमिनीचीच चाकरी करायची हे ठरवलं होतं. | 2. इंग्रजी नावाच्या कुठल्याशा कंपनीतील नोकरीच श्रेष्ठ मानीत होता. |
3. पोटच्या मुलाच्या प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना शेवटपर्यंत आधार देण्याचा निश्चय केला होता. | 3. मातीत हात घालायलाच नाखूश होता. |
कृती 3 : [स्वमत/अभिव्यक्ती]
प्रश्न 1. मनू आणि फरसू यांच्यातील नाते भावनाहीन, कोरडे होण्यामागील तुम्हांला जाणवलेले कारण स्पष्ट करा.
SOLUTION:
फरसू कष्ट करीत करीत व निसर्गाशी खेळत खेळतच जगला. त्यामुळे त्याचा जमिनीवर, झाडापानांवर जीव आहे. त्यांच्या आधारानेच आपले जीवन उभे राहते. म्हणून जीव असेस्तोवर जमिनीची चाकरी करायची, झाडापानांना आधार दयायचा, हा त्याचा निर्धार होता. तसेच, फरसू खेडेगावात राहत असल्यामुळे खेडेगावातील माणसे एकमेकांना धरून राहतात. तिथे व्यक्तीच्या स्वत:च्या सुखदु:खापेक्षा संपूर्ण समाजाचे सुखदुःख महत्त्वाचे मानले जाते.
मनूने शिक्षण घेतले. आपल्याकडील बहुतांश शिक्षण पुस्तकी असते. ते कष्टापासून दूर असते. यामुळे मनूला शेतीतले कष्ट कमी दर्जाचे वाटतात. चकचकीत, गुळगुळीत स्वरूपाचा बंगला सुखाचा वाटतो. नोकरी करणारा कळतनकळत फक्त स्वत:चाच विचार करू लागतो. मनूचे तेच झाले. तो फरसूपासून मनाने दूर गेला. त्या दोघांमध्ये भावनिक नाते राहिलेच नाही. दोघांमध्ये संवाद राहिला नाही. समाधान राहिले नाही.
उतारा क्र. 4
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : [आकलन]
प्रश्न 1. माहिती लिहा:
1. पूर्वीच्या जुन्या घरातील जेवणाच्या वेळचे वातावरण.
2. पूर्वीच्या जेवणाचे स्वरूप.
3. कोसूचा मृत्यू.
SOLUTION:
1. पूर्वी जुन्या घराच्या अंधाऱ्या पडवीत जेवणे होत असत. कोसू प्रार्थना करी. प्रार्थना संपल्यावर जेवण चालू होई. त्या वेळी कोसूची टकळी चालू असे. मनू तर जेवता जेवता बहिणींशी मस्ती करायचा. वातावरण मोकळे, प्रेमळ असे.. जेवताना आनंद मिळे.
2. पूर्वीचे जेवण साधे असे. जेवणात एखादी भाजी, कधी डाळ, सुके बोंबील, भात आणि तांदळाच्या भाकऱ्या असत. जेवणात कोणताही उंची थाट नव्हता. तरी जेवणाचे समाधान मिळे.
3. वाडीत काम चालू होते. हे काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा, असे काहीतरी लागले. म्हटले तर साधी इजा झाली होती. तीच महागात पडली. आठवड्याभरातच कोसूची प्राणज्योत मालवली.
प्रश्न 2. पुढील अर्थाचे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा:
फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला.
SOLUTION:
तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला.
कृती 2 : [आकलन]
प्रश्न 1. संकल्पना स्पष्ट करा:
1. केळीचे बन जमिनीवर झोपावे, तसे.
2. कारली-वांग्यासारखा जमिनीचा बाजार मांडला.
3. बैलासारखी मान डोलावली.
SOLUTION:
1. केळ पडली की ती पूर्ण उन्मळून पडते. तिची जमिनीत रुजलेली सर्व मुळे मातीतून पूर्णपणे बाहेर येतात. म्हणजे ती समूळ नष्ट होते. केळीचे अखंड बन जर असेच आडवे झाले, तर सगळी बाग उजाड झालेली दिसते. अशाच प्रकारे एकाएकी कोसू मरण पावल्यामुळे फरसूचा संसार उद्ध्वस्त झाला.
2. कारली-वांग्याचा बाजार मांडला जातो, तेव्हा त्या कारल्या वांग्यांबद्दल कोणालाही आपुलकी वाटत नसते. किंबहुना त्यांची विक्री झाली, तर सगळ्यांना आनंदच होतो. म्हणून बाजारात सर्व विक्रेते ओरडून लोकांना खरेदी करण्याचा आग्रह करीत असतात. वेळप्रसंगी कमी किमतीतही विकत असतात. यालाच बाजार मांडणे म्हणतात. जमिनीची बाब तशी नसते. आपण जमीन विकून तिला कारली-वांग्याच्या पातळीवर आणले असे फरसूला वाटत असते.
3. नंदीबैलाचा मालक सांगतो, त्याप्रमाणे बैल मान डोलावतो. बैलाला स्वत:चे मत वा भावना नसतात. तो मालकाच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. त्याप्रमाणेच आपणही मनूच्या म्हणण्याला मान डोलावली. आपले मनातले खरेखुरे म्हणणे सांगितलेच नाही, असे फरसूला वाटते.
प्रश्न 2. फरसूच्या कल्पनेप्रमाणे कोसूच्या मृत्यूमागील कारणे.
