दंतकथा [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] Dantkatha 12th Marathi Yuvakbharti

दंतकथा [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 


कृती (१) Q.1) कारणे शोधा व लिहा.

कृती (१) | Q 1.1 | Page 47
1)लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण...
SOLUTION
लेखकांना दातांबद्दल अजिबात प्रेम नाही; कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती.

2)दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण...
SOLUTION
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये, असे लेखकांना वाटते; कारण त्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपली होती आणि दातांशी नावानेसुद्धा जवळीक असलेल्या व्यक्तींना भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती.

कृती (१)  कृती करा.

कृती (१) | Q 2.1 | Page 47
1)दातांशी निगडित म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकाच्या मते वैशिष्ट्ये
SOLUTION
(१) दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही.
(२) दातांशी संबंधित असलेल्या म्हणी व शब्दप्रयोग दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचा प्रत्यय देतात.

2)दातासंबंधीच्या लेखकाच्या कल्पना
SOLUTION
(१) जे न घासल्याबद्दल लहानपणी मार पडतो ते.
(२) तरुणपणी जे खूप वेळ घासत बसल्यामुळे वडील माणसांची बोलणी खावी लागतात ते.
(३) व्यवहारात कोण केव्हा पाडील याचा भरवसा नसतो ते.
(४) दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते.

3)दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार
SOLUTION
(१) दात हेच सत्य आहे व जग मिथ्या आहे.
(२) संसार असार वाटतो.
(३) बायको व मुले हा भास वाटतो.
(४) ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे.

कृती (१) स्वभाववैशिष्ट्ये लिहा. 

कृती (१) | Q 3.1 | Page 48
1)परशाची स्वभाववैशिष्ट्ये
SOLUTION
(१) राजासारखा ऐटबाज व दिमाखात वागणारा.
(२)ताकदीची घमेंड बाळगणारा.
(३) स्वत:ला सिंह म्हणवून घेणारा.
(४)आळशी; स्वत:चे दात घासायचाही कंटाळा करणारा.

2)लेखकाची स्वभाववैशिष्ट्ये
SOLUTION
(१) सोशिकपणा नाही.
(२) कुणाचेही मन दुखावण्याची वृत्ती नाही.
(३) कधी कधी शौर्याचा आव आणतात.
(४) स्वत:मधील न्यूनत्व प्रामाणिकपणे मान्य करण्याची वृत्ती होती.

कृती (२) चौकटी पूर्ण करा.

कृती (२) | Q 1 | Page 48
1) लेखकाच्या मते सहावे महाभूत. ______
SOLUTION
लेखकाच्या मते सहावे महाभूत. दात

2) लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. ______
SOLUTION
लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. राक्षस

3)ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. ______
SOLUTION
ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. वनराज

4)लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. ______
SOLUTION
लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. कमनशिबी

5)लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. ______
SOLUTION
लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. कुंदकळ्यांची

कृती (३) व्याकरण.

कृती (३) | Q 1.1 | Page 48
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

1) चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो-
SOLUTION
चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो - कर्तरी प्रयोग


2) सगळे खूष होतात-
SOLUTION
सगळे खूष होतात - कर्तरी प्रयोग

3) त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले-
SOLUTION
त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले - कर्मणी प्रयोग

4) डॉक्टरांनी लीलया दात उपटला-
SOLUTION
डॉक्टरांनी लीलया दात उपटला - कर्मणी प्रयोग

कृती (३) खालील तक्ता पूर्ण करा. 

कृती (३) | Q 2 | Page 48

सामासिक शब्समासाचा विग्रहसमासाचे नाव
(१) पंचमहाभूत________________________
(२) परमेश्वर________________________
(३) शब्दप्रयोग________________________
(४) शेजारीपाजारी________________________
(५) विजयोन्माद________________________
SOLUTION
सामासिक शब्द

समासाचा विग्रह

समासाचे नाव

(१) पंचमहाभूते

पाच महाभुतांचा समूह

द्विगू

(२) परमेश्वर

परम असा ईश्वर

कर्मधारय

(३) शब्दप्रयोग

शब्दाचा प्रयोग

विभक्ती तत्पुरुष

(४) शेजारीपाजारी

शेजारी, पाजारी वगैरे

समाहार द्वंद्व

(५) विजयोन्माद

विजयाचा उन्माद

विभक्ती तत्पुरुष


कृती (३) खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा.

कृती (३) | Q 3 | Page 48
1) माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.
SOLUTION
वाक्प्रचार → दाती तृण धरणे.

कृती (३) खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

1) परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
SOLUTION
परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता.

2) शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)
SOLUTION
शिंव्हाला कुणाचचं भ्या नाही.

3) तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)
SOLUTION
किती हाडं हैत तुझ्या अंगात!

कृती (४)  स्वमत.

कृती (४) | Q 1 | Page 49
1) पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
SOLUTION
दंतकथा हा वसंत सबनीस यांचा बहारदार विनोदी लेख आहे. दातदुखी हा तसे पाहिले तर कारुण्यपूर्ण, वेदनादायक आणि गंभीर असा विषय. पण लेखकांनी नर्मविनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, अतिशयोक्ती, कोट्या अशा अनेक साधनांच्या साहाय्याने अत्यंत प्रसन्न व वाचनीय असा लेख निर्माण केला आहे. त्यातली काही उदाहरणे आपण पाहू.

मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही; कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यांत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. लेखकांची ही दोन वाक्ये पाहा. त्यांना दातदुखीचा खूपच त्रास झाला होता. यामुळे त्यांच्या मनात दातांबद्दल प्रेम नाही. किंबहुना काहीसा रागच आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा किती चपखल उपयोग केला आहे पाहा. मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी म्हण नाही. हे त्यांचे म्हणणे पहिल्यांदा वाचताना जरा गंमत वाटते. थोडे बारकाईने पाहिल्यावर, अनेक म्हणी आठवल्यावर लेखकांचे म्हणणे खरे असल्याचे लक्षात येते.

डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात; पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. हेसुद्धा एक गमतीदार वास्तव आहे. लेखकांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा येथे प्रत्यय येतो. दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा उल्लेख नुसता वाचताक्षणी हसू आल्याशिवाय राहत नाही.

दातदुखीतल्या ठणक्याची तीव्रता सांगताना लेखकांनी दिलेले उदाहरण लक्षणीय आहे. ते लिहितात, "एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो." हा दाखलासुद्धा अप्रतिम आहे. हे उदाहरण चमत्कृतीपूर्ण आहे. दातदुखीच्या वेदनेचा ठणका हे उदाहरण वाचतानाही आपण अनुभव. लेखकांचे हे विनोद निर्मितीचे कौशल्य विलक्षणच आहे.

2) लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
SOLUTION
दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला, पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली, तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल, तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले, तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही.

दातदुखीच्या प्रसंगातील लेखकांचे निरीक्षण मात्र बहारीचे आहे. ते इतके अचूक आहे की, स्वतःची दातदुखी आठवू लागते. दातदुखी, दाढदुखी ठणके जीवघेणे असतात. आपल्या दाढेच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या बसून एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत तर नाही ना, असे वाटत राहते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते. पण तेवढ्यात जीवघेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ती डोके फोडून बाहेर पडेल, असे वाटत राहते. वेदनेचे स्वरूप अवाढव्य असते. तिला राक्षसाखेरीज अन्य कोणतीही उपमा लागू पडत नाही.

दिवस कसाबसा जातो. पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आता रात्री ठणके मारू लागले तर? या कल्पनेनेच जीव अर्धमेला होतो. ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काहीही राहत नाही. रात्री वाहन मिळत नाही. डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो. हॉस्पिटल कुठेतरी खूप दूर असते. भीतीने जीव अर्धा जातो. डोक्यात घणाचे घाव पडत असतात. अन्य लोक आपल्याला मदत करू शकतात. पण ते आपल्या वेदना घेऊ शकत नाहीत. त्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली अक्राळविक्राळ राक्षसाची उपमा कळू शकेल

3) लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
SOLUTION
आपला देश परंपराप्रिय आहे. अनेक परंपरा आपण प्राणपणाने जपतो. या परंपरांमधली एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणे. एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, तर मग काही विचारायलाच नको. लोक जथ्याजथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात. यामागची कल्पना अशी की, आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो. मानसिक दृष्टीनेही थोडा कमकुवत बनतो. या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत, या समजुतीनेही भेटायला जातात. आपण आजाऱ्यासोबत थोडा वेळ बसलो, गप्पागोष्टी केल्या तर त्याला विरंगुळाही मिळतो. हे असेच घडले तर ते चांगलेच आहे.

