वीरांना सलामी स्वाध्याय कृति | Veeraana Svaasthy Svaadhyaay [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

वीरांना सलामी स्वाध्याय कृति | Veeraana Svaasthy Svaadhyaay


कृती (१) काव्यसौंदर्य.

कृती (१) | Q 1.1 | Page 25
1) दृक्-श्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणज
SOLUTION
(१) दुर्दम्य आशावाद
(२) असामान्य कर्तृत्व
(३) प्रखर राष्ट्रनिष्ठा
(४) अदम्य साहस

2) कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये
SOLUTION
(१) शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या मूल्यांना यथोचित न्याय देणे.
(२) सैन्यदलातील वीरांचे भाट होऊन त्यांची कवने गाणे.
(३) पुढील ५ वर्षे नागरिकांना इथे आणून वीरांना सलामी देणे.
(४) पन्नाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे.

3) लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट
SOLUTION
(१) आत्मकेंद्री
(२) संकुचित

4) लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट
SOLUTION
(१) कामकरी मुंग्यासारखे झपाझप काम करणे.
(२) उमदा, प्रसन्न चेहरा.
(३) सतत कामात.
(४) कमालीची आतिथ्यशीलता.

कृती (१) चौकटीत उत्तरे लिहा.

कृती (१) | Q 2.1 | Page 25
1) तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक _____
SOLUTION
तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक ऑपरेशन विजय

2) भयाण पर्वतांवर चढणार ____
SOLUTION
भयाण पर्वतांवर चढणार आमचे धैर्यधर सैनिक

3) मृत्यूलाच आव्हान देणारी ____
SOLUTION
मृत्यूलाच आव्हान देणारी २२-२३ वर्षांचे तेजस्वी तरुण

4) कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी ____
SOLUTION
कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी ड्रायव्हर स्टानझिन

5) चोवीस जणांची लडाख भेट ____
SOLUTION
चोवीस जणांची लडाख भेट मिशन लडाख

कृती (१)  कारणे लिहा.

कृती (१) | Q 3.1 | Page 25
1) थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकाला सलाम केला, कारण...
SOLUTION
थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी 'ऑपरेशन विजय यांच्या स्मारकाला सलाम केला; कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या २२-२३ वर्षांच्या कोवळ्या तरुणांचे!

2) 'मिशन लडाख’ साठी ‘राखी पौर्णिमे’चा मुहूर्तनिवडला, कारण...
SOLUTION
'मिशन लडाख 'साठी 'राखी पौर्णिमे 'चा मुहूर्त निवडला; कारण आपल्या रक्षणकर्त्या प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले, तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल, असे लेखिकांना वाटत होते.

3) लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण...
SOLUTION
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं; कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.

4) समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण...
SOLUTION
समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते; कारण समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणांमधून खरा सैनिक घडवणे जिकिरीचे बनले होते.

कृती (१) पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

कृती (१) | Q 4.1 | Page 25
1) एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.
SOLUTION
आपली माणसे, आपला गाव सोडून सैनिक हजारो मैल दूर वर्षानुवर्षे राहतात. आपली माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी वागताना मिळणारा भावभावनांचा गोड अनुभव त्यांना मिळत नाही. म्हणून लेखिका व त्यांच्या सोबती यांचा अल्पसा सहवासही त्यांना सुखद वाटतो.

2) ‘सेवा परमो धर्म:’
SOLUTION
लेखिका कारगिल-द्वास येथून परतत असताना घडलेला प्रसंग आहे हा – रात्रीचे साडेदहा वाजले होते. मिट्ट काळोख पसरला होता. खल्सेचा पूल कोसळला होता. मागे-पुढे कुठेही जाण्याची सोय नव्हती. कर्नलना फोन लावला. विशेष म्हणजे ते फोनची वाटच पाहत होते. कर्नल लष्करी अधिकारी. कार्यव्यग्र. पण तशातही त्यांनी आठवण ठेवून लेखिकांसहित सर्व ३४ जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले. सेवावृत्ती असल्याशिवाय इतका प्रतिसाद मिळालाच नसता.

3) गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.
SOLUTION
लडाखच्या दऱ्याखोऱ्यात, मिट्ट काळोखी रात्र. पावसामुळे जमिनीवरून पाण्याचे ओहोळ वाहत होते. खल्सेचा पूल कोसळला होता. काळजाचे पाणी पाणी करणारा प्रसंग! अशातच लेखिकांनी कर्नल राणा यांना फोन केला, तेव्हा त्यांचा आशादायक, दिलासादायक स्वर लेखिकांच्या कानांवर पडला. त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती. लेखिकांचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे, आनंदाचे अश्रू येऊ लागले.

4) लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.
SOLUTION
लष्कराबद्दल सर्वसाधारण नागरिकांत गैरसमज फार असतात. लष्करातील जीवन अत्यंत खडतर असते. तेथे सुखकारक काहीच नसते. संपूर्णपणे बंदिस्त जीवन असते. सतत घरादारापासून दूर राहावे लागते. म्हणून बुद्धिमान तरुण लष्कराकडे वळत नाहीत. मुली सैनिकांशी लग्न करण्यास राजी नसतात. एक प्रकारे लष्कर आणि सामान्य जनता यांच्यात फार मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी भरून काढण्याचे व दोन्ही बाजूंमध्ये संवाद निर्माण करण्याचे कार्य लेखिका त्यांच्या उपक्रमांद्वारे करीत होत्या.

कृती (२) खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

कृती (२) | Q 1.1 | Page 25
1) जमीन अस्मानाचा फरक असणे.
SOLUTION
अर्थ - खूप तफावत असणे.
वाक्य - सुशिला समंजस व सुनिला हेकट आहे. दोघींच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे.

2) अंगावर काटा येणे.
SOLUTION
अर्थ - तीव्र मारा करणे.
वाक्य - भारतीय जवानांनी शत्रूवर तोफांतून आग ओकली.

3) आग ओकणे.
SOLUTION
अर्थ - भीतीने अंगावर शहारा येणे.
वाक्य - जंगलातून जाताना अचानक समोर वाघ पाहून प्रवाशांच्या अंगावर काटा आला.

4) मनातील मळभ दूर होणे.
SOLUTION
अर्थ – गैरसमज दूर होणे.
वाक्य - मनीषा पटेल असा त्याच्या वागण्याचा खुलासा केल्यानंतर सुदेशच्या मनातील मळभ दूर झाले.

कृती (२) खालील तक्ता पूर्ण करा.

कृती (२) | Q 2 | Page 26

क्र.

वाक्य

वाक्यप्रकार

बदलासाठी सूचना

(१)

जमेल का हे सारं आपल्याला?

______

विधानार्थी करा

(२)

तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.

______

उद्गारार्थी करा

(३)

यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता.

______

प्रश्नार्थक करा

(४)

पुढील सगळे मार्ग बंदच होते.

______

नकारार्थी करा

SOLUTION

क्र.

वाक्य

वाक्यप्रकार

विधानार्थी – हे सारं आपल्याला जमेल.

(१)

जमेल का हे सारं आपल्याला?

प्रश्नार्थी वाक्य

उद्गारार्थी - किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल!

(२)

तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.

विधानार्थी वाक्य

प्रश्नार्थक - यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का?

(३)

यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता.

नकारार्थी वाक्य

नकारार्थी - पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते.

(४)

पुढील सगळे मार्ग बंदच होते.

होकारार्थी वाक्य

विधानार्थी – हे सारं आपल्याला जमेल.


कृती (२) खालील तक्ता पूर्ण करा.

कृती (२) | Q 3 | Page 26
क्र.सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

बावीसतेवीस

 

 

(२)

ठायीठायी

 

 

(३)

शब्दकोश

 

 

(४)

यथोचित

 

 

SOLUTION

क्र. सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

बावीसतेवीस

बावीस किंवा तेवीस

वैकल्पिक द्वंद्व

(२)

ठायीठायी

प्रत्येक ठिकाणी

अव्ययीभाव

(३)

शब्दकोश

शब्दांचा कोश

विभक्ती तत्पुरुष

(४)

यथोचित

उचित (योग्यते) प्रमाणे

अव्ययीभाव


कृती (२)  योग्य पर्याय निवडा व लिहा.

कृती (२) | Q 4.1 | Page 26
1) तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग-
OPTIONS
1) भावे प्रयोग
2) कर्तरी प्रयोग
3) कर्मणी प्रयोग
SOLUTION
तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग- कर्तरी प्रयोग

1) तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग-
OPTIONS
1) भावे प्रयोग
2) कर्तरी प्रयोग
3) कर्मणी प्रयोग
SOLUTION
तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग- कर्तरी प्रयोग

2) त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग
OPTIONS
1) कर्तरी प्रयोग
2) भावे प्रयोग
3) कर्मणी प्रयोग
SOLUTION
त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग - भावे प्रयोग

3) पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-
OPTIONS
1) त्यांनी आम्हांला दृक्-श्राव्य दालनात नेले
2) भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच
3) आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता
SOLUTION
पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य - आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता

कृती (३)  स्वमत.