SOLUTION:
फरसूच्या कल्पनेप्रमाणे कोसूच्या मृत्यूमागील कारणे:
1. ज्या मातीने संसार फुलवला, त्या मातीलाच उजाड केल्यामुळे कोसू मरण पावली असावी.
2. मनूने जमीन विकायचा विचार मांडला, तेव्हा नंदीबैलाप्रमाणे आपण मान डोलावली, असे फरसूला वाटले.
कृती 3 : [स्वमत/अभिव्यक्ती]
प्रश्न 1. फरसू व मनू यांची जीवनदृष्टी समजावून सांगा.
SOLUTION:
फरसूच्या जुन्या घरात पूर्वी जेवतानाचे वातावरण लोभसवाणे होते. सगळेजण गप्पाटप्पा करीत, थट्टामस्करी करीत जेवत असत. त्यात माया होती. भावनेचा ओलावा होता. त्यात सहज, साध्या निर्मळ भावनांना वाव होता. म्हणून ते वातावरण सुंदर होते, सुखद होते. या वातावरणात शेती, गाईगुरे, झाडेपाने यांनाही स्थान होते. गावातल्या लोकांनाही स्थान होते. सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत जगणे हवे असते.
मनूला व त्याच्या पत्नीला, म्हणजे फरसूच्या सुनेला ही जगण्याची रीत मान्य नव्हती. त्यांना उच्च दर्जाच्या गुळगुळीत फरश्या बसवलेली, मोठ्या, उंच इमारतीमधील महागडी घरे अधिक आकर्षक वाटतात. मनू जुन्या घराला गोठा म्हणतो. त्याला शेतीपेक्षा नोकरी अधिक चांगली वाटते. या दोन वेगवेगळ्या जीवनरिती आहेत. दोन्ही एकमेकींच्या विरुद्ध आहेत. मनूला फरसूचे मन कळत नाही. त्यामुळेच मनू कायम फरसूविरुद्ध उभा ठाकतो.
उतारा क्र. 5
पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : [आकलन]
प्रश्न 1. आकृती पूर्ण करा:
13
SOLUTION:
14
प्रश्न 2. कोष्टक पूर्ण करा:
कोष्टक पूर्ण करा:
कृती | कृतीमागील भावना |
1. फरसू पुढ्यातली बशी सरकवून उठला. खांदे पाडून, मान खाली घालून अंगणात आला. | |
2. सूनबाई व मनू या दोघांनीही शांतपणे जेवण पुढे चालू केले. |
उत्तर:
कृती | कृतीमागील भावना |
1. फरसू पुढ्यातली बशी सरकवून उठला. खांदे पाडून, मान खाली घालून अंगणात आला. | आपण काहीच करू शकत नाही, ही असहायता, खोल दुःख. |
2. सूनबाई व मनू या दोघांनीही शांतपणे जेवण पुढे चालू केले. | अभिमान व आनंद. |
कृती 2 : [आकलन]
प्रश्न 1.
उत्तर लिहा:
फरसूच्या दृष्टीने जमिनीवर झालेले अत्याचार:
………………………………………
………………………………………
………………………………………
………………………………………
SOLUTION:
जमिनीवर ट्रॅक्टर फिरला.
बागायत मातीला मिळाली.
मोठाले खड्डे खणले गेले.
भलेमोठे दगडविटांचे धूड उभारले गेले.
प्रश्न 2. आकृती पूर्ण करा:
15
SOLUTION:
16
उतारा क्र. 6
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : [आकलन]
प्रश्न 1. कारणे लिहा:
1. फरसू मध्यरात्री घराबाहेर बसला आहे.
2. फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिले.
SOLUTION:
1. प्रथम फरसूची बायको गेली. मग जमीन गेली. घर गेले. सर्व झाडे गेली. जिवाभावाच्या सर्वच गोष्टी नष्ट झाल्या. म्हणून तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. दु:खामुळे त्याला चैन पडेना आणि तो मध्यरात्र असतानाही घराबाहेर येऊन बसला.
2. पूर्वजांनी जमीन मिळवली होती. त्यांनीच घर बांधले होते. त्यांनीच झाडेझुडपे लावली. पैशाच्या हव्यासाने पूर्वजांची सर्व कमाई आपण घालवली. हा एक प्रकारे गुन्हाच केला, अशी फरसूची भावना होती. या गुन्हयाबद्दल येशूकडे माफी मागावी, म्हणून त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिले.
प्रश्न 2.पुढील घटनांचे परिणाम लिहा:
1. जमीन विकली, पैसा आला – …………………….
2. मनूने कागद आणला, फरसूने सही केली – …………………..
SOLUTION:
1. जमीन विकली, पैसा आला – ते बापाला विसरले.
2. मनूने कागद आणला, फरसूने सही केली – फरसूला वाटले, त्याने बेइमानी केली. आपल्या आईला फसवले.
कृती 2 : [आकलन]
प्रश्न 1. अर्थ स्पष्ट करा:
आमशा आजा, पणजाअं रगत हय्!
SOLUTION:
जमीन, घर, झाडेपेडे हे फरसूच्या पूर्वजांनी, त्याच्या आजा पणजाने मिळवले होते. तेवढे सगळे उभे करण्यासाठी त्यांनी स्वत:ची आयुष्ये ओतली होती. रक्त आटवले होते. ते सगळे आपण पैशांसाठी विकले, याचे प्रचंड दु:ख व पश्चात्ताप फरसूला होतो. हा पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी फरसू हे उद्गार काढतो.
