हसवाफसवी स्वाध्याय | Hasva Fasvi Swadhayay 11th | Balbharati solutions for Marathi 11th
कृती 1.
प्रश्न अ. कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
Solution
प्रश्न आ. कारणे लिहा.
1. फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण…
Solution
कृष्णराव हेरंबकर हे एक ज्येष्ठ संगीत नाट्यकलावंत. रंगमंचावर काम केल्यामुळे त्यांना तशी प्रकाश, लाईट यांची सवय असतेच. पण आता त्यांचे वय झाले होते. त्यात त्यांच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री. वाघमारे शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत असताना तिथला फोटोग्राफर त्यांना न विचारता, न सांगता आगंतुकासारखे त्यांचे फोटो काढत असतो. तो सारखं त्यांना ‘इथे बघा’, ‘तिथे बघा’ अशा सूचना देत असतो. त्यामुळे कॅमेऱ्याचा प्रखर प्रकाश हेरंबकरांच्या डोळ्यांवर पड्न त्यांना त्रास होत असतो. डॉक्टरांनी प्रखर प्रकाशाला सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्त मनाई केलेली असते. म्हणून ते फोटोग्राफरवर चिडतात आणि परत आलास तर थोबाडीत देईन अशी धमकी त्याला देतात.
2. कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार झाले कारण”
Solution
कृष्णराव हेरंबकर हे स्वत:च्या सत्कार समारंभासाठी कोकणातून थेट मुंबईला येत असतात. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवासभत्ता मिळणार असतो. वाटेत ट्रेनमध्ये एक चाहता त्यांना भेटतो. या चाहत्याने अगदी लहानपणापासून हेरंबकर यांची नाटके पाहिलेली आहेत. तो त्यांना त्याच्या कर्जतच्या घरी चलण्यासाठी आग्रह करत असतो. त्याचा आग्रह कृष्णराव हेरंबकर यांना मोडवत नाही. कारण तो त्याच्या डॉज गाडीतून कृष्णरावांना मुंबईपर्यंत सोडेन असे आश्वासन देतो. प्रत्यक्षात गाडी एकदम खटारा असते. रस्त्यात तिचा एकेक टायर पंक्चर होत जातो. शेवटी चारही टायर सपाट झाल्यावर गाडी रस्त्यातच बसते. त्यावेळी कोंबड्यांच्या गाडीत त्यांना लिफ्ट मिळते. मुंबईच्या कार्यक्रमाला जायला उशीर होत असल्याने नाईलाजास्तव कृष्णराव हेरंबकर कोंबड्यांच्या गाडीत बसायला तयार होतात.
2. थोडक्यात वर्णन करा.
प्रश्न अ. कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
Solution
कृष्णराव या ज्येष्ठ अशा संगीत नाट्य कलाकाराच्या सत्कार समारभाचे आयोजन मुंबई येथे श्री. वाघमारे यांनी केलेले असते. त्यासाठी त्यांना पैशाची थैली व प्रवासखर्च देण्यात येईल अशी बोली झालेली असते. म्हणूनच कृष्णराव या सत्कार समारंभात यायला तयार झाले आहेत. या समारंभात त्यांना शाल व श्रीफळ देण्यात येते. धांदरट वाघमारे शाल प्रदान करताना शालीत कृष्णरावांना पार गुरफटवून टाकतात. श्रीफळ दिल्यानंतर कृष्णराव कानाशी श्रीफळ नेऊन त्यात पाणी आहे की नाही ते हलवून बघतात. हे सर्व घडत असताना एक फोटोग्राफर मध्ये मध्ये येऊन कॅमेऱ्याचा फ्लॅश त्यांच्या डोळ्यावर मारून सतत त्यांचे फोटो काढत असतो. असा मजेशीर प्रसंग सत्कारसमारंभात घडतो.
प्रश्न आ. कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.
Solution
कृष्णराव हेरंबकर या कोकणात वास्तव्य करणाऱ्या संगीत नाट्य कलाकाराचा मुंबई येथे सत्कार होणार असतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते सपत्नीक कोकणातील अंबुर्डी या गावातून टांग्यातून प्रवास करत कुंदनपूरला पोहोचतात. तिथून मग ते एस.टी पकडतात आणि पुण्याला पोहोचतात. मग तिथून ट्रेनेन मुंबईला येत असताना एका चाहत्याच्या आग्रहाला बळी पडून कर्जतला त्याच्या बंगल्यावर जातात.
3. थोडक्यात लिहा.
प्रश्न अ. मुंबईला जात असलेल्या आगगाडीतील प्रसंग.
Solution
ज्येष्ठ नाटककार कृष्णराव हेरंबकर स्वत:च्या सत्कार समारभासाठी कोकणातल्या अंबुर्डी गावाहून मुंबईला यायला निघालेले असतात. टांगा, एस.टी असा प्रवास करत पुण्याहून ट्रेनने मुंबईला येत असताना त्यांच्या नाटकाचा निस्सिम चाहता त्यांना ट्रेनमध्ये भेटतो. कृष्णरावांना पाहून त्याला आनंदाचे भरते येते. ते इतके की तो थेट ट्रेनमध्येच कृष्णरावांना साष्टांग नमस्कार घालतो. अतिउत्साहाच्या भरात ट्रेनमध्ये बसलेल्या गुजराती बायकांना आपले पाय लागले हे ही त्याच्या ध्यानात येत नाही. त्याच्या पायाच्या धक्क्याने त्या बायकांच्या हातातले फरसाण आणि पापडी खाली सांडते. फरसाण खाली पडताना, त्यातील मसाला त्या गुजराती बायकांच्या नाकातोंडात जातो. तरीही हा चाहता स्वत:च्या आनंदात मश्गूल असतो. “माझ्या कर्जतच्या घरी तुम्ही येण्याचे कबुल करत असाल तरच मी तुमचे पाय सोडेन.” अशी धमकीवजा सूचना तो कृष्णराव यांना करतो. जोपर्यंत ते हो म्हणत नाहीत तोपर्यंत त्यांचे पाय गदागदा हालवत राहतो. शेवटी ते पडतील या भीतीने बायको त्यांना होकार दयायला लावते.
प्रश्न आ. कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.
Solution
ज्येष्ठ नाटककार कृष्णराव कोकण ते मुंबई असा प्रवास करत असतात. याचे कारण असते मुंबईत संयोजक वाघमारे यांनी आयोजित केलेला त्यांचा सत्कार समारंभ. टांगा-एस.टी., ट्रेन असा टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवास चालला आहे. ट्रेनमध्ये प्रवासात त्यांना त्यांच्या नाटकांवर, त्यांच्या अभिनयावर, त्यांच्या गायकीवर प्रेम करणारा चाहता भेटतो. गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये हा कृष्णरावांना साक्षात साष्टांग नमस्कार घालतो. त्यांच्या पायात आडवे पडून पाय गदागदा हलवतो व “कर्जतच्या माझ्या घरी यायला तयार झाल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही.” असा धमकीवजा इशारा देतो. शेवटी कृष्णराव कर्जतला त्याच्या घरी जाण्यास तयार होतात. या चाहत्याने अगदी लहानपणापासून कृष्णरावांची नाटके पाहिली आहेत. तो प्रेमाने कृष्णराव व त्यांची पत्नी यांना कर्जतच्या बंगल्यावर घेऊन जातो. तिथे त्या दोघांना ओवाळतो आणि निघताना कोथिंबिरीच्या २१ जुड्या भेट म्हणून देतो. शिवाय मुंबईपर्यत जाण्यासाठी स्वतःची डॉज गाडी ड्रायव्हर सकट देतो.
4. स्वमत.
प्रश्न अ. प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा.
Solution
‘हसवाफसवी’ ही नाट्यसंहिता दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली आहे. कृष्णराव हेरंबकर या संगीत नाट्यकलावंताचा सत्कार समारभ संयोजक श्री. वाघमारे यांनी मुंबईला आयोजित केला आहे. या समारंभात कृष्णराव सपत्नीक हजर होतात. वय वर्षे ८७ पण तरीही तल्लख मेंदू, बोलण्यात मिस्किलपणा. तर वागण्यात खट्याळपणा. प्रसंगनिष्ठ विनोद आणि शब्दनिष्ठ विनोद यांचे उत्कृष्ट बेअरिंग सांभाळत आपल्या बोलण्याने आणि कृतीने सतत हास्याची कारंजी उडवतात. अनेक पावसाळे पाहिल्यामुळे अनुभवातून आता शहाणपण आले आहे.
त्यामुळेच सत्कार स्वीकारताना मिळालेले श्रीफळ हे कानाजवळ नेऊन हलवून पाहतात आणि आत पाणी असल्याची खात्री करून घेतात. प्रवासभत्ता व थैली मिळणार होती त्याचे काय झाले हे सारखे विचारून घेतात व स्वत:तील व्यवहार शहाणपणा दाखवून देतात. कोकणी माणसाचा स्वभाव, त्यांची तैलबुद्धी त्यांच्या नसानसांत भिनलेली आहे. आपल्यातील कलाकाराचा त्यांना अभिमान आहे. खाडिलकर, गडकरी, देवल इत्यादी श्रेष्ठ नाटककारांच्या नाटकात आपण काम केले आहे ही बाब त्यांच्यातील कलाकाराला सुखावते. कोकण ते मुंबई हा प्रवास किती त्रासदायक आहे हे ते अत्यंत मार्मिकतेने स्पष्ट करतात. आपला चाहता वर्ग आजही आपल्यावर तेवढेच प्रेम करतो या भावनेने ते सुखावतात.
म्हणूनच ट्रेनमध्ये भेटलेल्या चाहत्याच्या आग्रहामुळे वाट वाकडी करून कर्जतला त्याच्या बंगल्यावर जातात. या चाहत्याने त्यांना घातलेला साष्टांग नमस्कार, त्याचे गुजराती बायकांना लागलेले पाय, त्या बायकांच्या हातातील खाली पडलेले फरसाण याचे ते साग्रसंगीत विनोदी ढंगाने वर्णन करतात आणि स्वत:मधील मिश्किलपणाचे दर्शन घडवतात. ‘उतारवयात काय करता?’ या प्रश्नाचे उत्तर ‘आत्मचरित्र लिहितो’ असे देतात व कलाकाराला म्हातारपणी असे उदयोग करून पैसा कमवावा लागतो हे सांगून या मायावी दुनियेची दुसरी वास्तव बाजू उघड करतात.
मुद्दामहून एखादयाच्या नावाचा विचित्र उच्चार करून विनोद निर्माण करणे त्यांना आवडते. कर्जतहून मुंबईकडे प्रवास करताना चाहत्याने दिलेली डॉज गाडी बंद पडल्यामुळे त्यांना कोंबड्यांच्या गाडीतून प्रवास करावा लागतो. त्याही गाडीचा अपघात होतो. पण चाहत्यांच्या प्रेमाचे पुण्य पाठीशी असल्याने आपण वाचलो अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात. आगरकरांनी त्यांच्या ‘सुधारक’ या पत्रात त्यांना ‘कृष्णराव’ हे नाव दिले याचे त्यांना विशेष कौतुक वाटते. पूर्वी काळी दोन मध्ये गाणारे कृष्णराव आता काळी शून्य मध्ये तरी गाऊ शकतील की नाही यविषयी खंत व्यक्त करतात.
असे अत्यंत मार्मिक, विनोदी, व्यवहारदक्ष तरीही आतून हळवे असणारे कृष्णराव रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून आहेत. वय झाले तरी त्यांचा उत्साह संपलेला नाही. माणसामाणसांतील आपुलकी जपावी. पडदयामागील साथीदारांशी देखील जिव्हाळ्याने बोलावे, त्यांना प्रोत्साहन दयावे हा त्यांचा स्वभावविशेष आहे. कारण शेवटी नाटक हे टीमवर्क आहे याची त्यांना जाण आहे. स्वत:च्या आरोग्याविषयी ते दक्ष आहेत. त्यासाठी पाळावी लागणारी पथ्य जगाला सांगून सगळ्यांना शहाणे करून सोडावे या प्रवृत्तीचे ते आहेत.
प्रश्न आ. ‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
Solution
नाटकात महत्त्वाची असते ती संहिता. संहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार तितके नाटकाचे यश खात्रीलायक असते. नाटकाचे कथानक, शब्द जितके सशक्त तितके नाटक अधिक उंचीवर जाते. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद! खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. नाट्यविषयाला साजेसे संवाद असतील तर आशय प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो. संवाद, रंगसूचना आणि स्वगत या तीन्ही गोष्टी मिळून नाट्यसंहिता तयार होते. कथानकातील प्रसंगबदल, दृश्यबदल, बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो. त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जातात. संदर्भ अधिक स्पष्ट होतात. कथानकाचा प्रवाह वेगात पुढे जातो.