कृती (३) | Q 1 | Page 26
1) ‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो ।’ असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.
SOLUTION
 जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे आक्रमण होते किंवा अतिरेक्यांचे हल्ले होतात, तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकांबद्दलचे प्रेम उफाळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंनी लोक उपस्थित राहतात. एरव्ही सर्व नागरिक आपापल्या सुखात मशगुल असतात. देशावर प्रेम करायचे म्हणजे नाटक, सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे किंवा १५ ऑगस्ट – २६ जानेवारीला झेंडावंदन करायचे. शेवटी, मूठ वळलेला हात हवेत उंचावून 'भारतमाता की जय' असे जोरात म्हणायचे! हीच देशभक्ती! आपली देशभक्ती कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे.

वीरमरण आलेल्या सैनिकाच्या आईचे उद्गार सर्व देशवासीयांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा, असे विनवीत आहे. देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे.

देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चिंतायचे, देशाचे ज्या ज्या गोष्टीत भले होते, त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी देशाला हानिकारक आहेत त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. आता हेच बघा ना - काही काळापूर्वी कोरोनाचा कहर चालू झाला होता. लागलीच नाक-तोंड झाकायचा पाच रुपयांचा मास्क पंचवीस रुपयांना विकला जाऊ लागला. ताबडतोब काळाबाजार सुरू. काही समाजकंटक वापरलेले मास्क इस्त्री करून विकत होते. दुधात भेसळ, अन्नधान्यात भेसळ, भाज्या तर १५० २०० रुपयांना किलो अशा सुद्धा विकल्या गेल्या होत्या. लोक लाच घेतात. कामात घोटाळे करतात. कोणतेही काम प्रामाणिकपणे करीत नाहीत. त्यामुळे उत्पादने वाईट निर्माण होतात. सेवा चांगल्या मिळत नाहीत. हे सर्व देशाचेच नागरिक ना? असे केल्याने देशाची प्रगती कशी होईल?

सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करणे ही देशभक्ती आहे. हेच देशावर प्रेम आहे. विद्यार्थ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच सचोटीने कामे केली तर देशाची प्रगती होईल.

2) ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.
SOLUTION
सर्व लोकांच्या मनात सेनादलांविषयी गैरसमज फार आहेत. परकीयांचे आक्रमण होते त्या वेळी सेनादलांबद्दल अफाट प्रेम आणि अभिमान उफाळून येतो. पण गैरसमज वितळून जात नाहीत.

सेनादलातील जीवन खूपच कष्टाचे असते. ते नियमांनी करकचून बांधलेले असते. त्यात वैविध्य नसते. म्हणून ते कंटाळवाणे असते. सेनादलांविषयीचा हा दृष्टिकोन वरवर पाहिले, तर बरोबर आहे, असे वाटेल. पण हे गैरसमज आहेत. अगदी घट्ट रुतून बसले आहेत.
मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करीत आणले की भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले MBBS, IIM, B.Tech, M.Tech, BE, ME या अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात. बाकीचे विद्यार्थी आपापल्या मगदुराप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात. पण कोणीही अगदी कोणीही, 'मी सेनादलात जवान म्हणून जाईन, अधिकारी म्हणून जाईन,' असे म्हणत नाहीत. हे कशाला? मुलीच्या लग्नाच्या वेळी कोणीही सेनादलातील मुलांचा नवरा म्हणून विचार करीत नाही. यामागे खरे तर गैरसमज आहेत.

कष्ट काय फक्त सैन्यातच असतात. सध्या आयटीमधील मुले १२-१२, १५-१५ तास काम करतात. घरी आल्यावरही ऑफिसचे काम असतेच. हे काय कष्ट नाहीत? वास्तविक लष्करातील कष्टाची व शिस्तीची शिकवण मिळाली, तर माणूस जीवनातील कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळवू शकतो. तसेच, लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते. किंबहुना लष्करातील थरारक अनुभव अन्यत्र कुठेच मिळू शकत नाही. शिवाय, लष्करात गेले की लढाई होणारच आणि आपण मरणारच असे थोडेच असते? नागरी जीवनात अपघाताने मृत्यू येत नाही? मुले आयुष्यभर कुटुंबापासून दूर राहतात, हेही पटण्यासारखे नाही. अलीकडे मुले अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे किती तरी दूर दूर जातात. त्याचे काय?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लष्करात फक्त पाच वर्षे नोकरी केली की मुक्त होता येते. ही सोय इतरत्र असते का? लष्कराचे अत्यंत मूल्यवान प्रशिक्षण मिळाले, तर नंतर कुठेही चमकदार जीवन जगता येऊ शकते. पण हे कोणीतरी जिव्हाळ्याने समजावून सांगितले पाहिजे आणि हे काम लेखिका अनुराधा प्रभुदेसाई करू शकतात, असा विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत होता.

3) ‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
SOLUTION
कर्नल राणा लेखिकांशी अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या बोलण्यात रूक्षपणा, परकेपणा किंवा केवळ औपचारिकपणा नव्हता. त्यांच्या मनात सेनादलाविषयी विलक्षण कळकळ होती. ती कळकळ लेखक समजून घेऊ शकत होत्या. याचा कर्नल राणा यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या मनात सैनिकी जीवनाविषयी ठाम धारणा होत्या. त्या धारणांना अनुसरून सैनिक घडवायला हवा, असे त्यांना मनोमन वाटत असे. तसा सैनिक घडवणे आता जिकिरीचे बनले होते. राणा यांना ही स्थिती तीव्रपणे जाणवत होती.

सध्याच्या तरुणांवर टीव्ही व सामाजिक माध्यमे यांचा फार मोठा प्रभाव आहे. टीव्हीवरील कार्यक्रम बहुतांश वेळा वास्तवापासून दूर गेलेले असतात. किंबहुना प्रेक्षकांना वास्तवापासून दूर नेणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. त्या कार्यक्रमांतील सामाजिक समस्या या वास्तव नसतात. त्या काल्पनिक असतात. एखाद्या कार्यक्रमातील कथानकात वास्तवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असतो, नाही असे नाही. पण ते वास्तव खूप सुलभ केलेले असते. त्यातले ताणतणाव अस्सल नसतात. ते सुलभीकृत असतात. त्यामुळे त्यातील चित्रणात, जीवनाच्या दर्शनात उथळपणा असतो. सैनिक घडण्यासाठी ज्या धारणांची आवश्यकता असते, त्या धारणा तरुणांना परिचयाच्या नसतात. त्यामुळे त्यांना सैनिक म्हणून घडवणे जिकिरीचे बनते. सेनादलातील वास्तव हे रोकडे, रांगडे असते. तर टीव्हीमुळे सैनिकांविषयी रोमँटिक कल्पना निर्माण केली गेलेली आहे. सेनादलाला रोमँटिकपणा, हळवेपणा चालत नाही. तेथे रोखठोक, कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते. हे नवीन तरुणांना जमत नाही.

नागरी जीवन व सैनिक जीवन यांच्यात अंतर पडलेले आहे. चांगला सैनिक होण्यासाठी हे अंतर दूर करणे आवश्यक आहे. तरच देशाला चांगला सैनिक मिळू शकतो. त्यासाठी आपण प्रथम सैनिक समजून घेतला पाहिजे. लेखिकांना कर्नल राणांकडून हा दृष्टिकोन मिळाला. या जाणिवेमुळे सैनिकातला माणूस समजून घेणे आपल्याला अधिक सोपे जाईल, असे लेखिकांना वाटले. ही भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी 'आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला,' असे विधान केले आहे.

कृती (४)  अभिव्यक्ती.

कृती (४) | Q 1 | Page 27
1) सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा.
SOLUTION
सैनिकाला स्वत:चे जीवन हजारो मैल दूर अंतरावर, कुटुंबीयांपासून लांब राहून जगावे लागते. आपल्या माणसांत राहून, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन जगता येत नाही. कष्टमय दैनंदिन जीवन त्याच्या वाट्याला येते. आरामदायी जीवन जवळजवळ नाही. दऱ्याखोऱ्यांतून, वाळवंटातून, जंगलांतून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते. तासन्तास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात. आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. हे असे का? ते तसे नको. हे मला जमणार नाही, ते मी नंतर करीन, मला आता कंटाळा आला आहे, असे काहीही बोलता येत नाही. सैनिकाला संचारस्वातंत्र्य नसते. कुठेही जावे, कोणालाही भेटावे, काहीही करावे किंवा काहीही करू नये, असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते. खरे तर अत्यंत खडतर, कष्टमय जीवन सैनिक जगत असतो.