प्रश्न 2. आबूने फरसूची काढलेली समजूत तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION:
मध्यरात्री दुःखावेगाने अस्वस्थ होऊन फरसू घराबाहेर पडला. त्याला पाहून आबूने आश्चर्य व्यक्त केले. त्यावर, पूर्वजांनी रक्त आटवून उभारलेली संपत्ती आपण विकली, याबद्दलचा पश्चात्ताप त्याने आबूकडे व्यक्त केला. आबूने त्याची समजूत काढली. अशी जमीन अनेकांनी विकली आहे. त्यात गैर काहीच नाही. मिळालेल्या भरघोस पैशांनी मनूचे जीवन पूर्ण समृद्ध होणार आहे. ही सुद्धा चांगलीच घटना आहे. म्हणून फरसूने त्याचे दु:ख वाटून घेऊ नये, असे आबूने समजावले.
कृती 3 : [स्वमत/अभिव्यक्ती]
प्रश्न 1. ‘फरसूच्या घरातील यातनादायक वातावरणाला फरसू व मनू हे दोघेही सारखेच जबाबदार आहेत.’ विधान स्पष्ट करा.
SOLUTION:
काळानुसार परिस्थिती बदलते. प्रत्येक पिढीचे विचार बदलतात. नवीन पिढी नवीन विचारांना अनुसरून चालते. नव्या पिढीची जगण्यावागण्याची रीत वेगळी असते. ही रीत म्हणजे जीवनशैली. मन् हा नव्या युगातला युवक आहे. त्याची जीवनशैली आधुनिक काळातली. तो या नव्या जीवनशैलीला अनुसरूनच वागणार. हा बदल फरसूला कळलेला नाही. म्हणून त्याला दु:ख होते. तो वेदनेने विव्हळतो. त्याच वेळी मनूलाही वडिलांची मन:स्थिती कळत नाही. वडील है ज्या विचारांच्या वातावरणात वाढले, त्याच विचारांना धरून ते वागणार. त्यांना स्वत:च्या विचारांत झटकन बदल करता येणार नाही.
नवीन विचार ते त्वरेने आत्मसात करू शकणार नाहीत. हे सर्व मनूनेही लक्षात घ्यायला हवे होते. वडिलांना हळूहळू आपल्या विचारांकडे आणायचा प्रयत्न त्याने करायला हवा होता. पण त्याने तो तसा केला नाही. बापलेक दोघेही आपापल्या जागी घट्ट राहिले. त्यांच्या दुःखाचे मूळ तिथे आहे. म्हणून दोघेही सध्याच्या परिस्थितीला जबाबदार आहेत.
उतारा क्र. 7
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : [आकलन]
प्रश्न 1. आशय स्पष्ट करा:
1. जलमभर ढोरहारकं खपाला पाये.
2. त्यांना पायाखालती जमीनच नय् रे………
3. त्यांशे पाय जमिनीवर नाय.
SOLUTION:
1. फरसू जमीन विकल्याबद्दल दु:खी होतो. आबूला वाटते की, फरसूला दारिद्र्यात राहणेच पसंत आहे. पैसे हातात आले की, अनेक सुखे मिळवता येतात. पण फरसू या सुखांची आस बाळगतच नाही. तो स्वत:ला यातनांमधून मुक्त करण्याचा प्रयत्नच करीत नाही. म्हणून आबूचे मत असे बनत चालले आहे की, फरसूला ढोरासारखे राबणे आवडते.
2. फरसूच्या मते, आपल्या मालकीची जमीन असेल, तरच आपण स्थिर असतो, आपल्या जीवनाला अर्थ असतो. आपल्या मालकीची जमीन नसेल, तर आपल्याला कोणताही आधार नसतो. आपण जमीन विकल्यामुळे आपली नातवंडे-पतवंडे यांचा आधारच आपण काढून घेतला, असा अर्थ होऊ शकतो.
3. आबूच्या मते, आजच्या पिढीतील मुले हुशार आहेत, कर्तबगार आहेत. त्यांचा पाय जमिनीवर ठरत नाही. ते बोटीने, विमानाने जगभर हिंडतात. अरबस्तान, इंग्लंड, अमेरिका वगैरे अनेक देशांमध्ये जातात. म्हणून आबू म्हणतो की, हल्लीच्या मुलांचा पाय जमिनीवर ठरतच नाही. ही मुले सतत फिरतीवर असतात. त्यांची प्रगती होत आहे.
प्रश्न 2. आकृती पूर्ण करा:
17
SOLUTION:
18
कृती 2 : [आकलन]
प्रश्न 1. विधाने पूर्ण करा:
1. आबूच्या मते, जमीन विकल्याने …………………………..
2. फरसूच्या मते, जमीन नसेल तर ………………………….
SOLUTION:
1. आबूच्या मते, जमीन विकल्याने अमाप पैसा मिळाला. आता मरेपर्यंत सुखात राहता येईल.
2. फरसूच्या मते, जमीन नसेल, तर ढोरासारखे जीवन उपयोगाचे नाही. आपले आयुष्य संपले. आता पुढच्या मुलाबाळांना पायाखाली जमीनच राहणार नाही.
प्रश्न 2. कसे/कशी ते लिहा:
इमारत वर येत होती – …………………………………………….