प्रत्यक्षात काय दिसते? माणसे भेटायला जातात. पण गप्पागोष्टी काय करतात? थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की, गप्पांची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावरच येते. मग त्या रोगांसंबंधात नको नको त्या गोष्टी चर्चिल्या जातात. रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, नुकसान कसकसे होत जाते, काही माणसे कशी दगावली आहेत इत्यादी इत्यादी. या गप्पांमुळे आजारी व्यक्तीचे मनोबल वाढण्याऐवजी त्याचे खच्चीकरण होते. त्याची चिंता वाढते, तो नकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो. तो मानसिकदृष्ट्या खचतो. अशा स्थितीत आजाराशी लढण्याची उमेद कमी होते. याचा प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो.

माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात, तेव्हा वेळ मर्यादित असतो. तो ठरावीक कालावधीतच असतो. त्या वेळी ठीक असते. पण आजारी व्यक्ती घरी असली, तर माणसे कधीही, कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी थडकतात. कितीही वेळ बोलत बसतात. त्या व्यक्तीची अन्य काही कामे आहेत का, घरच्यांच्या काही अडचणी आहेत का, घरच्यांपैकी कोणाला बाहेर जायचे आहे का, विश्रांतीची वेळ आहे का, वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. त्यांचा कोण विचार करीत नाहीत. आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात. खरे तर आजारी व्यक्तीला अन्य व्यक्तींचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे. पण हे पथ्य तर कोणी पाळतच नाहीत.
आजारी व्यक्तींना भेटण्यासंबंधात काही एक पथ्ये, नियम करून त्यांचा प्रचार करणे खूप गरजेचे आहे.

कृती (५) अभिव्यक्ती.

कृती (५) | Q 1 | Page 49
1) प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
SOLUTION
पाठ्यपुस्तकात वेगवेगळे पाठ आहेत. त्यांपैकी 'दंतकथा' हा विनोदी पाठ मला खूप आवडला. पुन्हा पुन्हा वाचून मी आनंद घेतला. लेखक आहेत वसंत सबनीस.
वास्तविक दातदुखी हा अत्यंत वेदनादायक, माणसाला असहाय करणारा प्रसंग. त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्यपूर्ण नजरेने न पाहता एका गमतीदार, खेळकर दृष्टीने पाहतात. घटनेकडे पाहण्याचा कोनच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद, विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात.

 हे बदललेले रूप लेखकांनी नर्मविनोदी शैलीत चित्रित केले आहे. प्रसंग खेळकर, तिरकस नजरेने पाहिल्यामुळे, नर्मविनोदी शब्दयोजनेमुळे वाचकाच्या चेहेऱ्यावर स्मित रेषा उमटतेच. कधी कधी वाचक खळखळून हसतो. लेखकांनी मनुष्यस्वभावाचे नमुने मार्मिकपणे टिपले आहेत. तसेच विसंगतीही वाचकांना हसवत हसवत दाखवून दिल्या आहेत. दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग अतिशयोक्तीचा बहारदार वापर करीत वर्णिले आहेत. म्हणी-वाक्प्रचारांवर कोटी करून गमती साधलेल्या आहेत. शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केला आहे. यांमुळे संपूर्ण लेख चुरचुरीत, वाचनीय झाला आहे.

एक-दोन उदाहरणे पाहू. लेखाच्या सुरुवातीलाच दाताची पंचमहाभूतांशी सांगड घातली आहे. पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्त्वे आहेत. तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव. या दाताला लेखकांनी सहावे महाभूत म्हटले आहे. अत्यंत सामान्य गोष्टी महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास निर्माण झाला. पुढच्याच परिच्छेदात, परमेश्वराला दाताची कल्पना सहा-सात महिन्यांनंतर सुचली असावी, असा लेखकांनी उल्लेख केला. हे वाचताक्षणी हसू येते. परमेश्वर सर्वशक्तिमान, परिपूर्ण. तरीही दातांची कल्पना उशिरा सुचल्याचे लिहून लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले. त्यामुळे इथेही एक गमतीदार विरोधाभास निर्माण होतो.

भाषेतील निरीक्षणही बहारीचे आहे. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण वा वाक्प्रचार मराठीत नाही. दातांवरून ज्या म्हणी-वाक्प्रचार आहेत, त्या दारिद्र्य, भिकारपणा व असभ्यपणा यांचा निर्देश करणाऱ्या आहेत. हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो. 'दात पाहून प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर' अजून पाहिला नसल्याचे ते नमूद करतात.
या अशा उल्लेखांमुळे लेखाला खेळकरपणा चुरचुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे. कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे.

दंतकथा [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] Dantkatha 12th Marathi Yuvakbharti 

   मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे  म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते  दिसली, त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे मला  राहून-राहून नवल वाटते. या सहाव्या महाभूताला  सामान्यांच्या भाषेत ‘दात’ असे म्हणतात. माझ्या मते, दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख  आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर  जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ही दाताची कल्पना  परमेश्वराला सुचली असावी. नाही तर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का यावेत?
 
  तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात  नाही किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे  नाक आल्याचेही ऐकिवात नाही; पण दात हा एकच अवयव असा आहे, की जो दोनदोनदा उगवतो. तेव्हा माणसाला  शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी  म्हणून ही दातांची योजना झाली आहे याबद्दल माझी तरी  खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा  कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही. पण  दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येताना ताप  आणि गेल्यावर पश्चाताप!

   मला स्वत:ला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत  नाही. कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे! अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही. त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो  पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे  अशीही एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक  माझ्यापासून दूर पळतात. आता मी दिसेल त्याला मुळीच  चावत नाही. कारण चावण्याची हौस अनेकदा स्वत:चीच  मनगटे चावून चावून भागली आहे! पण माझ्या दातांनी मला  एवढा उपद्रव दिला आहे, की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला  उपद्रव काहीच नाही आणि म्हणूनच दातांबद्दल मला  दातांत धरता येईल एवढासुद्धा आदर राहिलेला नाही.  माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही  असेही मला नंतर आढळून आले. कारण मराठी भाषेत  अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दातांबद्दल मंगल  भावना व्यक्त झाली आहे. 

   ज्या म्हणी व शब्दप्रयोग दातांशी  निगडित आहेत, त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा  यांचे प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. नाही म्हणायला  प्रेमविव्हल कवींनी प्रेयसीच्या दातांना कुंदकळ्यांपर्यंत  नेऊन पोचवले असेल तेवढाच अपवाद! तरी पण केवळ प्रेयसीच्या दातांत जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी  झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही.  डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला  गुंतवतात; पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून  भेटावयाचा आहे. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो, तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल  वडील माणसांची बोलणी खावी लागतात, व्यवहारात जे  कोण केव्हा पाडील याचा भरवसा नसतो आणि जे  दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी  दातांबद्दलची कल्पना आहे.

     मनुष्यस्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली  नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली.  एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात  हे मला कळत नसे. आमच्या परशा पहेलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे चारीमुंड्या चीत झालेला मी पाहिला,  तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला.  परशा हा जन्मापासून पहेलवान. रानात अनेकदा  लांडग्याशी एकटा झुंजलेला. अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत  चालायचा, की जसा काय वनराजच! छाती इतकी पुढे  काढायचा, की अनेकदा आधी त्याची छातीच दिसायची  mअाणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात  भेटला, की ‘‘काय रं, कुटं निगालास?’’ असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ; पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट  असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे.

     ‘‘चाललोय कुस्ती मारायला... येतोस?’’ ‘‘कुस्ती?’’ असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा आणि ‘‘अरं, अगुदर माशी तर मार नाकावरली...  मग कुस्तीचं बगू’’ असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा; पण गंमत अशी, की दणका मला  दिला तरी लागायचे त्याला. ‘‘लइ हाडं हैत तुझ्या अंगात! दगडावाणी लागत्यात  हाताला.’’ असे त्याने म्हटले, की हाडाच्या बाबतीत का  होईना; पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद  अधिक वाटायचा.  आपल्या ताकदीची-मस्तीची परशाला फार घमेंड  होती. स्वत:चा उल्लेख करताना तो ‘शिंव्ह’ म्हणायचा.  स्वत:ला ‘शिंव्ह’ म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा.
 