याउलट, नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. नागरिक कुटुंबीयांसोबत राहतो. सुखदुःखाचे सगळे क्षण तो कुटुंबीयांसोबत अनुभवतो. त्याला कुटुंबीयांचा सहवास मिळतो. कुटुंबीयांना त्याचा सहवास मिळतो. नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते. तो कुठेही, कधीही, कोणाहीकडे जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो; हवे ते करू शकतो. कोणत्याही प्रकारे तो मनोरंजन करून घेऊ शकतो. असे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याच्यासमोर एकच काम असते - देशाचे रक्षण करणे. त्यात तो हयगय करू शकत नाही. त्याच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतो. त्याच्या भरोवशावर आपण सण-उत्सव साजरे करू शकतो. आपण नेहमीच सैनिकाचे ऋणी राहिले पाहिजे.

2) कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है ।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.
SOLUTION
सिर्फ दिमाग में डालना है!' हा मंत्र मला खूप मोलाचा वाटतो. हा मंत्र मला खूप आवडला आहे. तो मी प्रत्यक्षात अमलात आणणारच आहे. मी काही वेळा असे केलेलेच आहे. फरक एवढाच की, त्या वेळी हा मंत्र मला ठाऊक नव्हता. मी धडाक्यात काही गोष्टी पार पाडल्या आहेत. मी दोन उदाहरणे सांगतो. त्यावरून मी काय करणार आहे, हे लक्षात येईलच.

गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही, मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले.. निबंध लिहायचाच. आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोन तीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले... माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय. मग मुद्दे लिहायला घेतले. सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले. प्रत्येक मुद्द्याबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. ... आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो. निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला. सरांनी 'उत्तम' असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!

दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले. मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले... आपणच का धुवू नयेत? पण शंका आली... आपल्याला झेपेल? किती वेळ लागेल? हात दुखतील? पण तत्क्षणी विचार आला... आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले... आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.

हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र 'सिर्फ दिमाग में डालना है!' आता मी ठरवून टाकले आहे... मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार... असे... दिमाग में डाल दे दूँगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.

वीरांना सलामी स्वाध्याय कृति | Veeraana Svaasthy Svaadhyaay

    एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा  प्रवास-लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी  द्रास, कारगिल! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता.  कारगिल आणि द्रास! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर  स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.

    सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे  १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. नि:शब्द अवस्थेतच  तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा  तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब,  हंप, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका,  त्याच्या बाजूचा पॉईंट  ४८७५-भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर  घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर, शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयाण  पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते.

      मृत्यू समोर दिसत असतानाही  त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच  आव्हान देणारी बावीसतेवीस वर्षांची  तेजोमय स्फुल्लिंगं होती ती! ज्यांना  आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर  नतमस्तक होऊन सलामी देणं किती  कष्टप्रद आहे, ह्याची जाणीव झाली.  थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी  त्या स्मारकाला सलाम केला. तेवढ्यात एक तरुण लष्करी  अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल-युद्धाची  फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनात नेलं. तो सगळा  थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर  राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ

   करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक  बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, ‘‘जिस देश पर मैंने  अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो  करो!’’ चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना  झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना  मनाला झाल्या. आणि त्या विव्हळ अवस्थेत  विजयस्तंभासमोर शपथ घेतली
 
 ‘‘शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाहीत, तर तशी  वृत्ती बनलेल्या सैन्यदलातील त्या वीरांचे भाट होऊन  त्यांची कवनं गाईन आणि निदान पुढील पाच वर्षं नागरिकांना  सोबत घेऊन ह्या भूमीवर येऊन सर्ववीरांना सलामी देईन.  पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन.’’

   भावनिक कल्लोळ शमला आणि भानावर आल्यावर  एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. भावनावेगात शपथ  तर घेतली; पण जमेल का हे सारं आपल्याला? विचाराअंती  मन खंबीर केलं. काही क्षणातच मनाचा निश्चय झाला  आणि मग प्रतिज्ञापूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू  झाली.

  ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे  ‘राखी पौर्णिमा!’ सगळ्यांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण-भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं.  बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील  तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली,  आशीर्वाद दिले; तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला  जायचं हे निश्चित ठरवलं. चोवीसजण आमच्याबरोबर  यायला तयार झाले आणि सुरू झालं ‘मिशन लडाख’.