चांदण्या प्रकाशात धूड भासत होते – …………………………
इमारतीची सावली – ………………………………………………..
शेताला कवटाळत अस्ताव्यस्त पसरली होती – ……………………………
SOLUTION:
कोंबासारखी
अक्राळविक्राळ
काळी ठिप्पूस
सुस्तावल्यासारखी.
कृती 3 : [स्वमत/अभिव्यक्ती]
प्रश्न 1. ‘फरसूला वाटलं, ही आपल्या मातीची सावली आहे,’ या विधानाचा आशय तुमच्या शब्दांत सांगा.
‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION:
शहरीकरणामुळे शहराकडे लोकांचे लोंढे वाहत आहेत. घरांची मागणी वाढत आहे. हे पाहून बिल्डरांची हाव वाढली आहे. 1 ते जमिनी गिळंकृत करीत आहेत. नव्या पिढीच्या हे लक्षात येत नाही. नव्या पिढीला फक्त पैसाच दिसतो. पैशाने सर्व काही विकत घेता येईल, असे त्यांना वाटते. पैशांसाठी जमीन विकली, तर आपल्या
आयुष्याची सर्व पाळेमुळे उद्ध्वस्त होतात; माणूस मनाने उद्ध्वस्त होतो; हे त्यांच्या लक्षात येत नाही. दीड एकर जमिनीवर उभी राहणारी उंच इमारत म्हणजे एखादा अक्राळविक्राळ राक्षसच आहे, असे फरसूला भासते. त्या इमारतीची सावली त्याच्या संपूर्ण जमिनीवर पसरली आहे. जणू काही त्या सावलीने त्याची जमीन, त्याचे संपूर्ण जीवनच गिळंकृत केले आहे, असे त्याला वाटत राहते. फरसू या दर्शनाने व्याकूळ होतो; विकल होतो. हा सर्व भाव ‘मातीची सावली’ या दोन शब्दांतून व्यक्त होतो.
भाषाभ्यास:
[अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती:
1. समास:
प्रश्न 1.
तक्ता भरा:
उत्तर:
समासाचे नाव | सामासिक शब्द | विग्रह |
1. समाहार वंद्व | केरकचरा | केर, कचरा वगैरे |
2. द्विगू | षण्मास | सहा महिन्यांचा समूह |
3. कर्मधारय | सुविचार | चांगला असा विचार |
4. इतरेतर द्वंद्व | इंद्रादी | इंद्र आणि इत्यादी देव |
2. शब्दसिद्धी:
प्रश्न 1. ता’ प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
SOLUTION:
ममता
नम्रता
उदारता
सुंदरता.
3. वाक्प्रचार/म्हणी:
प्रश्न 1. डोळे भरून येणे –
1. खूप रडणे
2. दुःख होणे
3. डोळ्यांत पाणी येणे.
SOLUTION:
दु:ख होणे.
[आ] भाषिक घटकांवर आधारित कृती:
1. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1. विरुद्धार्थी शब्द लिहा:
- सावली
- जन्म
- पाप
- शाप.
SOLUTION:
- सावली × ऊन
- जन्म × मृत्यू
- पाप × पुण्य
- शाप × आशीर्वाद.
प्रश्न 2. पुढील नामांआधी कंसातील योग्य विशेषणे जोडा: [चकचकीत, गुबगुबीत, गुळगुळीत, खरबरीत]
- ………… पायरी
- ………….. बोटं
- …………… घर
- …………… केळी
SOLUTION:
- गुळगुळीत पायरी
- खरबरीत बोटं
- चकचकीत घर
- गुबगुबीत केळी.
2. लेखननियम:
प्रश्न 1. अचूक शब्द निवडून लिहा:
विहिर, वीहिर, विहीर, वीहीर.
निच्शय, नीश्चय, निश्चय, नीच्शय.
ऐसपैस, एसपैस, ऐसपैस, ऐसपेस.
पूण्याई, पुण्याई, पूण्याइ, पुन्याइ
SOLUTION:
विहीर
निश्चय
ऐसपैस
पुण्याई.
3. विरामचिन्हे:
प्रश्न 1. पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा:
1. बाबा चला जेवून घ्या मनू म्हणाला
2. आबा म्हणाले अरे अया रडते काय फरसू
SOLUTION:
1. “बाबा, चला, जेवून घ्या,’ मनू म्हणाला.
2. आबा म्हणाले, “अरे, अया रडते काय फरसू?”
4. पारिभाषिक शब्द:
प्रश्न 1. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा:
Corporation
Handbill
Index
Refreshment.
SOLUTION:
महामंडळ, निगम
हस्तपत्रक.
अनुक्रमणिका
अल्पोपाहार.
मातीची सावली Summary in Marathi
प्रस्तावना:
प्रसिद्ध लेखक. कथा, बालकथा, व्यक्तिचित्रण, ललित लेखन, अनुवादित लेखन असे विविध प्रकारचे लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. प्रस्तुत पाठ म्हणजे त्यांची एक कथा आहे. आधुनिक जीवनाचा, शहरी जीवनाचा प्रभाव वाढत जाऊन शेती व शेतीवर आधारित ग्रामीण जीवन हळूहळू लोप पावत आहे. अशा वेळी नामशेष होत असलेल्या संस्कृतीच्या परंपरेच्या वारसदारांची होणारी उलघाल या कथेत सांगितली आहे. ही कथा प्रमाण भाषेतच आहे.
