वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला स्वाध्याय | Vahinincha Susaat Salla Swadhyay | 11th Marathi Digest Chapter 9
1. अ. कृती करा:कृती
प्रश्न 1.
SOLUTION:
आ. कारणे लिहा.
प्रश्न 1.
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण …………
SOLUTION:
उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण उषाताईंची वयाची अट्ठावन्न वर्षे पूर्ण होत होती. सरकारी नियमाप्रमाणे अठ्ठावन्न वर्षे वय हे सेवा निवृत्तीचे वय समजले जाते.
प्रश्न 2.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ………….
SOLUTION:
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण दोघींच्या वयात पाच वर्षांचे अंतर होते. उषावहिनी या वयाने निशापेक्षा पाच वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांचीच भूमिका त्यांच्याच नावाने करायची होती म्हणून निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला.
प्रश्न 3.
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ………..
SOLUTION:
महिला प्रेक्षकांत अपेक्षाभांगाची एक जोरकस लाट आली, कारण आज त्यांनी उलटाच प्रकार अनुभवला होता. मागील वीस वर्षांमधल्या कार्यक्रमात उषावहिनींच्या साडीवर चर्चा व्हायची आणि अगदी तश्शीच साडी खरेदी करायला बायकांच्या शोधयात्रा निघायच्या. पण आज मात्र अगदी साधी साडी त्यांनी परिधान केली होती ती साडी काठापदराची व मळखाऊ रंगाची होती म्हणून महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट पसरली.
प्रश्न 4.
मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण …………..
SOLUTION:
मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते, कारण मुंबईतल्या बहुतेक स्त्रिया नोकरी करतात, त्यामुळे मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाइत होते.
इ. वैशिष्ट्येलिहा.
प्रश्न 1.
दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
SOLUTION:
मुंबईला दूरदर्शन सुरू झालं, त्यानंतर आजतागायत चालू असलेला एकमेव असा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम होता. या कार्यक्रमात उषावहिनी महिलांना संसाराच्या बाबतीत ‘जोडा, जुळवा व जमवून घ्या’ असे सल्ले देत असत. थोडक्यात ‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमात उषावहिनी महिलांना सबुरीचा सल्ला देत असत. तसेच दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायला शिका अशा त-हेच्या सूचना त्या महिला प्रेक्षकवर्गाला देत असत.
प्रश्न 2.
शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.
SOLUTION:
‘बहिनींचा सल्ला’ हा लोकप्रिय कार्यक्रम होता या कार्यक्रमाने विशी गाठली होती. वयोमानाप्रमाणे निवृत्त व्हावे लागते याच नियमानुसार उपवहिनींना अट्ठावन्न वर्षे पूर्ण होत होती त्यामुळे या कार्यक्रमाला समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार होत्या, तसेच उषावहिनींचा सत्कारही होणार होता. ह्या कार्यक्रमाची शेवटची दहा मिनिटं प्रेक्षकांना वहिनींशी फोनवरून थेट संपर्क साधता येणार होता. हा कार्यक्रम प्रथमच दूरदर्शन केंद्राच्या बाहेर होणार होता. तसेच शेवटचा म्हणूनच खास महत्त्वाचा होता.
ई. फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.
प्रश्न 1.
SOLUTION:
उत्तर :
उषावहिनींचा सल्ला | निशावहिनींचा सल्ला |
जोडा, जुळवा व समजून घ्या. | थोडी भीड, थोडा संकोच, थोडी परंपरा गुंडाळून ठेवायची. |
संसाराची दोन चाकं म्हणजे नवरा आणि बायको, एक चाक थोडसं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार घ्यावा. | संसाराच्या दोन्ही चाकांनी समसमान भार घ्यावा. |
लोकांना वर्षानुवर्षे औषध म्हणून साखरेच्या गोळ्या दिल्या याचा अर्थ तडजोड व संयम यांचा सल्ला. | लोकांना कडू क्विनाईचा डोस दिला म्हणजेच स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याचा सल्ला. |
भारतीय रूढी परंपरेला आव्हान न देणारे, शांत, सौम्य व्यक्तिमत्त्व व तसेच सल्ले, दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायला शिकायचा सल्ला. | भारतीय रूडी-परंपरेला आव्हान देणारे सल्ले, स्वत:च्या मनाचा कौल घ्या, स्वतःला स्वत:च महत्त्व दिलं पाहिजे, आत्मसन्मान जपा असा सल्ला. |
2. पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न 1.
रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
SOLUTION:
मागील वीस वर्षे उषावहिनींचा वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम दूरदर्शनवरून प्रसारित होत होता. उषावहिनींच्या जोडा, जुळवा व जमवून घ्या या सल्ल्यामुळे हा कार्यक्रम त्यावेळी यशाच्या शिखरावर होता पण या सल्ल्याचा उपयोग खरोखरच कोणी संसारात किंवा जीवनात करून घेत का? असा प्रश्न उपस्थित रहात होता. प्रेक्षकवर्ग कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे दाद देत होता. सलग वीस वर्षे कार्यक्रम यशस्वी होत होता. वहिनी सगळ्यांना कार्यक्रमात सबुरीचा सल्ला देत असत पण खरोखरच्या जीवनात त्याचा अवलंब किती होत होता याचे SOLUTIONअनुत्तरीत होतं म्हणून रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस होता हे स्पष्ट होतं.
प्रश्न 2.
मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.
SOLUTION:
संसारामध्ये प्रत्येकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही जणांच्या आयुष्यात संकटांमागुन यातना किंवा दुःख सहन करावे लागते. यातून त्यांना बाहेर काढावे लागते. दुःखातून बाहेर काढण्यासाठी विविध मागांचा अवलंब करावा लागतो. सर्वसामान्य लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात. तसेच कार्य निशावहिनी करत आहेत. त्या कामगार क्षेत्रात काम करतात. समस्यांच्या मुळापर्यंत जातात व त्या समस्येतून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य दुःखातून मुक्त होण्याचा योग्य तो मार्ग दाखवणारी व्यक्ती म्हणजेच खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करणारी व्यक्ती होय, मात्र अगदी साधी साडी त्यांनी परिधान केली होती ती साडी काठापदराची व मळखाऊ रंगाची होती म्हणून महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट पसरली.
प्रश्न 3.
इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
SOLUTION:
मुंबईसारख्या शहरात जर राहायचे असेल तर घरातील पुरुष व स्त्रिया यांनी नोकरी करणे आवश्यक असते नाहीतर खर्च भागवता भागवता नाकी नऊ येतात असा अनेकांचा अनुभव आहे. जर घरातील महिला नोकरी करीत असेल तर मुंबईत जे पाहुणे येतात ते त्यांच्या घरी जात नाहीत कारण त्यांची पंचाईत होते. त्यांची ऊठ-बस किंवा सरबराई करायला यजमानाच्या घरात हक्काची बाई नसते. याचाच अर्थ जर घर व्यवस्थित वॉटरप्रूफ केलं असेल तर पावसात गळायची भीती नसते. त्याचप्रमाणे घरातील महिला जर कामावर जात असेल तर पाहुणेरूपी पावसाची अजिबात भीती नसते.
प्रश्न 4.
‘कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल’
SOLUTION:
कोणत्याही समस्येवर जर उपाय शोधायचा असेल तर त्या समस्येचा सखोल अभ्यास करून त्यावर उपाय शोधला पाहिजे तरच ती समस्या कायमची संपुष्टात येईल, ज्याप्रमाणे एखादया झाडाला जर कीड लागली आणि त्याकडे जर दुर्लक्ष केले गेले तर कीड ते झाड पूर्णपणे खाऊन टाकते. त्यामुळे जर कीड मुळापासून औषधमागांनी उपटून काढली तरच झाड जगेल. अन्यथा ते मरेल. त्याचप्रमाणे औषधरूपी सल्ल्याचा उपयोग जर संसारात केला किंवा रोजच्या जगण्यात केला तर त्याच त्याच समस्या पुन्हा उद्भवणार नाहीत व आयुष्य सुखासमाधानाने जगता येईल.
3. व्याकरण
अ. विशेष्य-विशेषणांच्या जोड्या पाठाधारे जुळवा.
प्रश्न 1.
SOLUTION:
विशेष्य | विशेषणे |
आठवणी | कडूगोड |
कळ | जीवघेणी |
वेळ | फावला |
पुळका | पोकळ |
असहकार | अंजन |
आ. केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्येयांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.
प्रश्न 1.
केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्येयांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.
SOLUTION:
1. केवल वाक्ये :
[अ] उषावहिनी पर्स घ्यायला आत गेल्या.
[ब] शिवाजी मंदिरच्या मागच्या पार्किंग स्पेसमध्ये गाडी थांबली.
2. मिन वाक्ये
[अ] जर या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असली तर हे अंजन वापरण्यावाचून तुम्हांला पर्याय नाही.
[ब] म्हणजे महाराष्ट्रात जेवढं जग सामावलेलं आहे त्यातल्या हजारो व्यक्तींना वहिनींनी सल्ले दिले होते.
3. संयुक्त वाक्ये:
[अ] पाहुण्यांचा पाऊस पडायला लागला, की डोक्यावर उलटी छत्री धरायची.