प्रश्न इ. प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
Solution
प्रस्तुत उताऱ्यातील दोन शाब्दिक विनोदाच्या उदाहरणांतून दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. पहिला प्रसंग म्हणजे कार्यक्रम संयोजकांची साहाय्यक मोनिका ही आपले नाव सांगते त्यावेळी कृष्णराव ‘मनुका’ असा तिचा उल्लेख करतात. आणि दोन्हीचा अर्थ एकच असे स्पष्टीकरण देतात. मोनिका - मनुका अशी जोडी निर्माण करून त्यातून शब्दनिष्ठ विनादाची पेरणी करतात. मोनिका ही गोड स्त्री आणि मनुका हे गोड फळ. त्यामुळे मोनिका जेव्हा नावाची दुरुस्ती करते तेव्हा दोन्हीचा अर्थ एकच आहे असे सांगून कृष्णराव शब्दकोटी करतात.
दुसऱ्या प्रसंगात मोनिका त्यांना “सध्या काय करता ? असा प्रश्न विचारते तेव्हा ‘आत्मचरित्र लिहतोय’ आणि त्याचे नाव ‘एक झाड - दोन कावळे’ असे आहे हे स्पष्ट करतात. त्यावर मोनिकाचा पुढचा प्रश्न असतो. प्रकृती कशी आहे ? या प्रश्नाचा रोख खरंतर कृष्णरावांची प्रकृती कशी आहे याकडे असतो पण मुद्दाम आपल्याला प्रश्नाचा रोख कळला नाही असे दाखवून कृष्णराव कुणाची, कावळ्यांची? असे विचारून तिला निरुत्तर करतात.
शाब्दिक विनोदाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. मोनिका तिच्या भूमिकेनुसार त्यांना त्यांची नाटके, दौरे, गायन यांविषयी प्रश्न विचारत राहते आणि कृष्णराव हेकेखोरपणे त्यांना हवी ती भलत्याच विषयाची उत्तरे देत बसतात. म्हणजे प्रश्न एका विषयाचा तर उत्तर भलत्या विषयाचे अशी रचना लेखकाने केली आहे. त्यातून शाब्दिक विनोद तर कधी प्रासंगिक विनोद घडत राहतात. कोंबड्यांच्या गाडीतून त्यांनी केलेला प्रवास किंवा ट्रेनमध्ये एका चाहत्याने भर गर्दीत घातलेला साष्टांग नमस्कार हे प्रसंग बोलण्याच्या ओघात येतात आणि त्यातून प्रंसगनिष्ठ विनोद घडत जातो.
हसवाफसवी स्वाध्याय | Hasva Fasvi Swadhayay 11th | Balbharati solutions for Marathi 11th
प्रश्न अ. मोनिका व कृष्णराव यांच्यातील संवादाची तुम्हाला समजलेली वैशिष्ट्ये लिहा.
प्रश्न आ. कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
Solution
संगीत नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन संयोजक वाघमारे यांनी मुंबईला केलेले असते. या कार्यक्रमासाठी आपल्या पत्नीसह कोकणातून मुंबईपर्यंतचा प्रवास करत कृष्णराव येतात. कृष्णरावांच्या बऱ्यावाईट काळात पत्नीने त्यांना मनापासून साथ दिली आहे याची कृष्णरावांना जाण आहे. आपल्या पत्नीला आपली खूप काळजी आहे याचे त्यांना विशेष कौतुक आहे. ट्रेन प्रवासात एक चाहता त्यांच्या पायात पडून पाय गदागदा हलवतो आणि माझ्या घरी येण्याचे कबुल केल्याशिवाय पाय सोडणार नाही अशी आदेशवजा धमकी देतो.
त्यावेळी गदागदा हलणाऱ्या पायांमुळे कृष्णराव पडतील अशी भीती वाटून पत्नी त्यांना चाहत्याचे आमंत्रण स्वीकारायला लावते. तिला प्रसिद्धीची अजिबात हौस नाही. त्यामुळे संयोजक रंगमंचावर तिने यावे याविषयी आग्रही असतानाही ती सामान्य रसिकांप्रमाणे प्रेक्षकांत बसणे पसंत करते. ग्रामीण भागात वास्तव्य असल्याने असेल कदाचित पण ती पशु - पक्षी - प्राणी यांच्यावर मनापासून प्रेम करते. म्हणूनच कर्जत ते मुंबई हा प्रवास करताना कोंबड्यांच्या गाडीतून प्रवास करावा लागतो तरी ती कटकट करत नाही. उलट कोंबड्यांशी सवाद साधत तिचा प्रवास मजेत पार पडतो.
कृष्णराव खूप बडबड करतात, अनावश्यक गोष्टी लोकांना सांगत बसतात हे तिला आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या संवादाची गाडी स्टेजवर घसरली तर ती प्रेक्षकांमध्ये बसून त्यांना ‘पुरे पुरे’ चे इशारे करते. तिला प्रखर दिव्यांची तसेच लोकांसमोर येण्याची भीती वाटते कारण गावाकडील घरात ती कंदिलाच्या प्रकाशात वावरते. अशी अत्यंत साधी भोळी, पतीला सर्व ठिकाणी मनापासून साथ देणारी पण पतीच्या प्रसिद्धी वलयापासून दूर राहणारी कृष्णरावांची पत्नी सामान्य प्रेमळ स्त्रीचे प्रतिनिधित्व करते.
प्रश्न इ. ‘पायधूळ झाडा. त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही’, या वाक्यांतील लक्ष्यार्थ स्पष्ट करा.
Solution
लक्ष्यार्थ म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ संदर्भानुसार समजून घेणे. म्हणजे शब्दश: अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ लक्षात घेणे. दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला ‘लक्षणा’ असे म्हणतात आणि त्यातून सूचित झालेल्या दुसऱ्या अर्थाला ‘लक्ष्यार्थ असे म्हणतात. वरील वाक्यात ‘लक्ष्यार्थ’ या भाषिक संपत्तीचा यथार्थ वापर केला आहे.