पण तिच्यातील संवाद हे बोलीभाषेतील आहेत. उत्तर कोकणाच्या वसईपर्यंतच्या किनारपट्टीतील परिसरात बोलली जाणारी ही एक बोली आहे. फरसू हा एक गरीब शेतकरी. तो पारंपरिक समाजजीवनाला अनुसरून जगणारा. जमीन, शेती, झाडेपाने यांच्यावर मनापासून, जिवापाड प्रेम करणारा. या सर्वांशी त्याचे रक्ताचेच नाते निर्माण झाले आहे. पूर्वजांनी जी वाट मळून ठेवली आहे, त्या वाटेने जाण्यात त्याला धन्यता वाटते. मनू त्याचा मुलगा. त्याला फरसूने वाढवले, शिकवले.
शिक्षणाच्या जोरावर त्याला आधुनिक वळणाची नोकरी लागली. त्यानंतर त्याची दृष्टीच बदलली. चकचकीत, गुळगुळीत बंगल्याच्या बदल्यात त्याने बिल्डरला जमीन विकली. फरसूच्या जगण्याच्या सगळ्या खाणाखुणा पुसून टाकणाऱ्या एकेक घटना घडू लागल्या. त्यामुळे फरसू विकल झाला. असहायतेने तो परिस्थितीला शरण गेला. त्याच्या वेदनांचे चित्रण या कथेत आलेले आहे.
शब्दार्थ:
- खरबरीत – खरखरीत.
- डाफरायची – रागाने खेकसून बोलायची.
- दुसऱ्या वितापर्यंत – [एक वासरू जन्मल्यापासून] दुसऱ्या वासराचा जन्म होईपर्यंत.
- कोरड्याठाक – पूर्ण कोरड्या.
- खोडा – हातपाय अडकवून शिक्षा करण्याचे उपकरण, उनाड गुराच्या गळ्यातील लोढणे.
- तुमश्या – तुमच्या.
- नशिबाई – नशिबाची.
- रेल – राहील.
- रेतात – राहतात.
- मेणवात – [शब्दश: अर्थ : मेणबत्तीची वात.] इथे अर्थ : प्राण.
- लागलोआ – लागला असता.
- माणसाहारकं – माणसासारखं.
- घालाशी – घालायची.
- ढोरहारकं – ढोरांसारखे, गुरांसारखे.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:
- खोडा घालणे – संकटे निर्माण करणे.
- उघड्यावर टाकणे – जबाबदारी झटकणे, जबाबदारी घेण्यास नकार देणे. जबाबदारी नाकारून असहाय स्थितीत ढकलणे.
- टकळी चालणे – बडबड करणे, सतत बोलत राहणे.
- मेणवात विझून जाणे – मरण पावणे.
- नजर लागणे – [एखादया व्यक्तीमुळे] काहीतरी वाईट घडणे.
- पापांचा घडा भरणे – सर्वनाशाचा क्षण येणे.
- संसार फुलणे – संसारात सुखसमृद्धी येणे.
- मातीला मिळणे – उद्ध्वस्त होणे, विनाश होणे.
- नाळ तुटणे – संबंध न राहणे.
- डोळे भरून येणे – डोळ्यांत पाणी येणे.
बोलीभाषेतील वाक्यांचा अनुवाद
1. वाक्ये: यी बावडी नय् नदी हय् नदी. कोणाया कामात खोडा घटला ते तुमश्या नशिबाई वाळू जाल्याशिवाय रेल का?
भाषांतर: ही विहीर नाही. नदी आहे नदी. एखादयाच्या कार्यात अडथळे आणले, तर तुमच्या नशिबाची वाळू झाल्याशिवाय राहील का?
2. वाक्ये: काय सपने बगत उबे रेतात, कोण जाणे ! अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी?
भाषांतर: कसली स्वप्ने पाहत उभे राहतात, कोण जाणे ! अख्खा दिवस आम्ही काय रांधतच [स्वयंपाक करीतच] बसायचे काय?
3. वाक्ये: नय् ते उबा जलम त्या गोठ्यात काडाला लागलोआ. आज माणसाहारकं घर मिळालंय.
भाषांतर: नाही तर उभा जन्म त्या गोठ्यात काढावा लागला असता. आज माणसासारखे घर मिळाले.
4. वाक्य: जेजूस आथं मानासुदं नेलं ते बरं होईल.
भाषांतर: हे येशू, आता मलासुद्धा नेलेस तर बरे होईल.
5. वाक्य: आमचा फरसू खरंस डोकरा जाला आथं.
भाषांतर: आमचा फरसू खरेच म्हातारा झाला आता.
6. वाक्य: तू आपला नुसता रडत बसलाय.
भाषांतर: तू आपला नुसता रडत बसला आहेस.
7. वाक्य: ते शाप मीस भोगीन.
भाषांतर: ते शाप मीच भोगीन.
8. वाक्य: माती नयेल ते ढोराअ जीवन तरी काय कामाअ?
भाषांतर: माती [जमीन] नसेल तर ते ढोराचे जीवन तरी काय कामाचे?