[ब] माझ्या पावसासाठी तुम्हीच रेनकोट पुरवू शकाल, अशी माझी खात्री आहे. कारण माझ्याकडे पाऊस पडतो तो पाहुण्यांचा.
इ. खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून लिहा.
[अपूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, अपसारणचिन्ह, लोपचिन्ह]
प्रश्न 1.
SOLUTION:
विरामचिन्हे | नावे |
; | अर्धविराम |
………… | लोपचिन्ह |
— | अपसरण चिन्ह |
: | अपूर्ण विराम |
– | संयोगचिन्ह |
ई. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
प्रश्न 1.
अ. काजवे चमकणे - ………………….
आ. डोळे लकाकणे - ………………..
इ. कायापालट होणे - ………………..
ई. कडेलोट होणे - …………………..
SOLUTION:
अ. काजवे चमकणे- अंधारी येणे किंवा अतिशय घाबरणे.
वाक्य : अचानकपणे दुचाकी घसरून झालेल्या अपघातामुळे माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.
आ. डोळे लकाकणे - आशेचा किरण दिसणे,
वाक्य : अर्जुनाची भूमिका करणारा अभिनेता मिळाल्यावर दिग्दर्शकाचे डोळे लकाकले.
इ. कायापालट होणे - अनपेक्षित बदल होणे.
वाक्य: बऱ्याच वर्षांनतर गावी गेल्यावर गावचा कायापालट झालेला मला दिसला.
ई. कडेलोट होणे - गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे.
वाक्य : काहीही चूक नसताना पोलिस चौकशीला येत आहेत हे समजल्यावर श्यामची अवस्था कडेलोट झाल्यासारखी झाली.
उ. खालील शब्दांचे वर्गीकरण करा.
प्रश्न 1.
SOLUTION:
4. स्वमत
प्रश्न अ.
वहिनींचा सल्ला ‘सुसाट’ वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
SOLUTION:
कथेचा अभ्यास केला असता वहिनींचा सल्ला सुसाट आहे. उघावहिनी निशावहिनी यांच्या सल्ल्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. उषावहिनी या ‘जोडा’, ‘जुळवा’ व ‘जमवून घ्या’ असा सल्ला देत असत. पण निशावहिनींचे सल्ले मात्र अगदी त्यांच्या विरुद्ध असल्याचे जाणवते. भीड, संकोच व परंपरा गुंडाळून ठेवायच्या, पाहुण्यांना येणारा प्रेमाचा पोकळ पुळका ओळखायला शिकायचा. त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या स्त्रीला ‘जोडा, जुळवा व जमवून घ्या’ यांऐवजी ‘असहकार’ पुकारायला सांगणे व त्याच मार्गाने म्हणजे जशास तसे SOLUTIONदेऊन वठणीवर आणायचे असे सल्ले वहिनींनी दिले.
एका बाजूला उषावहिनींचा सामोपचाराचा सल्ला व दुसऱ्या बाजूला निशावहिनींचा अगदी त्यांच्या विरोधातला म्हणजे जशास तसे SOLUTIONदेण्याचा सल्ला, कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल असा साधारणपणे समाजाच्या रूढी परंपरेशी विसंगत असा निर्णय घेण्याची हिंमत म्हणूनच वहिनींचा सल्ला आम्हांला ‘सुसाट’ वाटतो.
प्रश्न आ.
‘पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.
SOLUTION:
निलंजना बॅनर्जी यांनी पावसाप्रमाणे येणाऱ्या पाहुण्याविषयीच्या समस्येचा प्रश्न विचारला पण तो त्यांनी सांगताना किंवा मांडताना वेगळ्या पद्धतीने मांडला. त्यामुळे येथे विनोदाची निर्मिती झालेली दिसून येते. निलंजना बॅनर्जी या गृहिणी आहेत. त्या एका सेवाभावी संस्थेत घरची जबाबदारी सांभाळून काम करतात. त्यांची कुटुंबियांच्या संदर्भात कोणतीच समस्या नव्हती, त्या गृहिणी असल्यामुळे त्यांच्याकडे सतत पाहुण्यांचा राबता असायचा, पाऊस जसा धो धो कोसळतो व तो अनियमित असतो त्याचप्रमाणे त्यांच्याकडे भरपूर पाहुणे यायचे. हे सांगताना त्यांनी पाहण्यासाठी पावसाची उपमा वापरली.
त्यावरून त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षात येते म्हणून त्यांनी अशी समस्या मांडली. त्यावर निशा बहिनींनी SOLUTIONदिले, माझा वॉटरप्रूफिंगशी काहीही संबंध नाही यामुळे प्रश्नाचा अर्थ समजण्यात किंवा समजावण्यात थोडीशी गफलत झालेली दिसून येते. त्यामुळे विनोदाची निर्मिती होते म्हणजेच शब्द फिरवल्यानंतर हलका फुलका विनोद निर्माण होतो. त्यामुळे मला हा विनोद आवडला.
प्रश्न इ.
सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.
SOLUTION:
प्रत्येकाला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या असतात त्यावर जर त्यांना उपाय सापडला नाही तर मात्र इतरत्र सल्ले मागितले जातात. कथेमध्ये ज्या काही समस्या मांडल्या आहेत. त्या सर्वसामान्य गृहिणींच्या आहेत. बऱ्याच घरात नवरा व बायको दोघेही नोकरी करतात पण घरातल्या कामात मात्र बराचसा पुरुषवर्ग हात आखडता घेत असतो. त्यामुळे बऱ्याच नोकरदारांच्या घरी घरातल्या कामांसंबंधी समस्या निर्माण होते. दुसरी समस्या म्हणजे मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांची समस्या. शक्यतो ज्या घरातील स्त्री नोकरी करत नाही त्याच घरात पाहुण्यांचा राबता असतो.
काही वेळा पाहुण्यांना प्रेमाचा पोकळ पुळका येतो. तसेच घराघरात सासू आणि सुनेची एकत्र नांदण्याची समस्या, अनेक महिलांना पुरुष सहकाऱ्यांचे, हाताखाली काम करणाऱ्या पुरुषांचे कामावर येणारे धक्कादायक अनुभव आहेत, मुलींची रस्त्यावरील छेडाछाड समस्या खरोखरच समाजाला एका वेगळ्याच मार्गावर नेत आहेत. त्यामुळे या सर्व समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत.
मुलींची रस्त्यावर होणारी छेडछाड यामुळे तिला बाहेर पडणे कठीण होते. कार्यालयात आलेल्या अनेक वाईट अनुभवांमुळे ती सुरक्षित नसते. दारूच्या व्यसनामुळे संसाराची झालेली वाताहात, दारूच्या आहारी गेलेल्या नवऱ्याबरोबर सतत होणारी भांडणे, त्यांचे कुटुंबावर होणारे परिणाम, खालावलेली आर्थिक परिस्थिती त्यामुळे या समस्या योग्य आहेत. असे माझे मत आहे.
प्रश्न ई.
खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी’ तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
SOLUTION:
उषावहिनी व निशावहिनी दोघीही सारख्या बहिणी होत्या. पण त्या दोघींच्या स्वभावात मात्र खूपच फरक होता. उषावहिनींचा स्वभाव जोडा, जुळवून घ्या असा होता म्हणजेच सबुरीच्या सल्ल्याप्रमाणे होता. पण अगदी त्यांच्या उलट निशावहिनींचा स्वभाव होता. समाजात जीवन जगत असताना सरळ मार्गी जाणाऱ्या माणसाशी सरळ मार्गाने वागावे पण जर तो वाकड्या मार्गाचा अवलंब करीत असेल तर आपणसुद्धा तशाच मार्गाचा अवलंब केला तर मात्र आपण यशस्वी होतो.
असे निशाबहिनींच्या स्वभावाचे पैलू होते. त्यामुळे शेवटच्या ‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमात निशावहिनी यांनी आपला ठसा उमटवला. उषावहिनींनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की “मी लोकांना वर्षानुवर्षे औषध म्हणून साखरेच्या गोळ्या देत आले. तू मात्र आज लोकांना कडू क्विनाईनचा डोस देण्याचं धाडस केलंस.” माझ्या मते दिलेली पसंती ही योग्य आहे कारण सध्याच्या काळात जर असे वागले तरच निभाव लागणे शक्य आहे. मग ती समस्या घरात असो किंवा घराच्या बाहेर असो मुंबईसारख्या शहरात तर असे वागणे हीच काळाची गरज आहे. त्यामुळे निशावहिनींनी महिलांना विविध समस्यांबाबत दिलेला सल्ला मला योग्य वाटतो.
5. अभिव्यक्ती :
प्रश्न अ.
वहिनींचा ‘सुसाट ‘ सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.
SOLUTION:
उत्तरासाठी कृती : 3 मधील स्वमत पहा.
प्रश्न आ.
‘स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,’ याविषयीचे तुमचे विचार लिहा.
SOLUTION:
सध्याच्या काळात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात खांदयाला खांदा लावून काम करीत असतात. त्या कुठेही कमी पडत नाहीत. क्तिक पातळीवरसुद्धा स्त्रियांनी आपले अस्तित्व विविध क्षेत्रांत सिद्ध करून दाखवले आहे. अजूनही काही ठिकाणी तिचे अस्तित्व नाकारले जाते किंवा तिने केलेल्या कामाला फारसे महत्त्व दिले जात नाही. पण माझ्या मते स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळायला हवे तसेच प्रत्येक ठिकाणी समान हक्क मिळायला हवा.