‘पायधूळ झाडणे’ याचा सरळ शब्दश: अर्थ म्हणजे पायाला लागलेली धूळ झाडणे. हे वाक्य कृष्णराव यांच्या चाहत्याच्या तोंडी आहे. ट्रेनमध्ये कृष्णराव भेटल्यानंतर त्याला अतिशय आनंद होतो. अतिउत्साहाने तो भर ट्रेनमध्ये त्यांना साष्टांग नमस्कार घालत त्यांच्या पायाशी लोटांगण घालतो आणि वरील वाक्य उच्चारतो. त्याचा अर्थ ‘तुमच्या पायाची धूळ जोपर्यंत तुम्ही माझ्या घरात झाडणार नाही म्हणजेच जोपर्यंत तुम्ही माझ्या घरी येणार नाहीत, तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. असा इशारा तो देतो. म्हणजेच इथे शब्दांच्या मूळ अर्थापक्षा वेगळा अर्थ संदर्भानुसार सूचित होतो म्हणून हे ‘लक्ष्यार्थ’ भाषिक शक्तीचे उत्तम उदाहरण आहे.
कृती : २ खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
प्रश्न 1. ‘कृष्णराव’ हे नाव ज्या भूमिकेवरून पडले ती भूमिका व नाटक
Solution
प्रश्न 2.
आगरकरांनी प्रसिद्ध केलेले पत्रक - [ ]
Solution
सुधारक
आम्हांला कुठल्याही दिव्याचं काही वाटत नाही ……………………………….. पुरे, पुरे, किती गातोस. [पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७२)
प्रश्न 3.
नाटक करण्यामागे कृष्णरावांचा हेतू -
Solution
लोकांचं रंजन करणे.
प्रश्न 4.
आगरकर आणि टिळक यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकणारे परिच्छेदातील वाक्य.
Solution
आगरकर व टिळक या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते.
प्रश्न 5. नाटकात उल्लेख झालेले थोर नाटककार
[ ] [ ] [ ]
Solution
[गडकरी] [खाडिलकर] [देवल]
स्वमतः
प्रश्न 1. कृष्णराव गात असताना पांडू शिवलीकर यांच्यावर ओढवणारा प्रसंग तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Solution
कृष्णराव हेरंबकर हे संगीत नाटकांमध्ये काम करणारे हरहुन्नरी कलाकार आहेत. राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी खाडिलकर इत्यादी नाटककारांनी निर्माण केलेल्या संगीत नाटकात कृष्णराव काम करत असत. त्यांच्या कामाची दखल साक्षात समाजसुधारक आगरकर यांनीही घेतलेली आहे. असे हे हेरंबकर रंगमंचावर उभे रहात तेव्हा लोकांचं मनोरजन करणे हा एकमेव हेतू त्यांच्या डोळ्यासमोर असे. समोरचा प्रेक्षक जर दाद देणारा असेल तर त्यांच्यातील गायकाची कळी अगदी खुलून जायची.
शास्त्रीय संगीताच्या तानावर ताना घेत ते पहाटेपर्यंत गात बसत. लोक वन्समोअर म्हणत की यांचा उत्साह अधिक वाढत असे. सौभद्र नाटकात ते कृष्णाची भूमिका करत तर पांडू शिवलीकर रुक्मिणीची भूमिका करत असे. त्यासाठी त्याला एका पायावर भार देऊन उभे रहावे लागे. उभे राहून त्याचा पाय दुखला की तो दुसऱ्या पायावर उभा राही. पण प्रेक्षकांनी दाद दिली की कृष्णराव हेरंबकर थांबतच नसत.
एकच पद अनेक वेळेला आळवत बसत. पांडू बिचारा थकून जात असे. त्यामुळे तो गाणाऱ्या कृष्णरावांना मागून टोचायचा आणि ‘पुरे पुरे ‘ अशी सूचना दयायचा. जेवढे कृष्णराव फॉर्मात यायचे तेवढा त्याचा उभे राहण्याचा कालावधी वाढत असे. त्यामुळे बिचाऱ्याचे पाय खूप दुखत असत. पण कृष्णरावांना त्याचे काही वाटत नसे. प्रेक्षकांना आनंद देणे हे त्यांचे ध्येय असल्याने पांडूच्या सूचनेकडे ते सरळ दुर्लक्ष करून आपले गाणे पुढे रेटत राहायचे.
प्रश्न 2. मराठी संगीत रंगभूमीविषयी तुम्हांला असलेली माहिती थोडक्यात लिहा.
Solution
संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत या कलाप्रकाराच्या आणि नाटक या साहित्य प्रकाराच्या संकरातून निर्माण झाला आहे. संगीत नाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहे. संगीत नाटक लिहिणारे नाटककार हे काव्य आणि नाट्य यांखेरीज संगीत कलेतही प्रवीण होते. शास्त्रीय संगीताची योग्य जाण असणारे कलाकारच यात भूमिका करू शकतात कारण नाटकाचा बहुतांश भाग हा पदयात असतो. तो भाग कलाकार गाऊन सादर करतात.
मराठीमध्ये ‘संगीत स्वयंवर,’ ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत देवबाभळी’, ‘संगीत मृच्छकटिक’ अशी एकापेक्षा एक सरस नाटके त्या काळात सादर केली गेली. अण्णासाहेब किर्लोस्कर, राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर असे थोर नाटककार मराठी नाट्यसृष्टीत होऊन गेले. या नाटकांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य पार पाडले गेले.
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे असे मानले जाते. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रांरभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल [१८८०) या नाटकाने झाला. त्यांनतर ‘सौभद्र’, ‘रामराज्यवियोग’, ‘द्रौपदी’, ‘शारदा’, ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, संशयकल्लोळ, ‘एकच प्याला’ अशा संगीत नाटकांची पंरपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा काळ संगीत नाटकांचा सुवर्ण काळ होता.
हसवाफसवी प्रास्ताविक
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणून सर्वांना सुपरिचित असणारे दिलीप प्रभावळकर एक ख्यातनाम लेखकही आहेत. ‘झपाटलेला’ ‘एक डाव भुताचा’ ‘चौकट राजा’ इत्यादी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘बोक्या सातबंडे’ ‘चूकभूल दयावी घ्यावी’. इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. ‘बालसाहित्य पुरस्कार’, संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
‘हसवाफसवी’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘वासूची सासू’, ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘जावई माझा भला’ इ. विविध नाटकांमधून त्यांनी लोकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर दूरचित्रवाणीवरून अनेक वर्षे लोकांची त्यांनी करमणूक केली आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारखी त्यांची मालिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे.
