मी वाचवतोय कविता 9वी मराठी
हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट
कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर
बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगोऱ्या
थांबून गेलाय त्यांचा दंगा,
आट्यापाट्या आणि पिंगा
परकऱ्या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ
पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर
बघत क्रिकेटची मॅच
आणि उलगडत क्राइम-थ्रिलर
लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत
मी वाचवतोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
- प्रसिद्ध कवी. ‘इंद्रियोपनिषद’, ‘साक्षात’, ‘विलंबित’ हे कवितासंग्रह; ‘कविता लेनिनसाठी’ या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन. ‘तात्पर्य’, ‘मागोवा’,
- ‘लोकवाङ्मय’ या नियतकालिकांच्या संपादनात सहभाग. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने रेखाटले आहे.
- कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचवू इच्छितात. महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितींचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे. प्रस्तुत कविता साधना दिवाळी अंक २००५ या मासिकातून घेतली आहे.
मी वाचवतोय कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता