आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय | Aayusha Aanandacha Utsav Swadhyay

आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय | Aayusha Aanandacha Utsav Swadhyay

विद्यार्थी मित्रांनो आज या ब्लॉग पोस्ट मध्ये मी तुम्हाला आयुष्य आनंदाचा उत्सव  याचे प्रश्न उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत .

आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय | Aayusha Aanandacha Utsav Swadhyay

कृती (१)  कृती करा. 
कृती (१) | Q 1.1 | Page 14
1) लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमत
SOLUTION
(१) तुम्ही शोधू लागलात की, तो दडून बसतो.
(२) पकडू गेलात की, हातातून निसटतो.
(३) जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्या देतो.
(४) जितका सहजपणे घ्याल, तितका तो सहज प्राप्त होतो.

2) लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षण
SOLUTION
(१) हलकेहलके पिसासारखे वाटणे.
(२) मनावरचे ताण, दडपणे नाहीशी होणे.
(३) ईर्षा-असूया, राग-द्वेष नाहीसे होणे.

3) माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार
SOLUTION
(१) निर्मिती
(२) शोध
(३) साक्षात्कार

कृती (१)  खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.

कृती (१) | Q 2.1 | Page 14
1) यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत.
SOLUTION
योग्य

2) पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.
SOLUTION
अयोग्य

3) शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो.
SOLUTION
अयोग्य

4) यशामुळे आत्मविश्वास वाढतो.
SOLUTION
योग्य

5) ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.
SOLUTION
योग्य

कृती (१) हे केव्हा घडेल ते लिहा. 

कृती (१) | Q 3.1 | Page 14
1) माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा...
SOLUTION
माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो.

2) माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा...
SOLUTION
माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा तो दुःखाला स्वत:च्या मनाबाहेर जाऊ देत नाही.

3) आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा...
SOLUTION
आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा आनंदातच राहायची सवय तुम्हांला पडते

4) एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा...
SOLUTION
एका वेगळ्या विश्वात वावरता येते, जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करतो.

कृती (२) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

कृती (२) | Q 1.1 | Page 14
1) मनाची कवाडं-
SOLUTION
मनाची कवाडं : मनाची कवाडं म्हणजे मनाची दारे. घराचे दार उघडल्यावर आपण बाहेरच्या जगात प्रवेश करतो. घरातले विश्व चार भिंतीच्या आतले असते. ते संकुचित असते. बाहेरचे जग अफाट असते. दार आपल्याला अफाट जगात नेते. मनाची दारे उघडली, तर म्हणजे मन मोकळे ठेवले, तर आपण व्यापक जगात प्रवेश करतो.

2) आनंदाचा पाऊस-
SOLUTION
आनंदाचा पाऊस : मनात दुःख, चिंता असेल, तर आनंद मनात शिरत नाही. आनंदाचे खुल्या मनाने स्वागत करावे लागते. मन मोकळे ठेवले तर आनंद भरभरून मनात शिरतो. यालाच आनंदाचा पाऊस म्हटले आहे.

कृती (२) खालील चौकटी पूर्ण करा.

कृती (२) | Q 2.1 | Page 15
1) आनंदाला आकर्षित करणारा- ____________
SOLUTION
आनंदाला आकर्षित करणारा - आनंद

2) शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू- ____________
SOLUTION
शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू - श्वास

3) बाहेर दाराशी घुटमळणारा- ____________
SOLUTION
बाहेर दाराशी घुटमळणारा - आनंद

4) आनंदाला प्रसवणारा- ____________
SOLUTION
आनंदाला प्रसवणारा - आनंद

5) आनंद अनुभवण्याची निमित्तं- ____________
SOLUTION
आनंद अनुभवण्याची निमित्तं - यश वैभव

कृती (३)  खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
1) एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये ____________
SOLUTION
प्रश्नार्थी वाक्य

2) एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये ____________
SOLUTION
प्रश्नार्थी वाक्य

3) गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की!____________
SOLUTION
उद्गारार्थी वाक्य

4)आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. ____________
SOLUTION
विधानार्थी वाक्य.

कृती (३) योग्य पर्याय निवडा व लिहा.

कृती (३) | Q 2.1 | Page 15
1) माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य-
OPTIONS
 1. माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.
 2. माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.
 3. माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.
 4. माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.
SOLUTION
माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.

2) हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य-
OPTIONS
 1. हा आनंद कुठे नसतो?
 2. हा आनंद कुठे असतो?
 3. हा आनंद सर्वत्र नसतो का?
 4. हा आनंद सर्वत्र असतो का?
SOLUTION
हा आनंद कुठे नसतो?

3) किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य-
OPTIONS
 1. ती आतून हसतात.
 2. ती फार हसतात आतून.
 3. ती आतून हसत राहतात.
 4. ती खूप आतून हसतात.
SOLUTION
ती खूप आतून हसतात.

कृती (३) खालील तक्ता पूर्ण करा.

कृती (३) | Q 3 | Page 15

क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

झुणका भाकर

 

 

(२)

 

सूर्याचा अस्त

 

(३)

 

अक्षर असा आनंद

 

(४)

प्रतिक्षण

 

 

SOLUTION

क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

झुणका भाकर

झुणका, भाकर वगैरे

समाहार द्वंद्व

(२)

सूर्यास्त

सूर्याचा अस्त

विभक्ती तत्पुरुष

(३)

अक्षरानंद

अक्षर असा आनंद

कर्मधारय

(४)

प्रतिक्षण

प्रत्येक क्षणाला

अव्ययीभाव


कृती (३) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

कृती (३) | Q 4.1 | Page 16
1) स्वत:च्या आवडीचे काम निवडा. ______
SOLUTION
स्वत:च्या आवडीचे काम निवडा. कर्तरी प्रयोग

2) लोकांना पेढे वाटणं वेगळं. ______
SOLUTION
लोकांना पेढे वाटणं वेगळं. भावे प्रयोग

3) कष्टाची भाकर गोड लागते. ______
SOLUTION
कष्टाची भाकर गोड लागते. कर्तरी प्रयोग

4) आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
______ ______ ______ ______ ______
SOLUTION
(१) खरा (आनंद)
(२) आत्मिक (आनंद)
(३) अनोखा (आनंद)
(४) वेगळा (आनंद)
(५) टिकाऊ (आनंद).

कृती (४) आयुष्य आनंदाचा उत्सव स्वमत

कृती (४) | Q 1 | Page 16
1) ‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
SOLUTION
शिक्षण घेताना आपण आपल्या आवडीचा विषय घेऊ शकतो, हे खरे आहे. काही वेळा आईवडिलांच्या आग्रहाला आपण बळी पडतो किंवा आपले सर्व मित्र जिकडे जातात, ती शाखा आपण निवडतो. कालांतराने आपली आपल्याला चूक उमगते. पण उशीर झालेला असतो. त्यानंतर काहीही करता येत नाही. निराश मनाने आपण शिक्षण घेतो अणि आयुष्यभर तशाच मन:स्थितीत जीवन जगत राहतो. त्यात सुख अजिबात नसते.

शिक्षणानंतर नोकरी-व्यवसाय निवडताना तसाच प्रश्न उद्भवतो. इथे मात्र आपल्याला निवड करण्याची बरीच संधी असते. या वेळी आपण आवडीचे क्षेत्र निवडायला हवे. क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाने काम करू शकतो. मग काम कष्टाचे राहत नाही. आपल्या कामातून, कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो.
मात्र इथेही एक अडचण असतेच. पण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असले, तरी नोकरी-व्यवसाय आवडीचाच मिळेल याची खात्री नसते. शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात. पण नोकऱ्या मात्र संख्येने खूप कमी असतात. त्यामुळे आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेल याची खात्री नसते. उपजीविका तर पार पाडायची असते. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते. अशा वेळी काय करायचे?

अशा वेळी वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे. पण आनंदाने करायचा म्हणजे काय करायचे? कसे करायचे? तोपर्यंत आपण जे शिक्षण घेतलेले आहे, त्यातील सर्व ज्ञान, सर्व कौशल्ये पणाला लावली पाहिजेत. मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल. तसेच, एवढे प्रयत्न अपुरे पडले तर आपले काम उत्तमातल्या उत्तम पद्धतीने करण्यासाठी गरज पडली, तर नवीन कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत. काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे, असा आग्रह हवा. मग आपोआपच आपले काम सुंदर होईल. आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला प्रतिष्ठाही मिळेल.

2) सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
SOLUTION
एखादी व्यक्ती काहीजणांना सुंदर दिसते. तर अन्य काहीजण ती सुंदर नाहीच, यावर पैज लावायला तयार होतात. हा व्यक्ति - व्यक्तींच्या दृष्टींतला फरक आहे. कोणत्या कारणांनी कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काहीही सांगता येत नाही. त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल, हेही सांगता येत नाही. आनंदाच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. पोस्टाची तिकिटे किंवा नाणी गोळा करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला ठाऊक असतात. पण एकाला लोकांकडची जुनी पत्रे गोळा करण्याचा छंद होता. एकजण आठवड्यातून एकदा आसपासचा एकेक गाव पायी चालून यायचा. एकच सिनेमा एकाच महिन्यात सात-आठ वेळा पाहणारेही सापडतात. सिनेमातले सर्व संवाद त्यांना तोंडपाठ असतात. ते संवाद ते सिनेमाप्रेमी पुन्हा पुन्हा ऐकवतात. यातून त्याला कोणता आनंद मिळत असेल? यावरून एकच दिसते की, प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात. आनंद शोधण्याची वृत्ती भिन्न असते.

व्यक्तिव्यक्तींमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला, तर समाजातील अनेक भांडणे संपतील; समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. आवडीनिवडी भिन्न असतात. हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.

व्यक्तींची ही विविधता ओळखली पाहिजे. या विविधतेची बूज राखली पाहिजे. मग समाजात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तू निर्माण होतील. रंगीबेरंगी घटना घडत राहतील. समाजजीवन अनेक रंगांनी बहरून जाईल.

3) आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
SOLUTION
एखादया दिवशी आपल्याला नको असलेला माणूस भेटतो. "कशाला भेटली ही ब्याद सकाळी सकाळी!" असे आपण मनातल्या मनात म्हणतो. तरीही आपण तोंड भरून हसत स्वागत करतो. आपल्या बोलण्यात, हसण्यात खोटेपणा भरलेला असतो. हे असे बऱ्याच वेळा होते. आपण खोटेपणाने जगतो. भेटलेल्या व्यक्तीमुळे आपल्याला आनंद होतच नाही. आनंदाचा, सुखाचा अनुभव आपल्याला मिळतच नाही; कारण आपले मन आधीच राग, द्वेष, मत्सराच्या भावनांनी भरलेले. अशा भावनांच्या वातावरणात आनंद निर्माण होऊच शकत नाही. मन ढगाळलेले असले की तेथे स्वच्छ सूर्यप्रकाश येऊच शकत नाही.

आनंदाचा, सुखाचा अनुभव मिळण्यासाठी आपले मन निर्मळ असले पाहिजे. कुत्सितपणा, द्वेष, मत्सर, हेवा असल्या कुभावनांपासून मन मुक्त हवे. जेथे कुभावनांची वस्ती असते, तेथे निर्मळपणा अशक्य असतो. निर्मळपणा असला की मन मोकळे होते. स्वच्छ होते. अशा मनातच आनंदाचा पाऊस पडतो. आपल्याला खरे सुख, खरा आनंद हवा असेल, तर मन स्वच्छ, मोकळे असले पाहिजे; कुभावनांना तिथून हाकलले पाहिजे.

आमच्या शेजारी सिद्धा नावाची बाई राहते. सिद्धाच्या मनात समोरच राहणाऱ्या अमिताविषयी दाट किल्मिषे भरलेली आहेत. अमिताविषयी बोलताना ती सर्व किल्मिषे जळमटांसारखी सिद्धाच्या तोंडून बाहेर पडतात. सिद्धा निर्मळ मनाने अमिताकडे पाहूच शकत नाही. साहजिकच अमिताच्या सहवासाचा सिद्धाचा अनुभव कधीही सुखकारक, आनंददायक नसतो. ज्या ज्या वेळी अमिताविषयी बोलणे निघते, त्या त्या वेळी सिद्धाचे मन कडवट होते. मनात कुभावनांचे ढग घेऊन वावरण्यामुळे सिद्धाला आनंद, खराखुरा आनंद मिळूच शकत नाही. लेखकांनी 'आनंदाच खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं,' असे म्हटले आहे, ते खरेच आहे.

4) ‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.
SOLUTION
प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यक आहे; हे अगदी खरे आहे. आपण हे भान बाळगत नाही. त्यामुळे आपले नुकसानही होते. आपल्या साध्या साध्या कृतींकडे लक्ष दिले, तरी हा मुद्दा लक्षात येईल. रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाड्यांना आपण लीलया चुकवत चुकवत जातो. खो-खोमध्ये किती चपळाई दाखवतो आपण! आपण सवयीने या हालचाली करतो. त्यामुळे त्यांतली किमया आपल्या लक्षातच येत नाही. 'चक दे इंडिया हा चित्रपट पाहताना है खूपदा लक्षात आले आहे. सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो. 'हे माझे शरीर आहे आणि या शरीराच्या आधाराने मी जगतो,' ही भावना सतत जागी असली पाहिजे. मग आपल्या प्रत्येक हालचालीचा आपण बारकाईने विचार करू शकतो. शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो. अनेकदा आपल्याला नाचण्याची लहर येते. पण पावले नीट पडत नाहीत. आपण मनातल्या मनात खटू होतो. पण शरीराची जाणीव असेल, तर नृत्यातल्या हालचाली शिकून घेता येतात. तिथेच आपली चूक होते.

खरे तर प्रत्येक पाऊल टाकताना आपण आपल्या शरीराचा डौल राखला पाहिजे. कोणाही समोर जातो, तेव्हा हेच लक्षात ठेवले पाहिजे. आपण इतरांसमोर स्वत:ला सादर करीत असतो. ते सादरीकरण सुंदर केले पाहिजे. आपल्याला लाभलेले अस्तित्व प्रत्येक क्षणाला साजरे केले पाहिजे. तर मग आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो. अभिनेते, खेळाडू अनेक कसलेले सादरकर्ते डौलदार का दिसतात? एखादी अभिनेत्री फोटोसाठी उभी राहते, तेव्हा तीच लक्षणीय का दिसते? ही सगळी माणसे आपल्या देहाचे, आपल्या अस्तित्वाचे भान बाळगतात. आपले अस्तित्व देखणे करायचा प्रयत्न करतात. ती स्वत:च्या अस्तित्वाचा आनंद घेतात आणि दुसऱ्यांना देतातही. हेच सुख असते. त्यातच आनंद असतो.

 कृती (५) आयुष्य आनंदाचा उत्सव - अभिव्यक्ती

कृती (५) | Q 1 | Page 16
1) खरा, टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी सर्वप्रथम टाकायचे पाऊल म्हणजे स्वत:च्या शरीरावर प्रेम करणे. आपण स्वत: असे प्रेम करायचेच; पण इतरांनाही तो मार्ग शिकवायचा.

स्वत:च्या शरीरावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? शरीर नीटनेटके, स्वच्छ व प्रसन्न राखायचे. आपल्याला पाहताच कोणालाही आनंद झाला पाहिजे. त्याला प्रसन्न वाटले पाहिजे. त्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणवल्या पाहिजेत. आहार विचारपूर्वक घ्यायचा, व्यसने करायची नाहीत, दरोज नियमितपणे योगासने किंवा अन्य व्यायाम किंवा रोज तीन-चार किमी चालणे. कामासाठी चालणे यात मोजायचे नाही. काहीही करण्यासाठी नव्हे, तर चालण्यासाठी चालायचे. चालणे हेच काम समजायचे.

मनात ईर्षा, असूया, हेवा, मत्सर, सूड अशा कुभावना बाळगायच्या नाहीत. आपले मन या भावनांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणजे चांगले होण्यासाठी स्वत: कोणत्या तरी एका क्षेत्रात, एखाद्या कौशल्यात प्रभुत्व मिळवले पाहिजे. स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवायचा. त्यामुळे अन्य कोणाहीबद्दल मनात कुभावना बाळगण्याची इच्छाच होणार नाही.

यश, वैभव मिळवण्याचा प्रयत्न करण्यात गैर काहीच नाही. मात्र यश, वैभव या गोष्टी बाह्य असतात. आत्मिक समाधानाशी संबंध नसतो. म्हणून यश, वैभव मिळाल्यावरही मन अशांत, अस्वस्थ होऊ शकते. अशा वेळी आणखी यश, आणखी वैभव यांच्या मागे न लागता आपल्याला नेमके काय हवे आहे. याचा शोध घेतला पाहिजे.
मात्र, एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. पैशाने खरा, टिकाऊ आनंद कधीही मिळवता येत नाही. आपल्या मनाच्या सोबत राहण्यासाठी आवडेल तेच काम करायला घ्यावे. आवडेल त्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय पत्करावा. अर्थात, प्रत्येकाला स्वत:च्या आवडीप्रमाणे नोकरी, व्यवसाय मिळेलच असे नसते. अशा वेळी मिळालेले काम आवडीने केले पाहिजे.
एवढी पथ्ये प्रामाणिकपणे पाळली तर आपण खऱ्या आनंदाच्या जवळ असू.

2) तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
SOLUTION
जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मी करीन. त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवरील आहेत. तर काही मानसिक पातळीवरील आहेत.

शारीरिक पातळीवरील कृतींपैकी सर्वांत महत्त्वाची कृती म्हणजे स्वत:च्या शरीराची काळजी घेणे. स्वत:च्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रथम स्वत:च्या शरीरावर मनापासून प्रेम केले पाहिजे. स्वतःचे शरीर नीटनेटके, देखणे राखायचे, इतके की कोणालाही भेटल्यावर ती व्यक्ती आनंदित, प्रसन्न झाली पाहिजे. शरीर फक्त बाह्यतः सजवून ते देखणे होणार नाही. ते सतेज, सुदृढ व निरोगी राखले पाहिजे. त्या दृष्टीने मी योगासने किंवा व्यायाम सुरू करीन. नियमित व जीवनसत्त्वयुक्त आहाराचा अवलंब करीन. व्यसनांपासून चार हात दूरच राहीन.

शरीराबरोबरच मनाचे पोषण करण्यासाठी मी कलेचा आश्रय घेईन. मी अत्यंत चिकाटीने गायन, वादन, नर्तन, साहित्य, चित्रपट, नाट्य यांपैकी एका तरी कलेचा जाणतेपणाने आस्वाद घ्यायला शिकेन. शक्यतो एखादी कला आत्मसात करीन. माझी स्वत:ची बौद्धिक, शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन माझे यशाचे लक्ष्य निश्चित करीन आणि त्याचा पाठपुरावा करीन. अर्थात मला हेही ठाऊक आहे की केवळ यशामुळे उच्च पातळीवरचे मानसिक समाधान मिळू शकत नाही. साफल्याचा आनंद भौतिक यशाने पूर्णांशाने मिळत नाही. म्हणून कला क्रीडा-ज्ञान या क्षेत्रांत उच्च प्रतीचे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करीन.

नोकरी-व्यवसायाच्या बाबतीत आवडीचेच क्षेत्र मिळेल असे सांगता येत नाही. मी माझ्या आवडीचे शिक्षण घेईन. आवडीच्या क्षेत्रात उपजीविकेचे साधन मिळवायचा प्रयत्न करीन. तसे नाही मिळाले, तर मिळालेले काम अत्यंत आवडीने करीन. मी घेतलेल्या शिक्षणातून मिळालेले ज्ञान माझ्या नोकरी-व्यवसायात वापरीन.
मला तर खात्रीने वाटते की माझा हा बेत यशस्वी झाला, तर मला सुखीसमाधानी आयुष्य मिळेल.

वेगवशता मराठी स्वाध्याय | Veshavanti Marathi Svaadhyaay
आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय | Aayusha Aanandacha Utsav Swadhyay

आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय | Aayusha Aanandacha Utsav Swadhyay

     आनंद सगळ्यांनाच हवा असतो  पण आपला  आनंद नेमका कशात आहे, हे अनेकांना कळत नसतं.  आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे  असतो हा आनंद? कुठे नसतो हा आनंद? आनंदी आनंद  गडे, जिकडे तिकडे चोहीकडे! ही फक्त कविकल्पनाच  नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे!
आनंदाची गंमत अशी आहे, की तुम्ही शोधू लागलात,  की तो दडून बसतो, पकडू गेलात, की हातातून निसटतो.  आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो  हुलकावण्या देतो. जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच. तो अनुभवता मात्र  यावा लागतो.

आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण  गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत  असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे, की आनंद सर्वत्र असतो; पण अंतरंगात  आनंद असेल, तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं  जुळतं, ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो, तो  फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो, तोही आनंदच. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य, अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता  येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं, तो  म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण  नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो,  तो आपला श्वास. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं.

 खरंतर  श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा  सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर  श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं, असं नव्हे,  तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट  धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं.  पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला  एकेक क्षण येतो आणि जातो. आपण क्षणांकडे लक्ष देत  नाही. एकेक दिवस उजाडतो, मावळतो. आपण दिवसाकडे  लक्ष देत नाही. सूर्योदय, सूर्यास्त होतो, तोही आपण नीट  पाहत नाही. तो दिसतो, तेव्हा आपल्याला दृष्टी आहे, हेही  आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणारं आहे, ते गृहीतच  धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं,  ना दृष्टीचं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं,  आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं.  आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे. एक अद्भुत  सत्य आहे. भले सापेक्ष असेल, पण सत्य आहेच.  जीवनाच्या, युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी


जन्म लाभला आहे. तो लाभला आहे, हेच आनंदासाठी  एक सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं ‘असणं’ही  पुरेसं आहे; किंबहुना आपलं ‘असणं’ हीच आनंदाची खूण  आहे, अभिव्यक्ती आहे. एखादी आनंददायक घटना घडते. तरीही आपल्याला  म्हणावा तितका आनंद होत नाही, त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हांला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं; पण तुमच्या मते ते खरं तर  दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल, तर  आनंद होऊनही रुखरुख लागून राहते. आनंद हा निखळ असेल, तरच तो आनंद असतो. ‘खरा’ असेल, तरच तो  अनुभवता येतो.  लोकांना पेढे ‘वाटणं’ वेगळं आणि स्वत:ला आनंद  वाटणं वेगळं. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण  आहे. 

तुम्हांला हलकंहलकं, पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपणं नाहीशी व्हायला हवीत.  मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग,  द्वेष विरघळायला हवेत. काहींना एखादं बक्षीस मिळालं, तरी त्या ‘अमक्या’ला  चार बक्षिसं मिळाली याचं वैषम्य वाटतं किंवा मग ‘त्या लेकाला एकही बक्षीस मिळालं नाही’, याचाच अधिक  आनंद होतो. स्वत:ला काही मिळणं, स्वत: आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं  वाटतं, ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत.  तुलना आली, की आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दु:खावर कधीच पोसला जात नसतो. खरा आनंद हा मनाला  केवळ हलकंच नव्हे, तर चित्ताला शुद्ध करत असतो.  माणूस खऱ्या आनंदात असतो, तेव्हा त्याला सगळं जग  छान, सुंदर वाटत असतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी  मजेत, आनंदात असावं, असंच त्याच्या मनात येत असतं. 

 स्वत:च्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा,  असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते,  दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते.  अनेकदा आयुष्यात असं काही घडतं, की आपण  आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो.  आपण म्हणतो, माणसं दु:खातून बाहेर येत नाहीत. त्याचं  कारण ते दु:खाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं  मिटलेली असतील, तर आतलं दु:ख बाहेर जाणार कसं?  बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा?  आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दु:ख,  चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल, तर तशा  दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं  खुल्यादिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी ‘कधी  पडायचा पाऊस’ म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात.  त्यांचा नाइलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. 

आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो.  कृत्रिम नव्हे... नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल, म्हणून वाट पाहत बसलं,  तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण  घ्यायचा असतो. कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते.  एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं, की मग मात्र  ‘नाही आनंदा तोटा’ अशी अवस्था होते. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. आनंदात  राहण्याची सवयच जडायला हवी. सगळी धडपड  आनंदासाठी चाललेली असते; पण आनंद घ्यायला वेळ नसतो, हेच अनेकांचं दु:ख असतं. दु:खासाठी आपण भरपूर  सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची  मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. 

खरं  म्हणजे हे उलट व्हायला हवं. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं  आणि सवयीचं करून घ्यावं. ‘वाईट वाटणं’ दुर्मीळ,  अपवादाचं करून ठेवावं. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद  घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस, आनंदी  वृत्तीची असतात, म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार  असतो. त्यांनी ‘हात’ केल्यावर चिमणी भुर्रकन उडाली तरी  त्यांना केवढा आनंद होतो. किती आतून हसतात ती! आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला  पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टींतच असतो. आपण मात्र तो मोठ्या गोष्टींत  शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे  मोठे प्रसंग कितीसे येतात? तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं? आनंद कणाकणानं  टिपायचा असतो. क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला  मात्र तो टनाटनानं हवा असतो. ‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.

’ तिथंच सगळं चुकतं. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. ‘देता  किती घेशील दो कराने’, अशीच अवघी परिस्थिती आहे.  हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली  रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद.. झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं,  तरी थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा  पाहत राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसलं, तर वेडं व्हायला होतं. साक्षात  निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही, त्यांनी आयुष्यातील  आनंदाला विसर्ग द्यावा, हेच बरं. संगीताच्या सात सुरांमध्ये तर सात जन्म पुरेल एवढा  आनंद भरून राहिलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर  आनंदाची इस्टेटच आहे.

 कुमारगंधर्व, पं. भीमसेनजी,  पं. जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू  शकतो, हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद  म्हणतात, तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही, तरी ऐकता येतंच ना? कलाकार  मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो, तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं, निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता  येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते; पण कलावंत होता आलं नाही, तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू  शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे? पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असतेच. 

शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाइलाजानं नव्हे, परीक्षादेण्यासाठी नव्हे की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वत:ची हौस म्हणून काही शिकून पाहा. एखादी कला,  एखादी भाषा, एखादा खेळ. माणसं स्वत:ची हौस, स्वत:चा  छंद विसरू कसा शकतात, हे मला न उलगडलेलं कोडं  आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा  असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद  इतकं हे साधं गणित आहे आणि छंद म्हणाल तर तो अगदी  कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचं  किंवा पक्षी निरीक्षणाचं.. कसलं कसलं वेड घेतात लोक  डोक्यात; पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं  रहस्य असतं. 

आनंद हवा असेल, तर थोडं वेडं व्हावंच  लागतं. नेहमी ‘शहाणंसुरतं’ राहून जमत नाही. शहाणंसुरतं राहायचं असेल, तर वाचनाचा छंद  लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची  सोबत. ही सोबत तुम्हांला कधीच दगा देत नाही. या  आनंदासाठी टिच्चून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा  आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं  आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात,  तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काहीजण अशा वेळी  आवडीचं पुस्तक वाचतात, त्यादृष्टीनं पुस्तकाला  परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात;  पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. 

पुस्तकं म्हणजे कायम  उपलब्ध असलेले मित्र असतात. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत  असेल, तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू  शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो.  तुम्ही स्वत:च्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता,  स्वत:ला ओळखू शकता, स्वत:शी संवाद साधू शकता.  एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच  तुम्हांला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध,  साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो  एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो, दु:ख त्याच्या वाटेला कधीच जात  नाही! आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची  स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. 

भूतकाळ संपलेला  असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो  फक्त वर्तमानकाळ. तोच भरभरून जगायचा असतो.  वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं.  जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल, तर ‘आजचं काम  उद्या करू’ असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा  कसंतरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत  असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो.  एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा  घेणार?


एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो.  त्यात पूर्ण रंगून जातो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल  की नाही, याची चिंता करत बसलो, तर गाण्याचा आनंद  कसा घेणार? यासाठी आताच्या क्षणात जगा, याचा सोपा  अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे, ते करा. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग  भिजा. लोक काय म्हणतील, याचा विचार करू नका.  असा विचार करत बसलात, की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो.  बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो; पण जर  तुम्ही यात दु:खी असाल, उदास असाल, तर बाह्य यश  तुम्हांला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळवूनही माणसाला आनंद मिळत नाही.

 स्वत:बद्दल  ‘छान’ वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक  चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं, मला अजून  काहीतरी मिळवायला हवंय. ते मिळालं, तरच मला आनंद  वाटेल. हीच गल्लत होते. अशा वेळी त्यानं बाहेर नव्हे,  आत डोकवायला हवं. एवढं मिळवूनही मी आनंदात का  नाहीये? मला अशांत, अस्वस्थ का वाटतं आहे? मला  नेमकं काय हवं आहे? अशा वेळी उत्तर मिळू शकतं, ‘मला  विरंगुळा हवा आहे, मला बायकाे-मुलांत रमायला हवंय,  मला मित्रांशी जिवाभावाचं बोलायला हवंय, मला लिहायला  हवंय, मला लॅन्डस्केप्स्‌ करायला हवीत.’ तुम्ही आनंदी  नसता, त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा  कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं.  

आपल्याला काय हवंय, ते शोधणं हेच उत्तर असतं आणि जे खरोखर हवं असतं, ते आपल्याजवळ असतंच. आनंद,  प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर  ‘मानता’ येत असेल, तर तो ‘मिळवायचा’ कशाला? असं  काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ. जे रोज ताटात  येतं, ते आपण आवडीनं खायला हवंच. अगदी झुणका- भाकर आली तरीही. अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतात, ते खरंच  आहे; पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका-भाकर खाऊन  दिवस काढावेत, असा थोडाच होतो? अधिक सुखाचे-मी सुखाचे म्हणतोय-दिवस यावेत,  गोडधोड खावं, असं वाटणं गैर आहे का? ‘गोडधोड’ हे  सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की! कष्टाची भाकर गोड लागते  यात शंकाच नाही; पण कष्टाचं गोडसुद्धा गोडच लागतं  की! ते अधिक गोड लागतं, जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल तर! अधिक मिळवायला हवं; पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. 

पैसा का हवा असतो? पैसा मिळाल्यानं आनंद  होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला, याचा  आनंद असतो.  पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो, तोच पैशानं  अधिक आनंद घेऊ शकतो. नाही तर कितीही पैसे मिळाले,  तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या, अधिक  पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक  पारखा होत जातो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्‌विगुणित होतो.  असा आनंदाचा गुणाकार होतो; पण मुळातच आनंद शून्य असेल तर? शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं,  तरी गुणाकार शून्यच येणार. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत. आनंद  अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. 

पैशानं आनंद विकत घेता  येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच. टिकाऊ असला  तरच तो खरा आनंद. एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं  आहे; पण या प्रयत्नांतही आनंद असतोच. तो घेता आला,  की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आनंदी आयुष्यासाठीचं एक सोपं तत्त्व आहे- ज्यात  तुम्हांला खरा आनंद होतो, तेच क्षेत्र निवडा. स्वत:च्या आवडीचं काम निवडा. केवळ आई-वडिलांची इच्छा म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं  आपण आई-वडिलांच्या आनंदासाठी हे केलं; पण जेव्हा आई-वडिलांना जाणवतं, की मुलगा खरा आनंदी नाही,  तेव्हा शेवटी तेही खंतावतातच. ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.  अर्थात काही वेळा हे शक्य नसतं. हवं तेच काम मिळतं,

असं नाही; पण अशा वेळी जे काम करायचंच आहे, त्यात  आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. कुठल्याही  कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात.  तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत,  मजेत काम कसं करू शकतात, ते जाणलंत, तर तुम्हीही  हसत, आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. शांत चित्तानं, आनंदी वृत्तीनं काम केलं, तर यश  मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह  वाढतो, अधिक आनंद होतो, त्यामुळे पुन्हा अधिक यश,  अधिक आनंद- अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं   चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही... ती एक  सततची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो.

आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय | Aayusha Aanandacha Utsav Swadhyay

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post