जर तिने स्वतःला सिद्ध करून दाखवले तर तिचे महत्त्व समाजाला पटेल, खासकरून ज्या ठिकाणी पितृसत्ताक पुरुषप्रधान संस्कृती पद्धत आहे त्या ठिकाणी स्त्रियांचा आत्मसन्मानाचा प्रश्न निर्माण होताना आपणास दिसतो. प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंतच्या विविध दाखल्यांतून आपणास हे समजते. संतांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानाबद्दल प्रथम वाचा फोडली. संत जनाबाईना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झटावे लागले. पण संत नामदेवांनी तिला ते प्राप्त करून दिले.
‘नामयाची दासी’ म्हणविण्यात जीवनाचे सार्थक मानणाऱ्या संत जनाबाईचे सुमारे 350 अभंग आज उपलब्ध आहेत. सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यानंतर विविध प्रकारच्या लिखाणातून हे वारंवार सिद्ध झाले आहे. आज अनेक सामाजिक क्षेत्रात, वैयक्तिक क्षेत्रात स्त्रिया मानाच्या पदावर आहेत. भारतासारख्या विशाल देशात तर पंतप्रधानपदी [स्व. इंदिरा गांधी] व राष्ट्रपतीपदी [प्रतिभाताई पाटिल] देखील महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
याचाच अर्थ स्त्रियांनी आपल्या मनातील न्यूनगंडाची भावना जर दूर सारली तर तिला समाजात मानाचे स्थान मिळेल. याचाच अर्थ स्त्रियांनी परंपरेच्या जोखडात न राहता गृहिणींनीसुद्धा आपला आत्मसन्मान जपला पाहिजे तसेच तिच्या घरातील आणि समाजातील लोकांनीसुद्धा तिचा आदर करणे/ जपणे फार महत्त्वाचे आहे.
प्रकल्प.
प्रश्न 1.
प्रसारमाध्यमांतून सतत दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती व मालिका यांविषयी समवयस्कांशी चर्चा करा व त्यासंबंधी अहवाल तयार करा.
कारणे लिहा.
प्रश्न 1.
सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली, कारण ……
उत्तरः
सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली, कारण सौम्य व्यक्तिमत्त्व आणि समतोल सल्ले देणाऱ्या उषाबहिनींच्या स्वभावात अचानक बदल झाला होता. त्यांचे स्वत:च्या मनाचा कौल घ्या, स्वत:ला स्वत:च महत्त्व दया, आत्मसन्मान जपा, असे भारतीय रूढी-परंपरेला आव्हान देणारे सडेतोड विचार ऐकन सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली.
प्रश्न 2.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
SOLUTION:
1. किंकाळी फोडणे - अतिशय जोराने ओरडणे.
वाक्य : आपल्या मुलाचा आपल्या डोळ्यादेखत झालेला अपघात पाहून त्या मातेने किंकाळी फोडली.
2. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे - खूप प्रयत्न करणे.
वाक्य : छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक मावळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
3. गैरसमज होणे - चुकीचा समज होणे.
वाक्य : राम हा स्वार्थी आहे असा श्यामचा गैरसमज झाला.
4. आस्वाद घेणे- आनंद घेणे.
वाक्य : बऱ्याच प्रतिक्षेनंतर पडलेल्या पावसात मुलांनी कांदाभजीचा आस्वाद घेतला.
5. आसनाला खिळणे - मग्न होणे.
वाक्य : एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा प्रयोग पाहताना प्रेक्षकवर्ग आसनाला खिळला होता.
6. मान डोलावणे- होकार दाखविणे.
वाक्य : रमेशच्या लग्नाला पालीला जायचे आहे असे कबीरने सांगितल्यानंतर मी मान डोलावली.
शब्दसंपत्ती :
प्रश्न 1.
खालील वाक्यांचा अभ्यास करा. ‘कर’ या शब्दाची योग्य अर्थच्छटा कंसातील पर्यायातून निवडा. ती वाक्यांसमोर कंसांत लिहा.
टॅक्स. कृत्य, हात करणे [क्रयापद]
SOLUTION:
अ. दाम करी काम वेड्या - [करणे] [क्रियापद]
आ. कर भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे - [टॅक्स]
इ. कर हा करी धरिला शुभांगी - हात
ई. कर नाही त्याला डर कशाला ? - कृत्या
आकलन कृती :
खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
प्रश्न 1.
SOLUTION:
‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमाची शिवाजी मंदिरातील वर्षसंख्या व उषावहिनींचे त्यावेळेचे वय.
प्रश्न 1.
1. वर्षसंख्या - [ ]
2. उषावहिनींचे त्यावेळेचे वय - [ ]
SOLUTION:
1. वर्षसंख्या - 20
2. उषावहिनींचे त्यावेळेचे वय - 58
चौकट पूर्ण करा.
प्रश्न 1.
उषावहिनींच्या शेवटच्या कार्यक्रमाचे वैशिष्टय - [ ]
SOLUTION:
उषावहिर्नीच्या शेवटच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य - हा कार्यक्रम स्टुडिओमधून काढून शिवाजी मंदिरमध्ये ठेवला होता. त्यासाठी समाजातल्या मान्यवर व्यक्ती निमंत्रित केल्या होत्या. उघावहिनींचा सत्कार होणार होता.
प्रश्न 2.
मागील वीस वर्षांत उषावहिनींनी कार्यक्रमादरम्यान सुखी संसारासाठी वापरलेली आयुधे.
1. ……… 2. ……… 3. ……… 4. ………
SOLUTION:
1. हंडाभर फेविकॉल.
2. दोन-चार मैल लांबीच्या चिकटपटट्या.
3. शंभर एक किलो डिंक.
4. पाच सात बरण्या च्युइंग गम
प्रश्न 3.
‘आला प्रॉब्लेम समोर की, लाव त्याला चिकटपट्टा
परिणाम - …………….
उत्तर:
कृती - ‘आला प्रॉब्लेम समोर की, लाव त्याला चिकटपट्टी
परिणाम - कार्यक्रम यशस्वी
प्रश्न 4.
उत्तर:
प्रश्न 5.
मुंबईला दूरदर्शन सुरू झाल्यानंतरचा एकमेव असा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम - [ ]
SOLUTION:
बहिनींचा सल्ला
उपयोजित कृती
प्रश्न 6.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
दूरदर्शन, गाडी, कार्यक्रम, स्टुडिओ.
SOLUTION:
गाडी.
प्रश्न 7.
घटनाक्रम योग्य क्रमानुसार लावा.
समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती आज निमंत्रित होत्या.
उषावहिनींनी एकशेबावन्नाव्यांदा आरशात पाहिलं.
उषावहिनींनी एकशेचौपन्नाव्यांदा घड्याळात पाहिलं.
चार पावलं भराभरा मागे जाऊन, चार पावलं भराभरा पुढे येऊन स्वतःला पाहिलं.
SOLUTION:
उषावहिनींनी एकशेबावन्नाव्यांदा आरशात पाहिलं.
चार पावलं भराभरा मागे जाऊन, चार पावलं भराभरा पढे येऊन स्वत:ला पाहिलं.
समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती आज निमंत्रित होत्या.
उषावहिनींनी एकशेचौपन्नाव्यांदा घड्याळात पाहिलं.
प्रश्न 8.
योग्य विरामचिन्हांचा पर्याय ओळखा.
वहिनींच्या सल्ल्याचा शेवटचा कार्यक्रम.
पर्याय :
[अ] एकेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम
[ब] स्वल्पविराम, पूर्णविराम
[क] स्वल्पविराम, उदगारवाचक चिन्ह
[ड] पूर्णविराम, अपसारण चिन्ह.
SOLUTION:
एकेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम, विरामचिन्हे घालून वाक्य - ‘वहिनींच्या सल्ल्या’चा शेवटचा कार्यक्रम.
आकलन कृती
खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
प्रश्न 1.
उत्तर:
खालील घटनेचा परिणाम लिहा.
घटन - वीस वर्षामधल्या प्रत्येक कार्यक्रमानंतर उपावहिनींच्या साडीवर चर्चा व्हायची.
परिणाम - अगदी तश्शीच साडी खरेदी करायला बायकांच्या शोधयात्रा निघायच्या.
सूचननुसार कृता करा.
प्रश्न 1.
‘निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
SOLUTION:
निशाने चेहऱ्यावर काय आणण्याचा प्रयत्न केला?
प्रश्न 2.
‘वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम दरवेळी आवर्जून पाहिला जायचा कारण …. [ ]
SOLUTION:
‘वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम दरवेळी आवर्जून पाहिला जायचा कारण - उषावहिनींनी नेसलेली साडी
खालील शब्दसमूहासाठी उताऱ्यात योजलेले शब्द.
प्रश्न 1.
नाट्यप्रयोग सादर करतात ते ठिकाण - [ ]
SOLUTION:
नाट्यप्रयोग सादर करतात ते ठिकाण - नाट्यगृह
प्रश्न 2.
कार्यक्रमाचं निवेदन करणारा - [ ]
SOLUTION:
कार्यक्रमाचं निवेदन करणारा - निवेदक
उपयोजित कृती
कोण ते लिहा.
प्रश्न 1.
उषावहिनींच्या भूमिकेत स्वतःला सराईतपणे झोकून देणारी व्यक्ती - [ ]
SOLUTION:
उषावहिनींच्या भूमिकेत स्वतःला सराईतपणे झोकून देणारी व्यक्ती - निशावहिनी
प्रश्न 2.
अपेक्षाभंगाची लाट पसरवणारा प्रेक्षकवर्ग - [ ]
SOLUTION:
अपेक्षाभंगाची लाट पसरवणारा प्रेक्षकवर्ग - महिला
प्रश्न 3.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
SOLUTION:
1. प्रौढ, वयस्कर, थोराड, तारुण्य - तारुण्य
2. लोकप्रिय, नावाजलेला, प्रसिद्ध, चर्चेतला - चर्चेतला
प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा.
SOLUTION:
प्रयोग - खेळ, नाटय, लोकरंग, नाट्यरंग -
खेळ सराईत - हुषार, तरबेज, अडाणी, डळमळीत - तरबेज
चूक की बरोबर ते लिहा
प्रश्न 1.
- निशावहिनींची उषावहिनींच्या सहकाऱ्यांशी चांगली ओळख नव्हती.
- ‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमाचा शिवाजी मंदिरातील प्रयोग हा पहिलाच प्रयोग होता.
- उषावहिनींचा ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम आवर्जून पाहिला जायचा याचे प्रमुख कारण म्हणजे उपावहिनींनी नेसलेली साडी होय,
SOLUTION:
- चूक
- चूक
- बरोबर
स्वमतः
प्रश्न 1.
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला ही कथा तुम्हाला का आवडते ते लिहा.
SOLUTION:
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला ही कथा ‘एका फांदीवरची पाखरं’ या पुस्तकातून घेतली आहे. ही कथा शोभा बोंद्रे यांनी लिहिली आहे. ही कथा विनोदी अंगाने लिहिलेली एक हलकी-फुलकी कथा आहे. काही उलट-सुलट घटना, माणसाच्या वागण्यातील विरोधाभास आणि गमतीशीर व्यक्तिचित्रणे यांमुळे कथा गंमतदार झाली आहे.
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला ही कथा महिला वर्गाच्या विविध प्रश्नांवर पैलू टाकणारी कथा आहे. उषावहिनी ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम मागील वीस वर्षांपासून सादर करीत होत्या. दूरदर्शनवरील हा सर्वात लोकप्रिय असा कार्यक्रम होता. पण काही कारणांमुळे उषावहिनींना त्यांच्या शेवटच्या कार्यक्रमात उपस्थित राहता आले नाही त्यामुळे त्या कार्यक्रमाची पूर्ण सूत्रे निशावहिनी यांच्याकडे आली. दोधी बहिणी जरी असल्या तरी दोर्षीच्या स्वभावात प्रचंड तफावत. उषावहिनी ‘जोडा’ ‘जुळवा’ व ‘जुळवून’ घ्या अशा स्वभावाच्या तर निशा वहिनी जशास तसे उत्तर देणाऱ्या होत्या त्यामुळे त्यांचे सल्लेही अनेपेक्षित होते.
नवऱ्याशी असहकार पुकारणे, पाहुण्यांना आपल्या कामाचे महत्त्व पटवून देण्याकरीता थोड्याफार प्रमाणात परंपरा गुंडाळून टाकावी लागली तरी चालेल, कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन ती समस्या मुळापासूनच उखडून टाकली पाहिजे असे सल्ले निशावहिनी यांनी या कार्यक्रमात दिले. याचा अर्थ दुःख व सुख, निराशा व आशा, बंधन व मोकळीक या भावनांचा अनुभव या कथेतून झालेला दिसतो आणि हा सगळा अनुभव घेत असताना सुखाची जाणीव आपल्या मनात निर्माण होते. त्यामुळे ही कथा आम्हाला आवडते.
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Summary in Marathiप्रस्तावनाः
शोभा बोंद्रे कथाकार, कादंबरीकार, सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण लेखन केले आहे. माहेर, जत्रा, स्त्री, किर्लोस्कर इ. नामवंत मासिकांमधून विपुल लेखन.
‘मुंबईचा अन्नदाता’, ‘नॉट ओन्ली पोटेल्स’, ‘एक मुट्ठी आसमान’, ‘सहावं महाभूत आणि मी’, ‘एका फांदीवरची पाखर’ ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसांच्या यशोगाथा वेधकपणे उलगडून दाखाविल्या आहेत. माणसातल्या ‘माणुसपणाची’ उत्तुंग झेप, त्या मागची तपश्चर्या यांचे दर्शन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून होते.
‘आभाळमाया’, ‘ऊनपाऊस’, ‘अर्धागिनी’, ‘मानसी’, इ मालिकांसाठी त्यांनी संवादलेखन केले आहे. सातासमुद्रापार या त्यांच्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.
पाठाचा परिचय:
‘एका फांदीवरची पाखरं’ या त्यांच्या पुस्तकातील ही एक हलकीफुलकी विनोदी कथा आहे. काही उलट-सुलट घटना, माणसांच्या वागण्यातील विरोधाभास आणि गमतीशीर व्याक्तिचित्रणे यांमुळे कथा रंगतदार झाली आहे. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान आणि समान हक्क मिळायला हवा; तसेच तिने स्वत:ला सिद्ध करून स्वतःचे महत्व समाजास पटवून दयायला हवे, हा संदेश या कथेतून अधोरेखित झाला आहे.
उपावहिनींचा कार्यक्रम निशावहिनींकडे गेल्यानंतर जी काही गंमत झाली आहे त्याचे दिलखुलास व मार्मिक वर्णन या कथेत आले आहे. मुंबईला दूरदर्शन सुरू झाल्यानंतर जे काही कार्यक्रम प्रसारित झाले त्यातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘वहिनींचा सल्ला’. उषा वहिनींना अट्ठावन्न वर्ष पूर्ण होत होती त्यामुळे पाठात आलेली विनोदी कथा हा त्याचाच एक भाग आहे.
शेवटचा प्रयोग असल्यामुळे हा कार्यक्रम स्टुडिओमधून काढून शिवाजी मंदिरमध्ये ठेवला होता. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रात जेवढं जग सामावलेले आहे त्यातल्या हजारो व्यक्तींना बहिनींनी दिलेले त्यामुळेच हा कार्यक्रम यशाच्या शिखरावर होता. शेवटच्या कार्यक्रमासाठी त्यांची तयारी पूर्ण झाली होती पण दांडीवर वाळत असलेला रूमाल काढायला त्या स्टूलावर चहल्या. रूमाल हातात आला पण तोल जाऊन त्या खाली पडल्या.
त्याही अवस्थेत त्या कार्यक्रमासाठी जायला तयार होत्या पण डावा पाय गुडघ्यापासून वाकडा झाल्यामुळे नामवंत अस्थिव्यंगतज्ञ डॉ. बडव्यांकडे त्यांना नेण्यात आलं. त्यामुळे कार्यक्रम त्यांना स्वत:ला सादर करता आला नाही. त्यानंतर ही भूमिका करण्याची जबाबदारी निशावहिनींकडे आली, जरी आपण जळ्या बहिणी नसलो. दोघींमध्ये पाच वर्षांचे अंतर जरी असले तरी आपण सारख्याच दिसतो असे उषाबहिनींनी निशाबहिनींना समजावून सांगितले. मेकअपमध्ये सर्व काही व्यवस्थित करण्यात आले. निशावहिनींनी चेहऱ्यावर प्रौढपणा आणायचा प्रयत्न केला.
सेटवर थोड्याफार प्रमाणात ओळख असल्यामुळे काही वाटलं नाही. पण कार्यक्रम शिवाजी मंदिरात व थेट असल्यामुळे थोडासा ताण निशावहिनींना जाणवत होता. निशावहिनींचं खर कामाचं क्षेत्र एक युनियनची कार्यकर्ता म्हणून होतं. याचाच अर्थ ज्या गोष्टी मालकांकडून कामगारांना मागून मिळत नाहीत त्या गोष्टी भांडून किंवा संघर्ष करून मिळवणं हे होतं. पण आज मात्र त्यांच्या बहिणीसाठी स्टेजवर व विशेष करून त्यांच्याच रूपात उभं रहायचं होतं. हे काम एक आव्हानात्मक होतं.
एका नोकरी करणाऱ्या नवरेबाईना त्यांनी दिलेला सल्ला खरोखरच ‘सुसाट होता. नवरा घरात कोणत्याही कामाला हात लावत नाही या त्यांच्या प्रश्नावर त्यांनी असहकार नावाचं अंजन डोळ्यात घालायला सांगितलं. जेणेकरून नवरा बरोबर ठिकाणावर येईल, असा त्यामागचा हेत होता. मुला बाळांचा विचार करायचा व नवऱ्याचा मात्र जाणीवपूर्वक विचार करायचा नाही हा सुसाट सल्ला त्यांनी दिला. या सल्ल्यामुळे प्रेक्षकांत क्षणभर अवघडलेली शांतता पसरली, एका बाईने टाळी वाजवली व त्यानंतर उरलेल्या सर्वच स्त्रियांनी आणि शेवटी पुरुषांनीही नाइलाजाने टाळ्यांचा कडकडाट केला.
निलंजना बॅनर्जी या गृहिणीला दिलेला सल्लासुद्धा सुसाटच होता. त्यांच्या घरात त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा तसेच त्यांनी एका सामाजिक संस्थेबरोबर केलेल्या कामाचा आदर होता. त्यांची समस्या पावसाच्या रूपात येणाऱ्या पाहुण्यांची होती. या प्रश्नाला निशावहिनींनी SOLUTIONदिलं. पाहण्यांना येणाऱ्या प्रेमाचा पोकळ पुळका ओळखायला शिकायचं, तुमची सोय-गैरसोय न पाहता पाहणे आले आहेत. तुम्ही त्यांची सोय-गैरसोय बघायचं कारण नाही. तुमचं वेळापत्रक तुम्हीच सांभाळायचं. तुमच्या कामाचं महत्त्व घरातल्यांना पटलं आहे ना ? तसच पाहुण्यांनाही पटवून दयायचं.
या त्यांच्या उत्तराने सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली. आज काहीतरी वेगळंच घडत आहे याची जाणीव प्रेक्षकांना होत होती. कारण संयमाने SOLUTIONदेणाऱ्या, समजुतीच्या चार गोष्टी सांगणाऱ्या उषावहिनींचा स्वभाव कसा काय बदलला? हे प्रेक्षकांना पटणारे नव्हते.
अशाच अनेक समस्यांना त्यांनी उत्तरे दिली. त्यांची उत्तरे म्हणजे ‘कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल’ हे तत्वज्ञान पाळणारी होती. याचाच अर्थ कोणताही प्रश्न वरवर विचार करून सोडविण्याऐवजी तो सखोल अभ्यास करून त्याचा बिमोड करणे हा आहे. त्यानंतर पोलिस इन्सपेक्टर मांडले यांचा आलेला फोन व त्यांच्या पश्चात घडलेले नाट्य आपल्यासमोर आहेच. त्यांनी दिलेली कबुली व त्यानंतर पडलेल्या टाळ्या हे सर्वकाही सांगून जाते. त्यांच्या या कार्यक्रमानंतर उषावहिनींची प्रतिक्रियासुद्धा दाद देऊन गेली.
‘हॅलो’, मी उषावहिनी बोलते आहे. निशा, मनःपूर्वक अभिनंदन! मी लोकांना वर्षानुवर्षे औषध म्हणून साखरेच्या गोळ्या देत आले. तू मात्र आज लोकांना कडू क्विनाईनचा डोस देण्याचं धाडस केलंस. हे कोणीतरी करायलाच हवं होतं, अशी प्रतिक्रिया उषा वहिनींनी दिली. त्यानंतर मात्र ‘वहिनींच्या सल्ल्या ‘ चं नाटक संपलं होतं. कायमचं!
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला स्वाध्याय | Vahinincha Susaat Salla Swadhyay | 11th Marathi Digest Chapter 9
शोभा बोंद्रे(१९४६) :
कथाकार, कादंबरीकार, सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत वैशिष्ट्यपूर्ण लेखन. माहेर, जत्रा,
स्त्री, किर्लोस्कर इत्यादी नामवंत मासिकांमधून विपुल लेखन. ‘मुंबईचा अन्नदाता’, ‘नॉट ओन्ली पोटेल्स’, ‘एक मुठ्ठी आसमान’,
‘सहावं महाभूत आणि मी’, ‘एका फांदीवरची पाखरं’ ही पुस्तके विशेष प्रसिद्ध. त्यांच्या लेखनातून वेगवेगळ्या क्षेत्रांतील
माणसांच्या यशोगाथा वेधकपणे उलगडत जातात. माणसातल्या ‘माणूसपणाची’ उत्तुंग झेप, त्या मागची तपश्चर्यायांचे दर्शन
त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून घडते. ‘आभाळमाया’, ‘ऊनपाऊस’, ‘अर्धांगिनी’, ‘मानसी’ इत्यादी दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध
मालिकांसाठी त्यांनी संवादलेखन केले आहे. ‘सातासमुद्रापार’ या त्यांच्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा महाराष्ट्र राज्य
पुरस्कार मिळाला अाहे.
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला ही विनोदी अंगाने लिहिलेली एक हलकीफुलकी कथा आहे. काही उलट-सुलट घटना,
माणसांच्या वागण्यातील विरोधाभास आणि गमतीशीर व्यक्तिचित्रणे यांमुळे कथा रंगतदार झाली आहे. स्त्रीला समाजात मानाचे
स्थान आणि समान हक्क मिळायला हवा; तसेच तिने स्वत:ला सिद्ध करून स्वत:चे महत्त्व समाजाला पटवून द्यायला हवे, हा
संदेश या कथेतून अधोरेखित झाला आहे.
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला स्वाध्याय | Vahinincha Susaat Salla Swadhyay | 11th Marathi Digest Chapter 9
उषावहिनींनी एकशेबावन्नाव्यांदा आरशात पाहिलं.
वळून-वळून सर्व कोन साधून पाहिलं. चार पावलं भराभरा
मागे जाऊन, चार पावलं भराभरा पुढे येऊन स्वत:ला
पाहिलं. आरशातल्या स्वत:च्या प्रतिबिंबावर त्या फारशा
खूश नव्हत्या. ब्युटी पार्लरमधून आलेल्या वनिताने आपल्या
कौशल्याची कमाल केली होती; पण तरीही वय फारसं
लपत नव्हतं. टीव्हीची गाडी चारला येणार होती.
उषावहिनींनी घड्याळाकडे पाहिलं. अजून तब्बल साडेसहा
मिनिटं बाकी आहेत. ‘काय मेलं हळूहळू चालतं हे
घड्याळ!’ त्या पुटपुटल्या.
आज त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा.
‘वहिनींच्या सल्ल्या’चा शेवटचा कार्यक्रम. तोही थेट
प्रक्षेपणाचा. मुंबईला दूरदर्शन सुरू झालं, त्यानंतर
आजतागायत चालू असलेला एकमेव असा सर्वांत लोकप्रिय
कार्यक्रम ‘वहिनींचा सल्ला’. वयोमानानुसार निवृत्त व्हावेच
लागणार, म्हणूनच केवळ कार्यक्रम संपत होता. उषावहिनींना
अठ्ठावन्न वर्षं पूर्ण होत होती, तर कार्यक्रमाने विशी गाठली
होती. आजचा हा शेवटचा आणि खास महत्त्वाचा कार्यक्रम
दूरदर्शनच्या स्टुडिओमधून काढून शिवाजी मंदिरमध्ये ठेवला
होता. समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती आज निमंत्रित
होत्या. उषावहिनींचा सत्कार होणार होता.
37
उषावहिनींनी एकशेचौपन्नाव्यांदा घड्याळाकडे
पाहिलं. तीन वाजून चौपन्न मिनिटं, वीस सेकंद. एक
नि:श्वास टाकून त्यांनी डोळे मिटले. गेल्या वीस वर्षांतल्या
किती कडूगोड आठवणी! कडू चव घरातल्या आठवणींची.
गोड आठवणी दूरदर्शनच्या संदर्भातल्या. कौतुक,
नावलौकिक, यश सर्वमिळालं, ते घराबाहेर.
जगातल्या, म्हणजे महाराष्ट्रात जेवढं जग सामावलेलं
आहे त्यातल्या हजारो व्यक्तींना वहिनींनी सल्लेदिले होते.
‘जोडा, जुळवा, जमवून घ्या’. ह्या वीस वर्षांत त्यांनी
हंडाभर फेविकॉल, दोन-चार मैल लांबीच्या चिकटपट्ट्या,
शंभर एक किलो डिंक आणि पाच-सात बरण्या च्युइंग गम
वापरलं असेल. ‘आला प्रॉब्लेम समोर, की लाव त्याला
चिकटपट्टी’ हेच तर होतं, त्यांच्या कार्यक्रमाच्या
यशस्वितेचं रहस्य.
उषावहिनींनी एक दीर्घ सुस्कारा सोडला.
...हंऽऽ! वीस वर्षांत उभारलेल्या ह्या रंगीबेरंगी
पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.
घड्याळातल्या कक्कूने बाहेर डोकं काढून चारदा
‘कूकूक’ केलं आणि त्याच क्षणाला दारावरची बेल वाजली.
उषावहिनींनी पटकन उठून दार उघडलं. दारातल्या कडक
युनिफॉर्मवाल्या शोफरने लवून अभिवादन केलं. ‘‘मॅडम,
चलता ना?’’
उषावहिनींनी मान हलवून, ‘‘हो हो, येते’’ म्हटलं.
तेवढ्यात तो खाली उतरलादेखील. दार उघडंच होतं.
उषावहिनी पर्स घ्यायला आत गेल्या. शेवटची नजर टाकून
त्यांनी पर्समध्ये सर्व गोष्टी आहेत ना ते पाहिलं. रुमाल
नव्हता. त्या वैतागल्या. दांडीवर दोन-तीन रुमाल वाळत
होते. त्यांनी हात उंचावला. मग उडी मारली.
मग उंच
टाचांच्या चपलांसकट त्या स्टुलावर चढल्या. हात उंचावून
त्यांनी झटकन दांडीवरचा रुमाल खेचला. रुमाल हातात
आला; पण पुढच्याच क्षणाला तोल जाऊन त्या स्टुलासकट
भुईसपाट झाल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले
आणि पायांतून जीवघेणी कळ आली.
दारावरची बेल परत एकदा वाजली आणि ‘उषा,
तयार आहेस ना?’ असा पुकारा करत त्यांची धाकटी बहीण
निशा गडबडीने आत आली. उषावहिनींनी तोंडाने ‘हो, हो’
असं म्हटलं, असं त्यांना वाटलं; पण प्रत्यक्षात त्यांच्या
तोंडून शब्दच उमटत नव्हता आणि प्रयत्न केला तरी शरीर
पायांवर उभं राहायला तयार नव्हतं.
त्यांची अवस्था पाहून निशाने किंकाळीच फोडली,
‘‘अगंबाई, उषा, अशी कशी पडलीस तू?’’
‘‘अगं दांडीवरचे कपडे, रुमाल काढत होते. तेव्हा
पडले.’’
निशाने तेवढ्यात त्यांना प्यायला ग्लासभर पाणी
आणलं होतं.
मग ममतेने त्यांना पाणी प्यायला लावलं.
‘‘जाऊ दे ना! कशी पडलीस ते महत्त्वाचं नाही,
आता पुढे काय करायचं, ते महत्त्वाचं!’’
उषावहिनी डोळे पुसून म्हणाल्या, ‘‘उठव मला.
साडेचार वाजता शिवाजी मंदिरमध्ये पोहोचायला हवंय.’’
निशा त्यांना हळूवारपणे उठवायला लागली; पण
प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही उषावहिनींना हलताच येईना.
निशाने पाहिलं, त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून वाकडाच
झाला होता. निशाने सर्व सूत्रं आपल्या हातात घेतली. प्रथम
तिने एका नामवंत अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉक्टरांना फोन केला.
डॉक्टरांनी ‘ताबडतोब पेशंटला हॉस्पिटलमध्येघेऊन या’
असं सांगितलं.
निशाने गॅलरीतून ड्रायव्हरला वर बोलावून
घेतलं. ड्रायव्हर वर आला.
‘‘काय सामान न्यायचंय ताई?’’
निशाने उषावहिनींकडे बोट दाखवलं.
ड्रायव्हर चुकचुकला, ‘‘अर्र ्र! अशा कशा पडल्या
तुम्ही वहिनी?’’
निशा गंभीरपणे म्हणाली, ‘‘दांडीवरचे कपडे काढत
होती...’’
ड्रायव्हर आणि निशा दोघांनी उचलून उषावहिनींना
गाडीत नेऊन बसवलं. ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि
विचारलं,
‘‘कुठे जायचं?’’ उषावहिनी पुटपुटत होत्या,
‘‘शिवाजी मंदिर!’’
निशाने त्यांना गप्प करून म्हटलं, ‘‘बडवे हॉस्पिटल!’’
डॉ. बडव्यांनी तपासणीनंतर निर्णय दिला, ‘‘ताबडतोब
ॲनस्थेशिया देऊन बोन सेट करायला हवं. त्यानंतर प्लास्टर
घालून घरी पाठवीन.’’
उषावहिनी क्षीणपणे म्हणाल्या, ‘‘शिवाजी मंदिर!
मला शिवाजी मंदिरमध्ये अर्ध्या तासात पोहोचायला हवं
हो! सहा वाजता प्रोग्रॅम सुरू होणार.’’डॉक्टर म्हणाले, ‘‘कार्यक्रमात तुम्ही नुसत्या
किंकाळ्या फोडल्यात तर ते चालेल का तुमच्या प्रेक्षकांना?
पाहुण्यांना?’’ उषावहिनींच्या डोक्यात पायाचा नव्हे तर
38
कार्यक्रमाचाच विषय! डोळे पुसत त्या म्हणाल्या, ‘‘निशा,
अगं नाटकातलं एखादं पात्र आलं नाही तर बॅक स्टेजचासुद्धा
कोणीतरी ती भूमिका आयत्या वेळी करून वेळ मारून
नेतो; पण माझी वहिनींची भूमिका कोण करेल गं?’’ वाक्य
संपलं आणि त्यांचे डोळे लकाकले. निशाचा दंड धरून त्या
म्हणाल्या,
‘‘तू करणार. निशा, आज तू वहिनींची भूमिका
करणार. तूच करू शकतेस.’’
निशाने जोरजोरात मान हलवली, ‘‘अगं, काहीतरीच
काय बोलतेस? मी कधी माईकवरून तोंड उघडलं, तर ते
फक्त भांडण्यासाठी उघडते. कामगार युनियनची कार्यकर्ती
म्हणून मला मॅनेजमेंटला धमक्या देता येतात. कामगारांच्या
मागण्या मांडताना आवाज चढवता येतो. तुझ्यासारखे
गोडगोड सल्ले मला नाही देता येणार. हे मला नाही
जमायचं.’’
मग उषावहिनी उत्साहाने म्हणाल्या, ‘‘जमेल, जमेल,
जमवायचं. वागणं नंतर! पण दिसणं तर तुझं आणि माझं
अगदी सारखंच आहे ना? जुळ्यानसलो तरी पाच वर्षांच्या
अंतराने जुळं व्हाव्या तशाच आपण दिसतो. फरक किंचित,
तोही वयाचाच! बाकी रंगरूप, बांधा, आवाज सर्व गोष्टी
एकसारख्याच! माझं ऐक गं, माझी राणी ती! मी तुझी पंधरा
मिनिटांत तयारी करून देते.
तू फक्त हे कागद हातात ठेव.
भाग घेणाऱ्यांचे प्रश्न ठरलेले आहेत, उत्तरं त्या कागदावर
आहेत. फक्त घरी जा आणि एक छान साडी नेस. प्लीज,
निशा, वहिनींची लाज आता तुझ्याच हातात आहे.’’
शिवाजी मंदिरच्या मागच्या पार्किंग स्पेसमध्ये गाडी
थांबली. उषावहिनींच्या रूपात निशा खाली उतरली मात्र,
स्टेजकडे जाणाऱ्या जिन्यावरून लोकांची धावपळ उडाली.
त्याच्यातच, ‘वहिनी, सेट लाईट, माईक ओ. के. करता?’,
‘वहिनी, मेकअपला बसा’,
‘वहिनी, भाग घेणाऱ्या सर्व
बायका आल्यात, बर्का!’ असा चारी बाजूंनी कल्लोळ
उसळला.
निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला
आणि उषावहिनींच्या भूमिकेत स्वत:ला सराईतपणे झोकून
दिलं. सुदैवाने उषाबरोबर ती दोन-तीन वेळा टीव्ही सेंटरवर
रेकॉर्डिंग पाहायला गेलेली होती. त्यामुळे उषाच्या
सहकाऱ्यांशी तिची चांगली ओळख होती. अर्थात तेव्हा ती
उषावहिनींची बहीण होती. आज मात्र उषावहिनींच्या
थाटात तिने भराभर सूत्रंहलवायला सुरुवात केली.
निवेदिका वर्षाने माईक हातात घेतला,
‘‘रसिकहो! ‘वहिनींचा सल्ला’ ह्या कार्यक्रमाचा
आजचा शेवटचा प्रयोग. ह्या वेळी प्रथमच हा कार्यक्रम
दूरदर्शन केंद्राच्या बाहेर शिवाजी मंदिर ह्या लोकप्रिय
नाट्यगृहात साजरा होतो आहे. आणखीही एक प्रयोग आज
आम्ही प्रथमच करत आहोत.
ह्या कार्यक्रमाच्या शेवटची
दहा मिनिटं प्रेक्षकांना वहिनींशी फोनवरून थेट संपर्क साधता
येईल. तर ‘मैत्रिणींना वहिनींचा सल्ला!’ हा आजचा
शेवटचा कार्यक्रम.’’
निवेदिकेचं शेवटचं वाक्य संपलं आणि उषावहिनींनी
रंगमंचावर प्रवेश केला. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचं
स्वागत केलं; पण त्या वेळी महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची
एक जोरकस लाट पसरली. ‘वहिनींचा सल्ला’ दरवेळी
आवर्जून पाहिला जायचा, त्याचं एक प्रमुख कारण
उषावहिनींनी नेसलेली साडी! वीस वर्षांमधल्या प्रत्येक
कार्यक्रमानंतर उषावहिनींच्या साडीवर चर्चा व्हायची आणि
अगदी तश्शीच साडी खरेदी करायला बायकांच्या शोधयात्रा
निघायच्या. आजचा शेवटचा कार्यक्रम! म्हणजे उषावहिनी
नक्कीच अशी साडी नेसतील, की बायकांनी जन्मभर
लक्षात ठेवावी! तर आज उलटाच प्रकार!
उषावहिनी त्याच; पण तरीही त्या त्याच नसाव्यात
असा काहीतरी व्यक्तित्वातला बदल! साडी तर अगदीच
साधीशी, सर्वसाधारण काठापदराची, मळखाऊ रंगाची
सुती! कोणीतरी कुजबुजली, ‘‘शी, ही कसली साडी?’’
उषावहिनींनी एक स्मितहास्य केलं आणि थोड्याशा
प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम एका
तरतरीत आधुनिक स्त्रीने आपली समस्या सांगितली.
‘‘मी एक नोकरी करणारी स्त्री. माझं नाव सुचरिता
नवरे.
