आरशातली स्त्री कविता 12वी मराठी | Aarashatali Shir Kavita [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

आरशातली स्त्री कविता 12वी मराठी | Aarashatali Shir Kavita


कृती (१)  कृती करा.

कृती (१) | Q 1.1 | Page 47
1) आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन
SOLUTION
(१) पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका.
(२) सर्वच बहर लावणारी नवयौवना.
(३) स्वप्नपंखांनी आभाळ झुल्यावर झुलणारी ध्येयगंधा.
.
2) आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश
SOLUTION
(१) डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तळ्यात सोड.
(२) नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घेऊन ये.

 कृती (१) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

कृती (१) | Q 2.2 | Page 52
1) घनगर्द संसार- ______ 
SOLUTION
घनगर्द संसार - संसाराचा पसारा. संसारात कंठ बुडून जाणे.

2) प्रेयस चांदणे- ______
SOLUTION
प्रेयस चांदणे - चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अति प्रियतम तारुण्यसुलभ गोष्टी.

3) प्राण हरवलेली पुतळी- ______
SOLUTION
प्राण हरवलेली पुतळी - भावनाहीन, संवेदनाशून्य, कठोर मनाची स्त्री. निर्जीव मनाची स्त्री.

4) फाटलेले हृदय- ______
SOLUTION
फाटलेले हृदय - विस्कटलेले वेदनामय मन.

कृती (२)  वर्णन करा.

कृती (२) | Q 1.1 | Page 52
1) आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल-
SOLUTION
ती नखशिखान्त अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी झाली आहे. ती मन मोकळे करून बोलत नाही. ओठ घट्ट मिटून संसारात तिने स्वत:ला बुडवून घेतले आहे. ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजते. ती पूर्वीच्या प्रियतम गोष्टी आठवत नाही. ती अस्तित्वहीन प्राण नसलेली कठोर पुतळी झाली आहे. गळ्यातला हुंदका दाबून फाटलेले हृदय शिवत बसली आहे. तिने मनातल्या असह्य वेदना पदराखाली झाकून घेतल्या आहेत.

2) आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-
SOLUTION
अंगणात थांबलेल्या प्रेयस चांदण्याला मनाची कवाडे उघडून आत घे. पूर्वीसारखी मनमुक्त अल्लड हो. परंपरेच्या ओझ्याखाली दबू नको. तुझे चैतन्यमय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित कर. पारंपरिक स्त्रीत्वाचे जोखड झुगारुन टाक. मनमोकळी हो. रडू नको. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि त्यातील शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घे.

कृती (२) खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

कृती (२) | Q 2.1 | Page 52
1) बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.
तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.
SOLUTION
पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना

2) आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.
SOLUTION
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून

कृती (२) जोड्या जुळवा.

कृती (२) | Q 3 | Page 52 

'अ' गट

‘ब’ गट

(१) अंतरीचे सुंदर पूर्वरंग

(अ) मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस

(२) आभाळ झुल्यावर झुलणारी

(आ) परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.

(३) देह तोडलेले फूल

(इ) उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी

(४) पारंपरिकतेचे वरदान

(ई) कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल

(५) पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा

(उ) मनातले सुंदर भाव

SOLUTION
'अ' गट

‘ब’ गट

(१) अंतरीचे सुंदर पूर्वरंग

(उ) मनातले सुंदर भाव

(२) आभाळ झुल्यावर झुलणारी

(इ) उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी

(३) देह तोडलेले फूल

(ई) कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल

(४) पारंपरिकतेचे वरदान

(आ) परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी

(५) पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा

(अ) मनात असलेले प्रचंड दुःख लपवून ठेवतेस 


कृती (३) खालील ओळींचा अर्थ लिहा.

कृती (३) | Q 1 | Page 52

1) माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!
SOLUTION
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते तू नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू 'मी' नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

2) स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
SOLUTION
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येय उराशी बाळगलीस. तू ध्येय गंधाचं होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

कृती (४) काव्यसौंदर्य.

कृती (४) | Q 1 | Page 52

1) अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
SOLUTION
'आरशातली स्त्री' या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.
आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते - तू अंतर्बाहय बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस. 

आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही. पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस. त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाह्य बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

'वाट पाहणारे प्रेयस चांदणे', 'पेंगुळलेली अल्लड जुई' या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात 'अस्तित्वहीन प्राण हरवलेली 'पुतळी' या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

कृती (५) रसग्रहण.

कृती (५) | Q 1 | Page 53
प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

1) तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली-
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
SOLUTION
आशयसौंदर्य : 'आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी बिंब आणि प्रतिबिंबाच्या संवादातून स्त्रीचे निर्मळ गतजीवन व आताचे संसारात जखडलेल्या स्त्रीचे वेदनामय जीवन यांची तुलना केली आहे. यातील आरशातली स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीची उमेद जागृत कशी करते, त्याचे यथार्थ वर्णन उपरोक्त ओळींमध्ये केले आहे.

काव्यसौंदर्य : आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वायुष्यातल्या चांगल्या स्मृती जागवते व सदयः परिस्थितीतील तिच्या पारंपरिक ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तिमत्त्वाचे विदारक चित्र तिच्यासमोर धरले. तिचे बोलणे ऐकून आरशाबाहेरील स्त्री मनातून गलबलते. स्वत:तच हिंदकळते. त्या परिस्थितीत आरशातील स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना अधिकाराने म्हणते - तू रडू नकोस. ऊठ, तुझी उमेद जागव. तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र, ताजी, प्रसन्न कमळ-फुले हातात घे. या बोलण्यातून आरशातली स्त्री तिला खंबीरपणे उभी राहायला सांगते. सर्व जोखडातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची व स्त्रीत्व टिकवून ठेवण्याची शिकवण देते. खरे म्हणजे तिला स्वत:लाच स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे, असे कवयित्रीला म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रींनी मुक्तच्छंद यांचे (मुक्त शैलीचे) माध्यम वापरले आहे. त्यामुळे मनातले खरे भाव सहजपणे व्यक्त होण्यास सुलभ जाते. विधानात्मक व संवादात्मक शब्दरचनेमुळे कविता ओघवती व आवाहक झाली आहे. जोखडात जखडलेली व परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीची दोन मने यथार्थ रेखाटली आहेत. उपरोक्त ओळीतील 'डोळ्यातले आसू तळ्यात विसर्जित करणे' व 'उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे' या वेगळ्या व प्रत्ययकारी प्रतिमांतून स्त्रीच्या मनातील भाव सार्थपणे प्रकट झाला आहे. बिंब-प्रतिबिंब योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झाली आहे.

कृती (6) अभिव्यक्ती.

कृती (६) | Q 1 | Page 53
1) ‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.
SOLUTION
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला.

 परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले. तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली. म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते.

खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वतः केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

आरशातली स्त्री कविता 12वी मराठी | Aarashatali Shir Kavita

सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले
आरशातील स्त्रीने मला विचारले, ‘तूच ना ग ती!
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य...!
तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग
ऐक हं...! तू कशी होतीस ते!

पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका
अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!

आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला 
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून 
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी

अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते
रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून
शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय

नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा’
तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली-

‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात 
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

आरशातली स्त्री कविता 12वी मराठी | Aarashatali Shir Kavita


अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post