9. वाक्य: पण आमशी नातंपण… त्यांना कायच नय् येणार रे…
भाषांतर: पण आमची नातवंडे… त्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही रे…
मातीची सावली इयत्ता नववी स्वाध्याय । Matichi Savli Swadhyay Marathi
स्टॅन्ली गोनसाल्विस (१९५५) : प्रसिद्ध लेखक. ‘मातीची सावली’, ‘मरणात खरोखर जग हसते’ हे
कथासंग्रह; ‘मोझेसची काठी’ हा लघुकथासंग्रह; ‘रक्त नव्हे, प्रेम हवे’ हा बालकथासंग्रह; ‘बायबलमधील
व्यक्ती’, ‘ह्याला जीवन ऐसे नाव’ हे अनुवादित लेखन प्रसिद्ध. विविध नियतकालिके व दिवाळी अंकांतून
सातत्याने कथा व ललित लेखन प्रसिद्ध.
वाडवळी या बोलीभाषेत लिहिलेली ही कथा आहे. मातीवर प्रेम करणाऱ्या फरसूच्या मनातील विविध
भावनांचे वर्णन केले आहे. प्रस्तुत पाठ ‘मातीची सावली’ या कथासंग्रहातून घेतला आहे.
मातीची सावली
फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. आपली खरबरीत बोटं त्याने गुळगुळीत पायरीवरून
फिरवली. मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून तो आभाळाकडे बघत बसला.
‘‘उठा जरा, आत जाऊन बसा,’’ सुनेचा आवाज आला.
दरवाजाच्या चौकटीला धरून फरसू उठला. त्याच्या पायांची हाडं कडकडली. आतल्या खोलीत
येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. ह्या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं. पाय वर घेऊन
बसले, तरी सून डाफरायची. असं बसणं त्याला कधी ठाऊक नव्हतं. जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस
बसायची त्याची तेवढीच जुनी सवय. दारातच चिंचेचं पुराणं झाड होतं.
मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा
घरभर भरून राहायचा. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची. मंगलोरी कौलांच्या
नळ्यांतून फुंकर मारावी तसं वारं घुमायचं.
फरसू पायरीवर बसायचा. वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पानं, झाडावर चढणाऱ्या खारी पाहणं
हा त्याचा फावल्या वेळचा उद्योग होता.
रात्री जेवणखाण आटोपल्यावर तो आणि आबू उशिरापर्यंत चिंचेच्या मुळांवर बसायचे. पानांतून
पाझरणारं चांदणं अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायच्या.. गुरंढोरं, वाडी, गावकीतली प्रकरणं.. असे
अनेक विषय. कधीमधी इनूस मास्तर यायचे. पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगायचे. अमेरिकेत की कुठे
घडणारी ती नवलं फरसू व आबू मोठ्या नवलाईने ऐकायचे.
चिंचेचा पाला खूप गोळा
व्हायचा.
फरसूच्या लेखी ते
सारं खत होतं. पान न् पान जमा
करून तो वाडीत टाकायचा. या
एका झाडाने त्याच्या जमिनीला
अशी काळी कसदार बनवली
होती, की त्याला कधी खत
विकत आणावं लागलं नाही.
पावसाळ्यात हिरवीगच्च
झालेली त्याची भातं पाहून
गावकरी मनोमन जळायचे.
भाताचं झळाळणारं सोनं घरात येऊन पडलं, की वांगी, दुधी, कारली यांची लागवड व्हायची. फरसू व
त्याची मंडळी पाठीचा कणा दुखेपर्यंत राबायची. त्याची विहीरसुद्धा तशीच पाणीदार होती. दुसऱ्या
स्टॅन्ली गोनसाल्विस (१९५५) : प्रसिद्ध लेखक. ‘मातीची सावली’, ‘मरणात खरोखर जग हसते’ हे
कथासंग्रह; ‘मोझेसची काठी’ हा लघुकथासंग्रह; ‘रक्त नव्हे, प्रेम हवे’ हा बालकथासंग्रह; ‘बायबलमधील
व्यक्ती’, ‘ह्याला जीवन ऐसे नाव’ हे अनुवादित लेखन प्रसिद्ध. विविध नियतकालिके व दिवाळी अंकांतून
सातत्याने कथा व ललित लेखन प्रसिद्ध.
वाडवळी या बोलीभाषेत लिहिलेली ही कथा आहे. मातीवर प्रेम करणाऱ्या फरसूच्या मनातील विविध
भावनांचे वर्णन केले आहे. प्रस्तुत पाठ ‘मातीची सावली’ या कथासंग्रहातून घेतला आहे.
११. मातीची सावली भाग - ३
47
वितापर्यंत दूध देणाऱ्या गाईसारखी. भर वैशाखातसुद्धा तिला भरपूर पाणी असायचं.
एका दुष्काळात गावातल्या साऱ्या विहिरी कोरड्याठाक पडल्या होत्या; पण फरसूच्या विहिरीतील
पाण्याला काही अंत नव्हता. फरसू म्हणायचा,‘‘बापजाद्यांची कमायी रे पोरांनो ! त्यांचीच पुण्यायी यी
बावडी नय् नदी हय् नदी. कोणाया कामात खोडा घटला ते तुमश्या नशिबाई वाळू जाल्याशिवाय रेल का?..
मंग या दीड एकराया तुकड्यावर माज्या घरातले उंदीर तरी जगतील का?’’
त्या दीड एकराच्या तुकड्यावर त्याने चार पोरं वाढवली. तीन पोरींची लग्न करून सासरी पाठवल्या.
तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. मनू शेवटचा.
