संतवाणी मराठी ( जैसा वृक्ष नेणे )
जैसा वृक्ष नेणे मान अपमान ।
तैसे ते सज्जन वर्तताती ।।१।।
येऊनियां पूजा प्राणि जे करिती ।
त्याचें सुख चित्तीं तया नाही ।।२।।
अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती।
तया न म्हणती छेदूं नका ।।३।।
निंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।४।।
नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी ।
तरी जीव शिवा गांठी पडूनि जाय ।।५।।
संत नामदेव (१२७०-१३५०) : वारकरी संप्रदायातील संतकवी. संत नामदेवांची अभंगरचना
अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी
हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली.
शिखांच्या ‘गुरु ग्रंथसाहेब’ या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवने समाविष्ट असून ‘भक्त नामेदवजी
की मुखबानी’ या नावाने ती प्रसिद्ध आहे. संत नामदेवांची अभंगगाथा पुस्तकरूपाने १८९२
मध्ये प्रथम लोकांसमोर आली. प्रस्तुत अभंगामध्येसंतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे.
संतवाणी- ( धरिला पंढरीचा चोर )
धरिला पंढरीचा चोर ।
गळां बांधोनियां दोर ।।१।।
हृदय बंदिखाना केला ।
आंत विठ्ठल कोंडिला ।।२।।
शब्दें केली जवाजुडी ।
विठ्ठल पायीं घातली बेडी ।।३।।
सोहं शब्दाचा मारा केला ।
विठ्ठल काकुलती आला ।।४।।
जनी म्हणे बा विठ्ठला ।
जीवें न सोडीं मी तुला ।।५।।
संत जनाबाई : वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. संत नामदेवांच्या शिष्या. त्यांना संत
नामदेवांच्या सान्निध्यात विठ्ठलभक्तीचा ध्यास लागला. संत जनाबाईंनी विपुल काव्यरचना
केली आहे. विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत
भरलेली आहे.
प्रस्तुत अभंगात संत जनाबाईंनी भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसे प्राप्त केले,
याबाबतचे वर्णन केले आहे.
संतवाणी मराठी ( जैसा वृक्ष नेणे - धरिला पंढरीचा चोर ) मराठी 9th
Tags:
मराठी कविता