  सैनिकांच्या रेजिमेंटमध्येजायचं, सैनिकांना भेटायचं;  म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता.  बऱ्याच खटपटी करून आम्हांला निघण्यापूर्वी १४  कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला.  आम्हांला १४ कोअरच्या कर्नल झा यांनी बोलावलं होतं. आमचं मन धास्तावलं, सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी  त्यांच्या केबिनमध्येजाऊन बोलायचं होतं; पण मनातील  कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न  व्यक्तिमत्त्वापुढे बाद झाली.

 ‘‘तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.’’  अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत  सोडायला आल्यावर कर्नल झा हात हातात घेऊन म्हणाले,  ‘‘विसरू नका-वन्स कनेक्टेड, ऑलवेज कनेक्टेड.’’  त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट दहा वर्षांनीही  पाळला अरुणाचलमध्ये भारत-चीन सीमेवर भेटून!

   पँगाँग लेकच्या अलीकडे एका रेजिमेन्टला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेन्ट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून  मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले. आमचा कॉनव्हॉय  मोठ्या गेटमधून आत गेला. चकाचक स्वच्छ रस्ते, क्रूकट  केलेले सैनिक, वातावरणातसुद्धा अदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून  हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य! सारंच  स्वप्नवत.

   इतक्यात एक मुलगा जवळ आला, ‘‘अनुराधा  प्रभुदेसाई तुम्हीच का?’’ मी ‘हो’ म्हटल्यावर तो म्हणाला,  ‘‘मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हांला एक सांगू  का-तुमचा आवाज माझ्या मंगलमावशीसारखा आहे.’’  ‘‘खरं की काय? बरं, ती मंगलमावशी, तर मी अनुमावशी!’’  मी म्हणाले. पापण्या भिजू नयेत, ह्याची दखल घेत तो  म्हणाला, ‘‘मासी, क्या मैं आपके गले लग सकता हूँ?  बहुत अच्छा लगा आपसे मिलकर ।’’ मी म्हणाले, ‘‘अरे  विचारतोस काय, बच्चा? मीच काय ह्या सगळ्या काका  आणि मावशींनापण भेट.’’

   माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला.  सगळ्यांच्या गळ्यात पडत होता. नंतर कळलं, की त्याच्या मावसबहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी  होतं; पण त्याला मिळालेली रजा काही कारणांमुळे रद्द झाली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत  आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक शोधत असणार तो. ह्या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे  आली आणि म्हणाली, ‘‘मासी, आप बड़ी पार्शल हो ।’’  ‘क्यों? क्या हुआ, बेटा?’’ ‘‘वो आपके गले मिल सकता  है, हमने क्या पाप किया?’’ जवळजवळ अर्धा तास ती

काँबॅट वर्दी विसरून सगळेजण आम्हांला भेटत होते. अजब  सोहळा... आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखर घालत  होतो; पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार  वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून  बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्याच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. बीज अंकुरत  होतं. धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता.

   प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग  द्रासला जायला निघालो. तेव्हा कारगिलमध्येशिरताना  लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या चार गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी  गप्पा मारत होते. ‘‘कल आपको इसी रास्ते से वापस जाना  है ।’’ असं तो म्हणाला. ‘‘बढ़िया, कल फिर मिलेंगे ।’’  ‘‘नहीं, कल मैं नहीं रहूँगा । मेरा बड़ी होगा, मतलब मेरा  साथी । लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की  जरूरत पडे, तो यहाँ जरूर आना ।’’

   आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो, तर तोच बच्चा उभा होता. ‘‘अरे तू परत आलास?’’ ह्या माझ्या प्रश्नावर  तो हसून म्हणाला, ‘‘मैं गया ही कहाँ था? मेरा बड़ी बीमार  है, इसलिए मैं कल से यहीं हूँ ।’’ जवळजवळ छत्तीस तास  तो मुलगा तिथे उभा होता.

   ‘अरे, तुझा बड़ी आजपण नाही आला तर?’’ माझ्या ‘१० ते ५’ ह्या ड्युटीच्या चौकटीत हे छत्तीस तास उभं  राहणं बसतच नव्हतं. तो हसून म्हणाला, ‘‘मॅडम, कोई बात  नहीं । वो ठीक होने तक मैं यहाँ खडा रहँूगा- चाहे और दो  दिन भी क्यूँ ना लगे!’’ ‘हे इतक्या सहजतेनं तू कसं बोलतोस?’ या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून  म्हणाला, ‘‘सब कुछ आसान है, मॅडमजी । सिर्फ दिमाग में  डाल देना है ।’’ प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार  असलेला हा वीस-एकवीस वर्षांचा मुलगा!

    २००६ चा लडाख हा एक नवंच रूप लेऊन समोर  आला होता. आभाळच फाटलं होतं. कधीही पाऊस न  पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. बऱ्याच ठिकाणी  नद्यासदृश पाणी वाहत होते. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं. लेहला  सुखरूप पोहोचलो; पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. एकच मार्ग उघडा होता-कर्नल  झा! त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही.  ‘दिमाग में डाल दिया था ना!’ बरोबर पाच  वाजता दिमाखदार वळण घेत कर्नल झा यांची  गाडी प्रवेश करती झाली. 

आम्ही आलो  आहोत, हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी  अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. आमची  अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले  आहेत वगैरे चौकशी केली. ‘‘निसर्गापुढे आपलं काहीच  चालत नाही. उदास होऊ नका. आपके हौसले बुलंद हैं!  कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा. दोन  दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील.’’ असे  ते म्हणाले. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे  पाहून सगळ्यांच्या मनातील मळभ दूर झालं. कर्नल झा  यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल-द्रास या  ठिकाणांकडे निघालो.

   कारगिल- द्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, थ्री पिपल, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे  वाटू लागले. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड  अंत:करणानं ‘पुनरागमनायच’ म्हणत परतीच्या प्रवासाला  निघालो. रात्रीचे दहा वाजले होते. आता तासाभरात लेहला  पोहोचू. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली.  अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक  लागला.

   थंडीमुळे चेहरे झाकलेले तीन जण टॉर्चच्या प्रकाशात,  भयाण वातावरणाला अधिक गडद करत आम्हांला परत  जायला सांगत होते. कारण पुढे खल्सेचा पूल कोसळला  होता. बाहेर मिट्ट काळोख, अनोळखी रस्ता, सोबत दहा तरुण मुली! रस्ता बंद! माघारी जाणं अशक्य, पुढं जाणं  दुरापास्त! एकच आधार-आर्मी पोस्ट!

   पुढे केवळ पाचशे मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेक पोस्ट (T. C. P.) आहे, असं त्या तीन जणांनी सांगितलं,  ‘‘भाईसाब, हमारे चौंतीस लोगों का परिवार आपके हवाले  करते हैं! सिर्फ टीसीपी तक जानेकी इजाजत दीजिए । अगर  कुछ बात न बनी, तो हम वापस जाएँगे ।’’ आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली. गाडीतील  प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. आम्हीही  धैर्याचा मुखवटाच चढवला होता. ‘तुम्ही गाडीतच बसा,  आम्ही आत्ता येतो.’ असे सांगून आम्ही गाडीतून खाली  उतरलो. 

   टीसीपीवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे  थरथरणाऱ्या आम्हांला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार  स्वागत केलं. रात्रीचे साडेदहा वाजले होते. खूप खटपटीनंतर  कर्नलना फोन लागला आणि समोरून आवाज आला,  ‘‘अरे, कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत  होतो. चिंता करू नका. माझा एक बंदा येईल. तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो.’’  रात्री साडेदहापर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून  ठेवणारे कर्नल! ‘सेवा परमो धर्म:’, लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील  ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं. गालावरती  वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या;  जेव्हा समोर उंच, दणकट मेजर आकाश हसतमुखानं सामोरा  आला आणि म्हणाला, ‘‘या माझ्या मागोमाग.’’ का, कसे,  कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात  मागोमाग जायचं होतं.

   एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्यांप्रमाणे  युनिटमधील आठ-दहा जणांनी आमचं जोरकस स्वागत  केलं. आधी आम्हा छत्तीसजणांना वाफाळलेला चहा  आणि गरमागरम भजी खाऊ घातली, वयाप्रमाणे चार  ठिकाणी राहण्याची सोय केली, टेलिफोन लावून दिले.  थोड्याच वेळात पूर्णजेवण तयार केलं. रात्रीचे बारा वाजले  होते. ‘‘आप हमें मिलने के लिए इतनी दूर से, मुंबई से आते  हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए ।’’  सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते.  प्रसन्न, उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक कार्यव्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठायीठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्री आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचवत होतं!  ‘स्वयम्’ मधून ‘कोऽहम्’ असा निनाद उमटत होता!

   लेह आणि १४ कोअर हे आमच्यासाठी एक  समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला  जाण्याची परवानगी मिळत होती. २००७ साली नवीन  कर्नल असतील, ह्याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला  होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का?  सहकार्य करतील का? 

   आम्ही कर्नलसाहेबांच्या केबीनपर्यंत पोहोचलो. तीच  केबीन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला; पण  तीच वृत्ती! कर्नल राणा! कर्नल झा यांनी आमच्याविषयी  त्यांना आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ते आमच्याशी  अत्यंत आत्मीयतेनं बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होते. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे  नवीन रूजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो, तिथलं  भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन-अस्मानचा  फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची  मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी ‘सैनिक’ बनवणं  हे फार जिकिरीचं होत चाललं आहे. मला फार आनंद होत  आहे, की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येत  असता. तुम्ही नेहमी येत जा.’’ आम्हांला ‘सैनिक’ नावाचा  माणूस कळू लागला होता. बघता बघता २००८ साल  उजाडले. माझे वचन पूर्ण झाले होते.

   ‘‘अनुमावशी, ह्या आसमंतात एक सुगंध पसरला  आहे. तुला जाणवताे आहे का?’’ द्रास, कारगिल येथील  युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक-विजयस्तंभ,  तोलोलिंगचा पहाड ह्या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून  बाहेर पडल्यावर भारावलेल्या नि:शब्दतेचा भंग करत  आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भावुक होऊन उद्गारली.  कदाचित तिचं हे स्वगत असावं; पण तरीही मी विचारलं,  ‘‘कसला गं?’’

    भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच, तिचं स्वत:शी  बोलणं चालूच होतं, ‘‘अगं ह्या वातावरणात भारतीयत्वाचा  सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगरमाथा वीरश्रीचा साक्षीदार  आहे. इथल्या मातीच्या कणाकणांत कारगिल युद्धाचा 
रोमांचकारी इतिहास आहे. तो राेमारोमांत जाणवतो आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम,  देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो  का गं? आपलं आणि त्यांचं काही देणं घेणं लागत नाही  का?’’
      
   लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि शेवटी द्रास,  कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून  बोलणारे जवान. त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात,  भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध ल्यालेले, सरहद्दीवर ठाम उभे  राहिलेले आपले जवान! त्यांच्या शौर्याची, धाडसाची,  खडतर साहसाची सतत आठवण राहावी, म्हणून सुरू  केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं पाचवं वर्ष! भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना  निर्माण झाली, हे त्याचंच फलित. ‘याचसाठी केला होता  अट्टहास!’ 
  
    गेल्या पाच वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं, की  तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं निखळून पडताहेत.  लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट एकाकी, रौद्र  आणि हिरवळीचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण  भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती  जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं, की  ‘आपली माणसं’ भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आपले  सैनिक हे हिरे आहेत. त्यांना आपण जपलं पाहिजे.  त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे.

    आम्ही पाच वर्षं रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन  येत आहोत, याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल  ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हांला भेटायला  आवर्जून आले होते. १९९९ मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात, याच्यापरता मोठा  सन्मान तो कोणता?

     आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर  आम्हांला म्हणाले, ‘‘तुम्ही पाच वर्षांचा वादा केलात  आणि तो निभावलात, ह्याबद्दल अभिनंदन; पण माझा  प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो,  तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या. आमच्या तरुण जवानांना भेटा त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हांला  त्यांची गरज आहे. निदान पाच वर्ष तरी कमिशंड ऑफिसर  म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात  तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात! तरुण मुलींना  सांगा, की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू  नका आणि मला वचन द्या, की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते  काम थांबवणार नाही.’’

      वातावरणात नीरव शांतता! त्याचा भंग करत मी  आवेगाने म्हणाले, ‘नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार  नाही’. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकेने जणू कानात हळूच म्हटले ‘तथास्तु’. भासच तो;  पण अंगावर रोमांच उठले, नकळत तोलोलिंगला सॅल्यूट  ठोकला. माघारी वळले ते, ‘ह्या वीरांच्या त्यागाला,  समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी  आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय  नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन’ असे सैनिकांना आश्वासन देऊनच! कारण ते  म्हणतात, ‘माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या ‘उद्या’साठी ज्यांनी आपला ‘आज’ दिला.’

वीरांना सलामी स्वाध्याय कृति | Veeraana Svaasthy Svaadhyaay

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post