फरसू तिसरी-चौथीच्या पुढे गेला नव्हता. मनूला त्याने शिकवलं. कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत
तो कामाला आहे. मातीत बोटं घालायला तो नाखूश असतो, हे फरसूला कधीच जाणवलं होतं; पण तो
काहीच बोलायचा नाही. हातपाय चालतील तोवर ह्या मातीची चाकरी करायची, हे त्यानं व त्याच्या
मंडळीनं कधीच ठरवलं होतं. पोटच्या पोरांइतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर
उघड्यावर टाकायचं नाही, हा त्यांचा निश्चय होता.
‘‘बाबा, चला, जेवून घ्या.’’ मनूचा आवाज ऐकून फरसू दचकला. तो उठून उभा राहिला. किंचित
थकल्यागत वाटले त्याला... हं! पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत.
झाडापानांना आधार देऊन वाढवताना
हयात गेली. आपला आधार तर कधीच तुटून पडला.. आता स्वतःला सांभाळायला पाहिजे.. आपणच
आपला आधार आता..
‘‘काय सपनं बगत उबे रेतात, कोण जाणे ! अख्खा दिवस रांदीतच बसावं का आमी? ’’ फरसूच्या
कानावर येईल इतकाच आवाज स्वयंपाकघरातून येत होता. स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलावर
येऊन बसला.
तिघंही मुकाट जेवत होते. ही खाणावळ फरसूच्या घशातून घास उतरू देत नव्हती. रोजचे हे मुके घास
त्याच्या डोळ्यांत आसवं आणत होते.
पूर्वी जुन्या घराच्या त्या अंधाऱ्या पडवीत जेवणं व्हायची. मनूची आई प्रार्थना करायची.. ‘आमचे
बापा, तू सर्गात आहेस.....’
एकसुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचं. मनूच्या आईची टकळी चालायची. मनू तर जेवता
जेवता उठून नीना, सिबलशी मस्ती करायचा. तासभर जायचा जेवणाच्या गडबडीत... मनं रिती व्हायची
घासागणिक पोटात माया उतरायची.. जेवण तरी काय असायचं.. एखादी भाजी, कधी डाळ, सुके बोंबील,
भात आणि तांदळाच्या रोट्या, असंच काहीतरी..
पण, तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊसवाऱ्यात जमिनीवर झोपावं, तसा
आपला संसार होत्याचा नव्हता झाला. वाडीत खपताना पायाला तार की खिळा लागला आणि
आठवडाभरातच बायको-कोसूची मेणवात विझून गेली!
कोणाची नजर लागली, की पणजांची पुण्याई
संपली? की गेल्या जन्मीच्या पापांचा घडा आता वाहत आहे? नाही, नाही.. हा मातीचाच शाप असणार.
ज्या मातीने हा संसार फुलवला त्याच मातीला उजाड केलं आपण.. कारली-वांग्यासारखा तिचा बाजार
मांडला. मनूने जमीन विकायला काढली व आपण बैलासारखी मान डोलवली. ‘‘मनू , अरे पोरा, बोल रे
कायतरी.. , ’’ फरसू न राहवून उमाळ्याने बोलून गेला, ‘‘ अरे , तू जमीन इकली मणून माज्या मनात कांय
राग नय् का तुआ दुस्वास नय्.. आमसा जलम त्या मातीत गेल्ता मणून थोडं वायीट वाटते..’’
‘‘बाबा, जमीन इकली म्हणून आज ओ बंगला बांदता आला, नय् ते उबा जलम त्या गोठ्यात
काडाला लागलोआ. आज माणसाहारकं घर मिळालंय, परमेसराये आभार माना.. नायतर तुमसं आपलं,
माजी जमीन गेली, माजी जमीन गेली, चालूच.’’
48
पाल अंगावर पडावी, तसे मनूचे शब्द ऐकून फरसूचे अंग थरारले. सूनबाई जेवायची थांबली होती.
मनूच्या चेहऱ्यावर घर बांधल्याचा अभिमान काठोकाठ पसरला होता. फरसूला पोटात खड्डा पडल्यासारखं
झालं. पुढ्यातली बशी सरकवून तो उठला.
सूनबाई जेवू लागली. मनूही जेवू लागला.
फरसू खांदे पाडून, मान खाली घालून अंगणात आला.
बिल्डरने मनूला सुंदर, आटोपशीर बंगला बांधून दिला. त्याच्या समोरच त्याची भलीमोठी इमारत
आकाराला येत होती.
फरसूला वाटलं, जमिनीवरनं ट्रॅक्टर फिरला, बागायत मातीला मिळाली, मोठाले खड्डे खणले गेले,
भलंमोठं दगडविटांचं धूड तिच्यावर उभारलं गेलं, तेव्हा त्या मायला काय वाटलं असेल? आणि या
मातीशी नाळ तुटली की माणूसपण तरी कसं राहणार? पाय मातीवर असतात, तोवरच माणूस माणूस
असतो.. पोराने मातीशी नातं राखलं नाही, आता बापाशीही नातं सांगत नाही. सिमेंट, दगड, धोंड्यांशी का
कधी माणसाचं नातं सांधलं जातं? मातीनंच घडवलंय ना आपणा सर्वांना? आणि शेवटी तिच्याच तर
कुशीत विश्रांतीसाठी जायचं आहे.. तिलाच विकून आम्ही या गुळगुळीत, चकचकीत घरात राहायला
आलो..
चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिबकायचं. घरातील जुनीपुराणी
वस्तूविकावी, तसं ते झाडही गेलं. आंबा, फणस, भेंडी, नेवर.. सारी जमीनदोस्त झाली.