‘‘काय परशा, यंदा कशी काय तयारी आहे?’’ असे  कुणी विचारले, की त्याचे उत्तर ठरलेले असे- ‘‘शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुनाचं?’  ‘शिंव्ह मातीत उतरला, की लांडगी, कोल्ही पाक  पशार व्हत्यात... ‘शिंव्हाला अल्याड लई झोप लागतीया’,

   अशा भाषेत तो नेहमी स्वत:बद्दल बाेलायचा. त्याला दात  घासायचा विलक्षण कंटाळा असे. चार-आठ दिवसांतून  एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा. त्याबद्दल  मी एकदा सहज त्याला विचारले, ‘‘परशा, तू दात घाशीत  नाहीस वाटतं रोज?’’   ‘‘शिंव्ह काय दात घासतो व्हय कदी?’’ असे त्याने  ताडकन उत्तर दिले. असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी  सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता.  त्याची ऐट, त्याचा दिमाख, त्याची घमेंड यांपैकी कशाचाही  मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कुस्तीत हरला  तरी तो कधी असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी  विचारले, ‘‘काय पहेलवान, काय झालं आज?’’ केविलवाणा चेहरा करून म्हणाला, ‘‘दात रं! काल  रातच्या धरनं असा ठणकतुया! काईएक सुचेनासं झालंया.’’ ‘‘अरे, सिंहाचे दात कधी दुखतात होय?’’ मी जरा  थट्टेने म्हणालो  ‘‘कसला शिंव्ह घिऊन बसलास मर्दा? ह्या दातानं  शिंव्हाचा पार बकरा करून टाकलाया!’’ असे म्हणून त्याने  त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला, ‘‘अरं, शिंव्हच न्हवं, नरशिंव्ह आला  तरी दाताम्होरं त्येचं काई एक चालायचं न्हाई!’’

    मला त्यावेळी परशाचे हसू आले; पण काही  काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार  उतरला. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी. किंबहुना दात ह्या इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच  असावे. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी  अजून आढळलेला नाही. असा कुणी असलाच, तर तो  कमनशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग  त्याच्या नशिबी नाही.

    अनेक वर्षे समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा  माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला.  असा ठणकू लागला, की त्याने माझी अवस्था हीनदीन  झाली. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती  केली असेल तर ही, की ज्यांच्या ज्यांच्या दाढदुखीची  अवहेलना केली होती, त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली.  दात दुखायला लागला, की तो मुळापासून दुखू
लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला  लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला 
लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली, की आपण  आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यांत फार फरक असला पाहिजे.  आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या
पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास 
मला का व्हावा? प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर  ज्या दाताने शंख करायला लावला, तो दुखरा दात याची  खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत  नाही! बरे, हे दुखणे तरी साधे, सरळ असावे? तेही नाही.  एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा  लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला  असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. असे म्हणतात, की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच  माणसांसारखा असावा. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण  सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ का होतो? दातांत आणि चोरांत साम्य असते ते याच  बाबतीत. दोघेही रात्री गडबड करतात.

    दात दुखण्याने मी अाध्यात्मिक तत्त्वचिंतनही करतो.  दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो, की दात हेच सत्य आहे. जग मिथ्या आहे. त्या क्षणी संसार असार वाटतो.  नेहमी हवेहवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते.  समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही  आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. रात्रभर  माझ्या ब्रह्मांडाच्या दहा-वीस फेऱ्या तरी सहज होतात  आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची  पुन्हा एकदा जाणीव होते. माझ्याबद्दल लोकापवाद फार. दातदुखीही त्यातून  सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात सबंध  आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात; पण  माझा यावर विश्वास नाही. अर्थात आळीतील सर्व लोक  आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच  ना?’ असा सवाल करून जातात हे खरे आहे; पण यावरून  त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही.

मागच्याच दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात  दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. (दातदुखीच्या काळात सामान्यत: मी असाच बसतो.) चेहऱ्यावर बहुधा  कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा.  कारण मी आरशात पाहत नाही. तोंडातल्या तोंडात दाताला  आरसा कशाला? मी घशातल्या घशात आवाज बंद  करण्याचा प्रयत्न करूनसुद्धा तो बंद होत नव्हता. घसा  आणि जीभ फितूर झाली होती. मी फारच मोठ्याने ओरडत  होतो, असे बायकोचे मत होते आणि माझ्या बाबतीतील  बायकोचे मत हे बहुधा सबंध आळीचे मत असते.

    ‘‘अहो, केवढ्यांदा ओरडताय? लोकांना काय  वाटेल?’’ अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार?  ‘‘माझा दात दुखतोय त्याला मी काय करू?’’ ‘पण शेजारीपाजारी माणसं राहतात! ती काय 
म्हणतील? अगदी लहान मुलासारखे काय थैमान  घालताय?’’ ‘‘दात-दात-दात!’’ मी चिडून म्हणालो.
‘‘ते कळलं.’’  ‘‘तुला कळलं. सगळ्यांना कुठं कळलंय?’ ‘‘सगळ्या जगाला का कळायला पाहिजे? थोडा तरी   सोशिकपणा दाखवा ना म्हणते मी.’’ ‘‘तू लाख म्हणतेस-दात तुझा नाही. तो माझा आहे.  माझ्या दातदुखीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण?’ ‘‘मग खुश्शाल ओरडाऽऽ!’’ ‘‘ओरडीन-ओरडीन! सोडतो की काय? आई 
गऽऽऽ! मेलोऽऽऽ!’’ ‘‘आता गप्प बसा जरा. मी कापूर देते दाताखाली धरायला. त्यानं ठणका कमी होईल.’’
   ‘‘नकोऽऽऽ! सरळ बत्ता आण आणि दातावर हाण.’’
   ‘‘वेड लागलंय की काय तुम्हांला?’’
   ‘‘तू खल करू नकोस, बत्ता आण.’’
   ‘‘इश्श्य! मेला एवढा दात दुखतोय तरी शब्दावर कोटी 
   करायची सोडू नका!’’
   तेवढ्यात बाहेर कुणीतरी आले. बायको जाऊन पाहून 
   आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाली,
   ‘‘दाते आले आहेत.’’
   ‘‘ह्या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे की
   काय? माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे 
प्रथम येतात?’’

      दातदुखीच्या काळात माझी सहनशक्ती पार खलास  झालेली असते. दाते किंवा दातार ह्या दातांशी जवळीक  दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे वाटते!  माझ्या दातदुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे, की 
माझ्या विव्हळण्याने शेजारीपाजारी गोळा होतात आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी, ती का होते,  टाळावी कशी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत  यावर एकदा तरी परिसंवाद होतोच. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात. हीच मंडळी एवढ्या मोठ्याने बोलतात, की माझे विव्हळणे त्यात बुडून जाते. माझा  अनुभव असा, की दातदुखीवरील चर्चेने दातदुखी मुळीच  कमी होत नाही! दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले  आहेत. 

माझा दात दुखू लागला, की मी बायकोला त्यातले  काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले काही  उपचार करते. अशी मिळून २०-२५ प्रकारची औषधे,  बोळे माझ्या दातामागे लागतात. चार दिवसांनी दात 
दुखायचा थांबतो. कशामुळे थांबला याचा शोध करायच्या मी भानगडीत पडत नाही. दात दुखणे थांबल्याचे  कळल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते आपलाच  उपचार लागू पडला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी  येतात. मी कुणाचेही मन दुखवत नाही. प्रत्येकाला त्याने  सुचवलेल्या उपायानेच गुण आल्याची कबुली देऊन मोकळा होतो. सगळे खुश होतात. दंतआघाडीवर सर्वत्र  सामसूम होते. एखाददुसरा महिना जातो आणि पुन्हा तोच  दात, तोच ठणका आणि तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग  होतो.

      या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने तो दातच काढून टाकण्याचा  निर्धार जाहीर केला. अनेकांचा सल्ला घेऊन आणि अनेक  दंतवैद्यांचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला. का कुणास ठाऊक; पण माझी अशी समजूत  झाली, की ज्याचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणे बरे. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाही संबंधआला नव्हता. आणि तेच ठीक होते असे संबंध आल्यावर  वाटले. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. 

दात  काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्याइतका दुसऱ्या कुणालाच पसंत पडला नाही. दात काढण्याबाबत आमचे  मतैक्य झाल्यावर पुढचा मार्ग सरळ होता. फक्त दात  काढायलाही पैसे द्यावे लागतात याचे वाईट वाटले; पण  मग माझी मीच समजूत घातली, की आपण डोक्याचे केस  मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो, मग दात मुळासकट  काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले? आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, की दहा-बारा  वर्षांपूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या, त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया  इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीतीहोती; पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक  मत झाले. 

त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका  लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच  राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे  वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना  भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात  घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली.

     दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने  माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला  हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊनमनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही,  पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा  उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने  बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो  काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण  त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो  दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच  ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला  जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’

दंतकथा [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post