माझी समस्याही आहे, की घरातली कामं फक्त मला
दिसतात, ह्यांना दिसत नाहीत. म्हणजे मी ती केली नाहीत
तर ते त्यांना बरोब्बर दिसतं; पण ‘स्वत: करा’ असं मी
सांगितलं तर ते एकदम आंधळे होतात.’’
असली उषावहिनींनी दिलेला कागद नकली
उषावहिनींनी डोळ्यांखालून घातला होता.
‘...संसाररथाची दोन चाकं म्हणजे नवरा आणि
बायको. एक चाक थोडंसं कुचकामी असेल तर दुसऱ्या
चाकाने आपल्यावर जास्त भार घ्यावा...’ उषाताईंचा
सल्ला त्यांनी चुरगाळून टाकला.
39
माईक हातात घेऊन त्या खणखणीत आवाजात
म्हणाल्या, ‘‘नवरेबाई, सॉरी. तुम्ही नाव बदलू शकत नाही;
पण संसाररथ नीट चालायला हवा असेल तर दोन्ही चाकांची
सारखीच शक्ती वापरात असायला हवी. ह्यासाठी मी
तुम्हांला हे एक नेत्रांजन देते. त्याचं नाव आहे ‘असहकार’
अंजन. हे नवऱ्याच्या नव्हे, तुमच्या स्वत:च्या डोळ्यांत
घाला. म्हणजे तुमच्या डोळ्यांतला लखलखाट वाढेल.
उदाहरणार्थ, तुमच्या आणि मुलांच्यापुरतंच जेवण करा
आणि जेवूनही घ्या. तुमच्या कपड्यांना इस्त्री करा.
नवऱ्याच्या चुरगळलेल्या कपड्यांचा ढीग त्याच्याच
डोक्यावर रचून ठेवा. तुमच्या वस्तू आवरा. त्याचं पेन,
पाकीट, रुमाल शोधून जागच्या जागी ठेवण्याची तसदी घेऊ
नका.
लक्षात ठेवा, तुम्हीही दहा वर्षं नोकरी करता आहात.
तुम्हांला आयतं ताट एकदा तरी मिळालं? तुमच्या साडीला
इस्त्री करून नवऱ्याने तुमच्या हातात ठेवली? तुमच्या
कानातल्याचं हरवलेलं मळसूत्र शोधण्यासाठी तो एकदा तरी
वाकला? जर ह्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असली तर हे
अंजन वापरण्यावाचून तुम्हांला पर्याय नाही. फार नको,
केवळ चार दिवस हे ‘असहकार’ अंजन वापरा आणि
पाचव्या दिवशी नवऱ्याला निरोप द्या, की संध्याकाळी
दूरदर्शनवरच्या वहिनी माझ्याबरोबर घरी येणार आहेत.
आम्ही दोघी जरा कामाचं बोलणार आहोत, तरी चहा आणि
खाणं आपण सांभाळावं. तरच माझ्या असहकार व्रताची
आज सांगता होईल. नाहीतर हे व्रत मी वर्षभर पाळणार
आहे. नव्या मनूच्या ह्या नव्या व्रताचा वसा घेणार असं
नुसतं म्हणा, मग पाहा काय चमत्कार होतो ते!’’
प्रेक्षकांत क्षणभर अवघडलेली शांतता. विजेच्या
कडकडाटाने दिपल्यासारखीच सर्वांची अवस्था. मग मात्र
प्रथम एका बाईने टाळी वाजवली. पाठोपाठ उरलेल्या
स्त्रियांनी आणि शेवटी नाइलाजाने का होईना पुरुषांनीही
टाळ्यांचा कडकडाट केला.
स्टेजवर आता एक मध्यमवयीन साधीसुधी स्त्री उठून
बोलायला लागली, ‘‘मी निलंजना बॅनर्जी. गृहिणी आहे.
पण स्वत:ला कमी समजणारी, मान खाली घालणारी,
घरातल्या पैशांवर आपलाही हक्क आहे असं न वाटणारी,
सर्वसाधारण गृहिणी नाही. आमच्या घरात गृहिणीला
मानाचं स्थान आहे. माझ्या कामाचं महत्त्व घरच्यांना
पटवून देण्यात मी यशस्वी झाले आहे.
गृहिणी म्हणून
घरकामाची शंभर टक्के जबाबदारी मी उचलते, तरीही
हल्लीच्या काळात बराचसा फावला वेळ मिळतो. ह्या
वेळामध्येमी एका सेवाभावी स्त्री संस्थेत काम करायला
जाते. विनावेतन काम, केवळ माझ्या स्वत:च्या
समाधानासाठी. माझे पती आणि मुलं माझ्याह्या कामाचाही
आदर करतात. तर वहिनी, माझ्या कुटुंबीयांच्या संदर्भात
माझी कुठलीच समस्या नाही. माझी समस्या आहे ती
पावसाविषयी!’’
स्टेजवरच्या वहिनींचे डोळे बारीक झाले. त्या पटकन
म्हणाल्या, ‘‘निलंजनाबाई, आपला काहीतरी गैरसमज
झालेला दिसतो. माझी ताडपत्रीची एजन्सी नाही. माझा
आणि वॉटरप्रूफिंगचा काही संबंध नाही. मी माणसांना
दु:खप्रूफ किंवा दु:खमुक्त होण्यासाठी मदत करते.’’
निलंजनाबाई रागावण्याऐवजी हसायलाच लागल्या,
‘
‘अहो वहिनी, माझ्या पावसासाठी तुम्हीच रेनकोट पुरवू
शकाल, अशी माझी खात्री आहे. कारण माझ्याकडे पाऊस
पडतो तो पाहुण्यांचा!’’
प्रेक्षकांत हसण्याची लाट पसरली.
निलंजनाबाई म्हणाल्या, ‘‘मी एक अातिथ्यशील स्त्री
आहे, ह्याचा मला आनंद आणि अभिमान वाटायचा; पण
गेल्या काही वर्षांत मी हळूहळू संसारातला काही वेळ
स्वत:साठी खर्च करायला लागले. मग मला पाहुण्यांचा
त्रास व्हायला लागला. इतकंच नाही तर गेली काही वर्षं
पाहुण्यांच्या पावसाचं प्रमाण विलक्षण वाढलं आहे. मी
कारण शोधलं ते भयंकर अस्वस्थ करणारं आहे. मुंबईतल्या
बहुतेक स्त्रिया ह्या नोकरी करतात, त्यामुळे पाहुण्यांची
पंचाईत होते.
त्यांची सरबराई करायला यजमानाच्या घरात
हक्काची बाई नसते. मग पाहुणे असं घर शोधतात, की जिथे
घरची बाई कामावर जात नाही. आमच्या नात्यातले किंवा
मैत्रीतले पाहुणेही हाच विचार करत असणार. परिणाम
काय? तर इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफिंग
केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!
थोडी भीड, थोडा संकोच, थोडीशी परंपरा आणि
पाहुण्यांच्या प्रेमाचा पोकळ फुगा ह्यामुळे मी हा पाऊस
झेलत राहिले; पण हा पाऊस अडला जाईल, असा डबल
ॲक्शन रेनकोट मला कोणी देईल का?’’
40
वहिनींनी मान डोलावली.
‘‘रेनकोटबिनकोटची गरज नाही. तुम्हांला एक साधा
उपाय सांगते. उलटी छत्री!’’
‘‘उलटी छत्री?’’
‘‘हो, हो. उलटी छत्री! पाहुण्यांचा पाऊस पडायला
लागला, की डोक्यावर उलटी छत्री धरायची. सगळे पाहुणे
छत्रीत गोळा होतील. मग छत्री उलटीच बंद करायची आणि
जुहूला जाऊन समुद्रार्पण करायची. एकदा का तुमच्याकडे
उलटी छत्री आहे, अशी वार्ता पसरली, की पाहुणे
तुमच्याकडे यायचे बंद होतील. बरोबर?’’
‘‘बरोबर! पण म्हणजे मी नक्की काय करायचं?’’
‘‘थोडी भीड, थोडा संकोच, थोडी परंपरा गुंडाळून
ठेवायची. पाहुण्यांना येणारा प्रेमाचा पोकळ पुळका
ओळखायला शिकायचं. तुमची सोय-गैरसोय न पाहता
पाहुणे आले आहेत. तुम्ही त्यांची सोय-गैरसोय बघायचं
कारण नाही. तुमचं वेळापत्रक तुम्हीच सांभाळायचं. तुमच्या
कामाचं महत्त्व घरातल्यांना पटलं आहे ना? तसंच
पाहुण्यांनाही पटवून द्यायचं.
लक्षात ठेवा, माणूस स्वार्थीच असतो. माणूस
स्वत:साठीच जगतो. मग स्त्रीनेच दुसऱ्यासाठी का
जगावं?’’
सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली.
हे
आज काहीतरी अघटितच घडत होतं. वहिनींना दूरदर्शनवरती
अनेकांनी अनेक वेळा पाहिलं होतं. शांत, सौम्य व्यक्तिमत्त्व
आणि समतोल सल्ले. नेहमी जोडा, जुळवून घ्या आणि
दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायला शिका, अशा तऱ्हेच्या
सूचना.