हसवाफसवी पाठाचा परिचय :
‘हसवाफसवी’ ही दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली नाट्यसंहिता आहे. हा एक आगळावेगळा निखळ आणि निर्भेळ करमणुकीचा नाट्यप्रयोग आहे. हे नाटक एकीकडे लोकांना हसवते व त्याचबरोबर अंतर्मुखही करते. प्रस्तुत पाठात सुप्रसिद्ध गायक आणि नट असलेले कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्काराचा प्रसंग आहे. या नाटकात दिलीप प्रभावळकर यांनी स्वत: वेगवेगळ्या भूमिका साकारून रंगमंचावर धमाल उडवून दिली.
या प्रसंगात कृष्णराव हेरंबकर यांच्या सरकार दरबारी होणाऱ्या सत्कार कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी झालेल्या एका घरगुती सत्कार समारंभाचे वर्णन येते. कोकणातून अंबुर्डी गाव, मग तिथून एस.टी. ने पुण्याला आणि पुण्याहून ट्रेनने मुंबईपर्यंतचा त्यांचा सपत्नीक प्रवास सुरू आहे. ‘येणार आहेत - यायला निघाले आहेत - आले आहेत’ असा टप्प्याटप्प्याने त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
या सत्कार समारंभाचे आयोजक - संयोजक वाघमारे हे धांदरट आहेत. त्यांची स्मार्ट साहाय्यक मोनिका त्यांचा धांदटपणा आणखीनच वाढवते. अफलातून कल्पना, प्रसंगनिष्ठ विनोद, शाब्दिक विनोद, संवादात्मकता यांमुळे या नाटकातील प्रंसग रंगतदार झाले आहेत.
येण्याजाण्याचा खर्च आणि मानधन म्हणून पैशाची थेली त्यांना देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितलेले असते. त्यामुळे आल्या आल्या ते पहिले आपल्या प्रवासाचा तपशील संयोजकांना पुरवतात. कधी ते पैसे आपल्या हातात पडतील याची त्यांना घाई झाली आहे. त्यांना सत्कार समारंभात पोहोचायला उशीर का झाला असा प्रश्न मोनिका विचारते. त्यावर एक चाहता गाडीत कसा भेटला. त्याने भर गाडीत लोटांगण कसे घातले. त्या प्रक्रियेत त्याचे पाय गुजराती बायकांना लागून त्यांचे फरसाण, पापडी कसे गाडीतच खाली सांडले याचे साग्रसंगीत वर्णन ते मोनिकापुढे करतात.
त्या चाहत्याबरोबर ते त्याच्या कर्जतच्या बंगल्यावर जातात. तिथे भेट म्हणून त्यांना २१ कोथिंबिरीच्या जुड्या दिल्या जातात. खरंतर तो चाहता त्यांना परतीच्या प्रवासाला स्वत:ची डॉज गाडी देणार असतो. पण ती मध्येच पंक्चर होते. मग पुढचा प्रवास ते आणि त्यांची पत्नी कोंबड्यांच्या गाडीत बसून पूर्ण करतात. कोंबड्यांच्या आवाजाने हेरंबकरांचे डोके उठते तरी पत्नी मात्र मजेत कोंबड्यांबरोबर संवाद साधत असते.
कृष्णराव त्यांनी केलेल्या अजरामर भूमिकांची माहिती मोनिकाला देतात. मध्ये मध्ये शाब्दिक, प्रसंगनिष्ठ विनोद निर्माण करून गंमत उडवून देतात. मोनिका जो प्रश्न विचारते त्याला थेट उत्तर न देता स्वत:ला हवे तेच म्हणणे सतत पुढे दामटत राहतात. बोलण्याच्या ओघात स्वत:च्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगून टाकतात. इतकेच नव्हे तर आपल्या गायकीचे प्रदर्शन करून सर्वांना खुश करतात.
हसवाफसवी समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :
सत्कार - आतिथ्य, मानपान [honour], सोहळा - उत्सव [festive ceremony], तसदी - त्रास [trouble, pain], पांघरणे - अंगावर घेणे [to cast loosely around the body, to cover], प्रवासभत्ता - प्रवासखर्च [travelling allowance], चाहता - कलाकारावर, कलाकाराच्या कलेवर प्रेम करणारा [fan], कंदिल - दिवा [lantern], फाफलणे - बोलताना भलतेच शब्द मुखावाटे बाहेर येणे. भग्नावशेष - नष्ट झालेला, उरलेला भाग [broken, shattered remaining part) आहार - खाणे, पथ्य [food, diet], आत्मचरित्र - जीवनचरित्र [biography], कलकलाट - गोंधळयुक्त आवाज [a great confused noise], जबरदस्ती - बळजबरी [great force).
हसवाफसवी वाक्प्रचारः
आत सटकणे - आतल्या बाजूस निघून जाणे, थोतरीत लावून देणे - थोबाडीत देणे, हर्षवायू होणे - आनंद होणे, चमत्कारिक वाटणे - ओशाळवाणे वाटणे, लाजल्यासारखे होणे, पायधूळ झाडणे - प्रवेश करणे, कलकलाट करणे - गोंधळ करणे, डोकं उठणे - डोकं दुखणे, कानपटीत मारणे - थोबाडीत मारणे, पथ्य पाळणे - आहाराच्या संदर्भात विशिष्ट काळजी घेणे किंवा आहाराविषयी विशिष्ट नियम पाळणे, मश्गूल होणे - मग्न होणे.
हसवाफसवी स्वाध्याय | Hasva Fasvi Swadhayay 11th | Balbharati solutions for Marathi 11th
दिलीप प्रभावळकर (१९४४) :
मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते, लेखक. ‘झपाटलेला’, ‘चौकट राजा’, ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात त्यांनी केलेल्या
भूमिका लोकप्रिय. ‘अवतीभवती’, ‘कागदी बाण’, ‘गुगली’, ‘चूकभूल द्यावी घ्यावी’, ‘बोक्या सातबंडे’ (भाग १ ते ३),
‘हसवाफसवी’ हे लेखन प्रसिद्ध. ‘बोक्या सातबंडे’ या पुस्तक मालिकेसाठी ‘बालसाहित्य पुरस्कार’, संगीत नाटक अकादमीचा
राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
‘हसवाफसवी’ ही दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली नाट्यसंहिता आहे. हा एक आगळावेगळा, निखळ आणि निर्भेळ
करमणुकीचा नाट्यप्रयोग आहे.
हे नाटक वाचताना, त्याचा नाट्यप्रयोग बघताना प्रेक्षक हसतात व गंभीर आणि अंतर्मुखही होतात.
नाटकात, एकेकाळचे गायक-नट असलेले कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्काराचा प्रसंग आहे. ते आपल्या कोकणातल्या
गावाहून सपत्नीक येणार आहेत-यायला निघाले आहेत-येत आहेत-आले आहेत, असा टप्प्याटप्प्याने हा प्रवास आहे. या
कार्यक्रमाचे धांदरट संयोजक वाघमारे, त्यांची स्मार्ट साहाय्यक मोनिका, चिमणराव, प्रिन्स, नाना आणि दीप्ती अशी पात्ररचना
मूळ नाटकात आहे.
अफलातून कल्पना, विसंगती, संवाद व शाब्दिक कोट्या यांमुळे नाटकातील प्रसंग रंगतदार झाले आहेत. या
नाटकाच्या प्रयोगांना नाट्यरसिकांची दाद मिळाली आहे.
या नाटकातील उतारा खाली दिलेला आहे. संपूर्णनाटक मिळवून अवश्य वाचा व संधी मिळाल्यास नाट्यप्रयोग जरूर पाहा.
हसवाफसवी स्वाध्याय | Hasva Fasvi Swadhayay 11th | Balbharati solutions for Marathi 11th
मोनिका : (घाईघाईत येऊन उभी राहते.) रसिक हो, जुन्या
बालगोविंद नाटक मंडळीतले ज्येष्ठ नट
कृष्णराव हेरंबकर यांचा सरकारतर्फे उद्या
मानपत्र देऊन सत्कार होणार आहे; पण
त्यापूर्वी होणाऱ्या आजच्या या घरगुती
समारंभाला येण्याची विनंती आम्ही त्यांना
केली अाणि आमच्या विनंतीला मान देऊन
अंबुर्डी गावाहून आपल्या पत्नीसह आजच
इथे यायची तसदी त्यांनी घेतली. त्यांचा
आपण शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार
करूया आणि त्यांच्याशी थोडी बातचीत
करूया. (कृष्णराव येतात. सोबत वाघमारे. संजय
फोटो काढण्यासाठी येतो. कृष्णराव फोटोच्या
फ्लॅशलाइटने दचकतात. तो निघून जातो. वाघमारे
श्रीफळ देतात. कृष्णराव श्रीफळ घेऊन कानाशी
हलवून बघतात. शाल पांघरताना घोळ, कृष्णराव
गुरफटले जातात. एकदाची शाल पांघरली जाते.)
कृष्णराव : थैली देणार हाेतात आणि येण्या-जाण्याचा
खर्चसुद्धा करतो म्हणाला होतात. उद्या
सरकारी सोहळा आहे तिथं मला प्रवासभत्ता
देईन म्हणाले होते; पण तो मिळेपर्यंत मी
कोण जाणे कुठं असेन... तुम्हीच द्या. मला
नकोय... माझ्या पत्नीकडे द्या... ती तिथं
बसलीय... आमच्या अंबुर्डीहून कुंदनपूरला
टांग्यानं आलो. तिथून एस. टी. नं पुण्याला.
पुण्याहून ट्रेननं मुंबईला... कर्जत आणि
ठाणामार्गे, (वाघमारे हळूच आत सटकतात.) हे
चाललेत कुठे पळून? सांगतोय कोणाला?
कोणी आहे का इथं कमिटीपैकी?
मोनिका : हो हो, मी आहे.
कृष्णराव : एकूण दोनशे पंचावन्न रुपये साठ पैसे झाले
खर्च.
मोनिका : बरं, आम्ही देऊ तुम्हांला...
कृष्णराव : तुझं नाव काय मुली?
मोनिका : मोनिका.
कृष्णराव : तर बरं का मनुका-
मोनिका : मोनिका.
कृष्णराव : दोन्हींचा अर्थ तोच. ते तेवढे पैसे लवकर
देऊन टाकायला सांग. (संजय फोटो
काढण्यासाठी येतो. कॅमेऱ्याकडे बघायला सांगतो.)
आल्यापासून काय चालवलंय काय?
डावीकडे बघा उजवीकडे बघा... (तो फोटो
काढतो. फ्लॅशच्या प्रकाशामुळे कृष्णराव चिडतात.)
मारीन त्याला. (तो पळतो.) अहो विचारत
नाही, सांगत नाही. येऊन आपला लाइट
71
मारतो डोळ्यांवर म्हणजे काय? मला सहन
होत नाही. माझं ऑपरेशन झालंय ना
मोतीबिंदूचं. मला डॉक्टरांनी सांगितलंय,
प्रखर उजेडाकडे बघू नका म्हणून. याची काय
पद्धत झाली का मला सांगा! मला पाहुणा
म्हणून बोलवता आणि आल्यापासून माझा
छळ करता? एक थोतरीत लावून देईन
त्याच्या सांगतो. लाइट मारतो गधडा.
मोनिका : नाही... पुन्हा नाही येणार. कृष्णराव, आपण
मध्येच कुठे उतरलात? आम्ही वाट पाहत
होतो आपली.
कृष्णराव : काय करणार? गाडीमध्ये माझा एक चाहता
भेटला. आधी तुम्ही कोण, आम्ही कोण असं
सगळं बोलणं झाल्यावर, मी कृष्णराव
हेरंबकर आहे असं कळल्याबरोबर त्याला
हर्षवायू झाला. माझ्या पाया पडला तो.
लोटांगण घातलंन... भर ट्रेनमध्ये. ट्रेनमध्ये
जागा कुठे असते? बसायला जागा नसते. हा
आडवा झाला. त्याचे पाय लागले दोन
गुजराती बायकांना. त्यांच्या हातातलं
फरसाण, पापडी सांडलं खाली... ओरडल्या
त्या, नाकातोंडात मसाल्याचं फरसाण
गेल्यावर...
मोनिका : तुम्हांला चमत्कारिक झालं असेल नाही?
कृष्णराव : नाही. कुठल्याही कलाकाराला त्याचा
चाहता भेटल्यावर किती आनंद होतो म्हणून
सांगू! तो मला काय म्हणे, तुम्ही माझ्या
कर्जतच्या घरी चला. पायधूळ झाडा.
त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही.
घट्ट धरून ठेवले माझे पाय. आमची ही
मला म्हणाली, अहो हो म्हणा, हो म्हणा. तो
पायाला धरून गदागदा, गदागदा हलवत
होता. आमच्या हिला भीती-मी खाली पडेन
आणि कंबरेचं हाड मोडेल म्हणून...
मोनिका : ही म्हणजे जबरदस्तीच झाली, नाही?
कृष्णराव : प्रेमाची जबरदस्ती. तो मला म्हणाला
माझ्याकडे जुनी डॉज गाडी आहे. मी तुम्हांला
सोडतो वेळेवर मुंबईला, पण तुम्ही चला
कर्जतला. म्हटलं बाबा मी येतो. तू अगोदर
माझे पाय सोड. त्यानं बरं का, वडिलांच्या
मांडीवर बसून माझी नाटकं पाहिली होती हो.
कधी वडिलांच्या, कधी आईच्या, कधी
मानलेल्या मावशीच्या, कधी
स्वयंपाकीणकाकूच्या; पण नेहमी मांडीवर
बसून... असते एकेकाला आवड, आपण
काय करणार! तर तो मला आणि आमच्या
हिला घेऊन गेला कर्जतच्या बंगल्यावर
आणि दोघांना ओवाळलंन. निघताना भेट
म्हणून बंगल्याच्या बागेत लावलेली
कोथिंबीर दिली. एकवीस जुड्या.
मोनिका : एकवीस जुड्या कोथिंबीर? आहे कुठे ती?
कृष्णराव : मी त्या कोंबड्यांच्या गाडीत बसून आलो ना,
त्या डांबीस कोंबड्यांनी खाल्लंन सगळं
चोची मारून मारून...
मोनिका : तुम्ही तयार कसे झालात कोंबड्यांच्या गाडीत
बसायला?
कृष्णराव : काय करणार? माझ्या चाहत्याची ती जुनी
डॉज गाडी वाटेत बंद पडली. एक-एक टायर
पंक्चर होत गेलं. ड्रायव्हरला कळलंच नाही.
त्याला वाटलं, रस्ते खराब म्हणून गाडी
तिरकी चाललीये. पंक्चर झाल्याचं त्याला
कळलंच नाही. शेवटी चारही टायर्स फ्लॅट
झाले, तेव्हा मी खाली उतरलो. शेतातल्या
घरामध्ये गेलो. आमच्याबरोबर कोण होता
तो बाळू का काळू.
मोनिका : बाळू...
कृष्णराव : हां, त्यानं मग रस्त्यावर अंगठा की करंगळी
दाखवून गाडी थांबवली.
मोनिका : त्रास नाही ना झाला कोंबड्यांबरोबर प्रवास
करताना?
कृष्णराव : नाही कसा झाला? नाकातोंडामध्येपिसं गेली
ना कोंबड्यांची! कानाकडे कलकलाट
चालला होता कोंबड्यांचा. डोकं उठलं माझं.
आमची ही मात्र खूश होती. प्रवासभर गप्पा
मारत होती. कोंबड्यांबरोबर.
मोनिका : कोंबड्यांबरोबर गप्पा?
72
कृष्णराव : तिला सवय आहे. गावाला बोलते-
पशुपक्ष्यांशी. कावळे, चिमण्या, कुत्री,
मांजरं, गाई, म्हशी यांच्याशी संवाद
चालतात. तशा तिच्या गप्पा चालल्या
होत्या. अरे माझ्या बाबा... तो अपघात
होईपर्यंत.
मोनिका : नशीब चांगलं म्हणून सहीसलामत वाचलात
तुम्ही अपघातातून.
कृष्णराव : देवाची कृपा आणि तुमच्या सगळ्यांच्या
प्रेमाचं पुण्य माझ्या गाठीशी आहे, म्हणून
आम्ही दोघं वाचलो. कोंबड्या मात्र बऱ्याच
मेल्या. म्हणजे, नाहीतरी नंतर मारणार होते
त्यांना... तासभर आधी मेल्या.
मोनिका : कृष्णराव, खूप आनंद झाला आपण इथे
आलात म्हणून. पत्नींना स्टेजवर नाही
आणलंत?
कृष्णराव : नको, तिला सवय नाही. लोकांसमोर घाबरी
होते ती. शिवाय प्रखर दिव्यांचीसुद्धा भीती
वाटते तिला. तिला कंदिलाची सवय
गावाला... आमची गोष्ट वेगळी आहे.
आम्ही नट मंडळी. आम्हांला कुठल्याही
दिव्याचं काही वाटत नाही. तो मघाचा
फोटोचा दिवा मात्र सहन होत नाही. तो
फाजील कार्टा इथे आला तर त्याला
कानपटीन सांगतो.
मोनिका : पुन्हानाही येणार तो. कृष्णराव, आम्ही काही
आपल्या भूमिका पाहिलेल्या नाहीत.
आपल्या भूमिकांविषयी सांगा ना आम्हांला.
कृष्णराव : (हातातली काठी माईक समजून) सांगतो हं.
भूमिका तशा मी खूप केल्यात. हॅलो हॅलो
(चूक लक्षात येते. काठी बाजूला करून)
गडकऱ्यांच्या, खाडिलकरांच्या, देवलांच्या
नाटकात. पण माझी विशेष गाजलेली भूमिका
म्हणजे-कृष्णाची.
मोनिका : सौभद्र मधली...
कृष्णराव : हो. सौभद्र नाटकातला कृष्ण. अहो, त्यावरून
मला कृष्णराव नाव पडलं. गोपाळ गणेश
आगरकरांनी दिलं. म्हणजे टिळकांनी नारायण
राजहंसाला बालगंधर्व नाव दिल्याचं
आगरकरांना कळलं. दोघांमध्येमतभेद होते.
ताबडतोब आगरकरांनी मला कृष्णराव नाव
देऊन टाकलं. टिळकांना कळायच्या आत.
‘सुधारक’ पत्रामध्ये अग्रलेख लिहिला.
लोकहो याला कृष्णराव म्हणा. माझं मूळचं
नाव विठू.
मोनिका : सौभद्रचे किती प्रयोग केलेत?
कृष्णराव : इथे हिशेब कोणी ठेवलाय? लोकांचं रंजन
करणं हा मुख्य हेतू. लोक अगदी मश्गूल
होऊन जायचे पहाटेपर्यंत. एकेका गाण्याला
सहा-सहा वेळा वन्समोअर घेत असे मी.
रुक्मिणीची भूमिका करणारा आमचा पांडू
शिवलीकर, एकदा एका पायावर तर एकदा
दुसऱ्या पायावर असा ताटकळत उभा...
टोचायचा मला मागून. पुरे, पुरे, किती
गातोस. किती गातोस म्हणून. (हसतात.)
मोनिका : आता सध्या काय करता?
कृष्णराव : ह्या वयात दुसरं काय करणार? आत्मचरित्र
लिहितोय!
मोनिका : नाव दिलंत?
कृष्णराव : हो दिलं ना. आत्मचरित्राचं नाव-एक झाड
दोन कावळे.
मोनिका : प्रकृती कशी आहे?
कृष्णराव : कुणाची, कावळ्यांची?
मोनिका : नाही, आपली.
कृष्णराव : उत्तम आहे. ह्या वयातसुद्धा ठणठणीत
प्रकृती आहे माझी. आमच्या हिला विचारा.
काय गं? आं? मी तुम्हांला सांगतो, मी पथ्य
पाळतो म्हणजे, फक्त एक वेळ जेवतो...
सकाळचा. दोन किंवा तीन फुलके. एक मूद
भात.
मोनिका : आपल्या भूमिकांविषयी जरा-
कृष्णराव : ... आणि डाळ असते... मसूर किंवा तूर...
भाजी... फळभाजी किंवा पालेभाजी
करायला सांगतो.
मोनिका : आपली कृष्णाची भूमिका-
कृष्णराव : ... छोटी वाटी दही असतं.
73
मोनिका : ते असू दे... आम्हांला ऐकायला आवडेल
आपल्या भूमिका-
कृष्णराव : ... संध्याकाळी नाचणीचं सत्त्व. रात्री
झोपताना ताक किंवा पेज... ताकामध्येहिंग
टाकून घेतो आणि एक फळ मात्र रोज नेमानं
खातो. फळ म्हणजे अगदी फणस किंवा
कलिंगड नाही खात... केळं, अंजीर, लहान
चिक्कू... काहीच मिळालं नाही, तर बोर
किंवा करवंद खातो पण फळ खातोच.
मोनिका : वा छान...
कृष्णराव : मी चालतो मात्र खूप. तुम्हांला सांगतो,
चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही.
कधी-मधी हीसुद्धा येते बरोबर (समोर पाहून
बायकोला) बैस. बैस. ती खुणा करतेय. पुरे पुरे
म्हणून... मी स्वत:च्या आहाराबद्दल आणि
दिनक्रमाबद्दल बोलतो ना, सगळीकडे
बडबड करतो म्हणते-ते आवडत नाही
तिला... मी बसलोय दाद द्यायला... तरुण
मंडळींना कळायला हवं प्रकृतीचं रहस्य.
काय मनुका?
मोनिका : मोनिका...
कृष्णराव : दोन्हींचा अर्थ तोच. तर प्रकृतीचं रहस्य
म्हणजे माफक आहार आणि चालणं. चालत
राहणं. मी तुम्हांला सांगतो, अजूनसुद्धा. या
वयात माझ्या अंगात इतका उस्सा-उस्ताहउस्स्तह-काय झालंय, दात काढल्यामुळे
फाफलायला होतंय. इतका. उ... उत्सा-
उत्साह अंगात आहे, की अजून करू शकेन
कृष्णाचं काम. हिंमत आहे... माझं पेटंट पद
म्हणून दाखवू शकेन... प्रिये पहा.
मोनिका : म्हणा ना...
कृष्णराव : आं?
मोनिका : म्हणून दाखवा ना...
कृष्णराव : अरे देवा, उगाच बोललो! नको नको
पूर्वीसारखं होणार नाही. मस्करी केली... (ती
आग्रह करते.) तुम्ही मंडळी आग्रह करता; मग
आमच्यासारख्या म्हाताऱ्या कलाकाराला
आपली कला दाखवायचा मोह आवरता येत
नाही. बरं म्हणतो. सांभाळून घ्या. मंडळी
गोड मानून घ्या. एकेकाळच्या वैभवाचे
आता भग्नावशेष उरलेत... तुमच्याकडे पेटी
तबला आहे का?
मोनिका : हो, आहे ना, आहे. जरा त्यांना साथ द्या
ना.
कृष्णराव : (आत बघून) माझी काळी एक आहे. पूर्वी
काळी दोन होती... आता काळी एक...
आवाज गेला, की काळी शून्य. कोण आहे
पेटीला?
(आतून
आवाज) : पेटीला मी आहे गोविंदा.
कृष्णराव : कोण गोविंदा?
(आतून) : गोविंदा पटवर्धन.
कृष्णराव : अरे कोण गोविंदा का? किती मोठा झालास!
(आतून) : तुम्ही मला खांद्यावर खेळवलंय.
कृष्णराव : हो खेळवलंय... अरे केस पिकले की तुझे!
याला एवढासा पाहिला होता हाफ चड्डीत.
आणि तबल्याला कोण आहे?
(आतून) : तबल्याला आपला शेखर आहे, खांबेटे.
कृष्णराव : छान! तरुण तरुण मंडळी पुढे येतायत. तुझ्या
बोटांत जादू आहे बरं गोविंदा. गोविंदा
सांभाळून घे रे. शब्दही सांभाळ आणि सूरही.
(आतून) : आणि ताल शेखरला सांभाळायला सांगतो.
कृष्णराव : म्हातारा कलाकार गातोय खूप दिवसांनी...
(संगीत चालू होतं. कृष्णराव गाऊ लागतात.)
प्रिये पहा... रात्रीचा समय सरूनि, येत
उष:काल हा ।। प्रिये।।
हसवाफसवी स्वाध्याय | Hasva Fasvi Swadhayay 11th | Balbharati solutions for Marathi 11th
- Balbharti Maharashtra State Board
- Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3.1
- हसवाफसवी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
- Maharashtra State Board 11th
- Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 हसवाफसवी
- 11th Marathi Digest Chapter 3.1 हसवाफसवी
- Textbook Questions and Answers
- हसवाफसवी स्वाध्याय
- हसवाफसवी नाटक