मनू एकदा म्हणाला,
‘‘ यी झाडं मणजे नुस्ता कचरा.. उंदीर कवडे येतात घरात... आपल्या बंगल्यापुडं
यी जंगली झाडं अजिबात शोभत नाय.. कापून मस्त गुलाब लावू..’’
तेव्हा फरसू उत्तरला होता, ‘‘पोरा, झाडं जंगली नसतात रे कवा ! आपण माणसंच जंगली.. कुराडी
घेऊन झाडं कापणारी आपण माणसंच जंगली रे, मनू..’’
फरसूच्या जन्माआधीची ती झाडं फरसूच्या डोळ्यांदेखत तोडली गेली. मनूने त्या ठिकाणी इंग्लिश
गुलाबांची बाग फुलवली.
‘‘ फरसू ऽऽ, फरसू अरे रातच्या पारा एकटाच बायेर काय करते?’’ आबूचा आवाज ऐकून फरसू
थोडा भानावर आला.
‘‘आबू, बग पयली माजी बायको कोसू गेली.. मंगं जमीन गेली... घर सुद्धा पाडून टाकीलं न् शेवटी
ती चिंच पण कापिली.. माजा एकटा पूत.. तो सुदं आथं माजा नय् रायला रे … जेजूस आथं मानासुदं नेलं
ते बरं होईल.. ’’
‘‘अरे, अया रडते काय फरसू ? मी.. तुजा दोस्त आबू हय्, इनूस मास्तर हय.. अं? न तुजा पोरगा,
सूनबाय, पोरी, जावांय हत् नं? कोणी तुला टाकणार नय? आमचा फरसू खरंस डोकरा जाला आथं..’’
आबू उसनं हसत म्हणाला.
‘‘ आबू, यी माया रगताई माणसं.. पण जमीन इकली,
पैशे आले न् ते बापाला इसरले.. आता माजं
कोणी नय् रायलं! माजी जमीन गेली.. मी तिला ईकून टाकलं.. मनूनं कागद आणला, मी सयी केली.. मी
बेईमानी केली.. माज्या मायला फशीलं.. ’’
‘‘ अरे येड्या, किती लोक जमिनी ईकितात. तू आपला नुस्ता रडत बवलाय.. बग, टोपलीभर पैसा
मिळालाय मनूला.. आथं मातीत हात घालाशी गरज नय्.. सुखात खा मरेपरत.. ’’
‘‘ तो पैसा नय् रे आबू.. ते आमशा आजा, पणजाअं रगत हय्.. रगताअं नातं तुटे नय्.. रगताये शाप
भोगाला लागतात.. ते शाप मीस भोगीन.. आथं पैसा नय् का सुख नय्.. जेजूस माफ कर रे ! ’’
फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिले.
‘‘ येड्या, फरसू, लोकं जमिनी ईकून मजा करतात. गाड्या घेतात.. बंगले बांदतात.. तुला आपलं
49
जलमभर ढोरहारकं खपाला पाये..’’
‘‘ तू सुदं त्या बिल्डरहारका जाला रे, आबू!’’ फरसूने आवाज चढवत त्याला फटकारले. मग
त्याच्याकडे पाठ वळवून तो खालच्या आवाजात म्हणाला, ‘‘ माती नयेल ते ढोराअ जीवन तरी काय
कामाअ?
आबू, आमी लागले रे आथं वाटेल.. पण आमशी नातंपण.. त्यांना कायच नय् रेणार रे.. त्यांना
पायाखालती जमीनच नय् रे..’’
‘‘पुढचं पुढे बगून घेतील ते,’’ आबू त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, ‘‘ आजकालशी पोरं खूप
हुशार हायेत.. त्यांशे पाय जमिनीवर नाय.. यी पोरं बोटीवर जातात.. ईमानात जातात.. अरबस्तानात,
इंग्लंड, अमेरिका कटे कटे गेल्यात पोरं आपली… चल तू, टाइम बग कवडा जाला.. जा, नीज..’’
आबू निघून गेला. त्याची सावली मांजरीसारखी घुटमळत त्याच्या मागे गेली.
फरसू पाठमोऱ्या आबूकडे पाहतच राहिला. अचानक त्याची नजर डावीकडे वळली. त्याच्या दीड
एकराच्या तुकड्यातून ती भलीमोठी इमारत कोंभासारखी वरवर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूड
अक्राळविक्राळ भासत होतं. इमारतीची काळी ठिप्पूस सावली झाडंझुडपं सपाट केलेल्या शेताला
कवटाळत सुस्तावल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती.
फरसूला वाटलं, ही आपल्या मातीची सावली आहे.
मातीची सावली इयत्ता नववी स्वाध्याय । Matichi Savli Swadhyay Marathi
- Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 11 मातीची सावली Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
- Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 11 मातीची सावली
- 9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 11 मातीची सावली Textbook Questions and Answers
- मातीची सावली प्रश्न उत्तर
- मातीची सावली पाठ
- मातीची सावली इयत्ता नववी
- मातीची सावली मराठी स्वाध्याय
- मातीची सावली धडा
- 11 मातीची सावली
- नववी मराठी मातीची सावली स्वाध्याय
- मातीची सावली स्वाध्याय
- मातीची सावली या धड्याचे प्रश्न उत्तरे
- 9 वी मराठी मातीची सावली स्वाध्याय