आज मात्र वहिनींचा कायापालट झालेला ‘स्वत:च्या
मनाचा कौल घ्या, स्वत:ला स्वत:च महत्त्व दिलं पाहिजे,
आत्मसन्मान जपा’ असे भारतीय रूढी-परंपरेला आव्हान
देणारे हे सडेतोड विचार! धक्कादायक वाटले तरीही हे
विचार मनाला भिडणारे आणि पटणारेही होते.
एका प्रदीर्घ पॉझनंतर कोणीतरी एकीने टाळ्या
वाजवल्या आणि बाकीच्यांनीही टाळ्या वाजवून आपलं
सहमत दर्शवलं.
प्रश्नोत्तरं चालूच होती.
एखादं थरारनाट्य पाहावं,
अनुभवावं तसे प्रेक्षक खुर्चीला खिळले होते. श्वास रोधून
आणि वृत्ती एकाग्र करून ते कार्यक्रमाचा आस्वाद घेत
होते.
सासू आणि सुनेची एकत्र नांदण्याची समस्या, वरिष्ठ
पदावर काम करणाऱ्या स्त्रीला पुरुष सहकाऱ्यांचा किंवा
हाताखाली काम करणाऱ्या पुरुषांचा आलेला धक्कादायक
अनुभव, महाविद्यालयीन तरुणीची रस्त्यात किंवा
महाविद्यालयाच्या आवारातही पुरुषांनी केलेली छेडछाड,
नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे संसाराची झालेली वाताहत
अशा अनेक समस्या होत्या. वहिनींनी ह्या समस्या
सोडवण्यासाठी सांगितलेले मार्ग, ‘कीड मुळापासून उपटून
काढली पाहिजे, तरच झाड जगेल’ हे तत्त्वज्ञान पाळणारे
होते.
रंगमंचावर मध्यभागी ठेवलेला टेलिफोन घणघणू
लागला. पहिल्या दूरस्थ प्रेक्षकाने संपर्क साधलेला होता.
‘‘अिभनंदन!’’
वहिनींनी हसून मान डोलावली. टेलिफोन खाली
ठेवला, तोच परत वाजला. वाजतच राहिला.
‘‘अभिनंदन!’’
‘‘सुपर्ब!’’
‘‘ग्रेट!’’
‘‘मान लिया!’’
टेलिफोनवरचं संभाषण प्रेक्षकांनाही ऐकण्याची सोय
केलेली होती. सर्व टेलिफोन अभिनंदनाचेच होते.
वहिनी म्हणाल्या, ‘‘टेलिफोनचा वापर अभिनंदनासाठी
नव्हता, तर दूरवरच्या प्रेक्षकांना आयत्या वेळी सहभाग
घेता यावा म्हणून होता.’’
परत टेलिफोन वाजला. वहिनींनी सस्मित मुद्रेने तो
उचलला.
‘‘बाई, आपण बरं बोललात आणि नको इतकं खरंही
बोललात. पण आपण कोण आहात? मी पोलीस इन्स्पेक्टर
मांडके बोलतो आहे. आपल्या ड्रायव्हरने नुकतीच इथे
येऊन तक्रार नोंदवली आहे, की शिवाजी मंदिरमध्ये बोलत
आहेत त्या उषावहिनी नाहीतच! कृपया, आपण आहात
तिथेच थांबावं. मी चौकशी करायला येतो आहे.’’
आता मात्र कडेलोट झाला. एक साधंसुधं कौटुंबिक
नाटक बघायला यावं आणि एका रहस्यमय नाटकात
स्वत:च भाग घेतल्यासारखं गुंतत जावं, तशी प्रत्येकाची
अवस्था! ‘आता काय होणार?’ ह्या प्रश्नाने उत्सुकतेचं
शिखर गाठलं.
41
निशाने माईक हातात घेतला.
‘‘उपस्थित आणि इथे अनुपस्थित; पण आपापल्या
घरी बसून टीव्हीच्या पडद्यावर कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व
मित्रमैत्रिणींनो! मी निशा वागळे. आपल्या सर्वांच्या
आवडत्या उषावहिनींची मी धाकटी बहीण! कार्यक्रमाला
तयार होऊन बसलेल्या उषावहिनींना अचानक एक अपघात
झाला. दांडीवरचा रुमाल काढताना त्या खाली पडल्या
आणि पाय फ्रॅक्चर झाला. त्यांची जागा मी भरून काढावी
हा त्यांचाच आग्रह. आजच्या समारंभाचं महत्त्व ध्यानात
घेऊन मी त्यांची भूमिका वठवण्याचा प्रयत्न केला.
पण प्रामाणिकपणे सांगायचं तर हे नाटक मी चोख
केलं नाही. वहिनींनी ठरवलेली उत्तरं माझ्या बुद्धीला
पटणारी नव्हती. तेव्हा माझ्या सर्वमैत्रिणींसमोर मी कबूल
करते, आज प्रश्न तुमचे असले तरी उत्तरं-सल्ले हे माझे
होते, निशा वागळेचे. ह्यामुळे कोणाला काही लाभ झाला
तर आनंदच आहे. नाहीतर एक नाटक इतकीच किंमत
आजच्या ह्या कार्यक्रमाला द्या. माझ्यामुळे कोणाला (एका फांदीवरची पाखरं)
मनस्ताप झाला असेल तर माफ करा. आपल्या सर्वांशी
संवाद साधण्याची ही संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद!’’
प्रेक्षक अजूनही स्तब्ध, पुतळ्यांसारखे आसनाला
खिळलेले. तेवढ्यात फोन वाजला. निशाने फोन उचलला.
‘‘हॅलो, मी उषावहिनी बोलते आहे. निशा, मन:पूर्वक
अभिनंदन! मी लोकांना वर्षानुवर्षे औषध म्हणून साखरेच्या
गोळ्या देत आले. तू मात्र आज लोकांना कडू क्विनाईनचा
डोस देण्याचं धाडस केलंस. हे कोणीतरी करायलाच हवं
होतं.
आज तुझं बोलणं ऐकताना वाटलं, उषावहिनींनी तुझा
सल्ला घ्यायला हवा होता. फार पूर्वीच! स्वत:साठी आणि
लोकांना काय सल्ले द्यावेत ह्यासाठीही! असो! ह्यापुढे
का होईना मी तुझ्याकडे हक्काने सल्ला मागू शकते, ही
किती सुखाची गोष्ट! नाही का हो, निशावहिनी?’’
टाळ्या, आश्चर्याचे उद्गार, आरडाओरडा ह्या
गोंधळातच मखमली पडदा खाली आला. ‘वहिनींच्या
सल्ल्या’चं नाटक संपलं होतं. कायमचं!
समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :
- भराभरा - जलद - [hurry up].
- निमंत्रण - आमंत्रण - [invitation].
- मान्यवर - प्रतिष्ठित - [eminent].
- पर्स - बटवा - [purse].
- ममता - माया - [affection].
- पेशंट - आजारी व्यक्ती - [patient].
- अनेस्थेशिया - गुंगीचे औषध.
- बॅक स्टेज माणसे - रंगमंचाची व्यवस्था पाहणारे.
- कधीही समोर न येणारे कर्मचारी - [back stage artist].
- युनियन - संघटना - [union].
- रसिक - चाहता - [amateur].
- प्रयोग - खेळ - [act].
- असहकार - सहकार्य न करण्याची भावना - [non-cooperation].
- डीग - रास - [heap].
- अंजन - काजळ - [collyrium].
- विनावेतन - बिनपगारी - [without pay].
- प्रेमाचा प्रेमळ फुगा - वरवरचे दाखवलेले प्रेम - [apparent love].
- कायापालट - बदल - [transformation].
- सरबराई - आदरातिथ्य - [warm welcome].
- व्रत - वसा - [a rite ].
- लाभ - नफा - [profit].
- संधी - वाव - [an opportunity].
- सल्ला - उपदेश - [advice].
- गृहिणी - घरातील स्त्री, पत्नी - [a housewife].
वाक्प्रचार:
- काजवे चमकणे - अंधारी येणे, घाबरणे.
- डोळे लकाकणे - आशेचा किरण दिसणे.
- एखादी कल्पना सुचणे, कायापालट होणे - पूर्णपणे बदल होणे.
- कडेलोट होणे - एखादया गोष्टीचा अतिरेक होणे.
- असहकाराचे अंजन घालणे - सहकार्य न करण्याचा उपाय योजणे.
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला स्वाध्याय | Vahinincha Susaat Salla Swadhyay | 11th Marathi Digest Chapter 9
September 30, 2021 by Bhagya
Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9
वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
11th Marathi Digest Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
Textbook Questions and Answers
- Chapter 2: वहिनींचा 'सुसाट' सल्ला
- ९.वहिनींचा 'सुसाट' सल्ला -
- वहिनींचा 'सुसाट' सल्ला| स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक ते तीन
- पाठ क्र. ८ - वहिनींचा ' सुसाट ' सल्ला |vahinincha susat salla
- वहिनींचा 'सुसाट' सल्ला धडा 9वा| इयत्ता अकरावी नवीन अभ्यासक्रम ...
- मराठी पाठ ९ . वहिनींचा ' सुसाट ' सल्ला/ vahinincha 'susaat ' salla
- ९. वहिनींचा 'सुसाट' सल्ला | इ.११ वी मराठी युवकभारती | Marathi 11th
- वहिनींचा सुसाट सल्ला (इ. ११ वी/विषय - मराठी भाग २ - YouTube
- Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions