कृती | Q (१) (१) | Page 25
1) रूपक कथेची वैशिष्ट्ये :
SOLUTION
१) रूपक कथा आकाराने लहान
२) अर्थघनत्व
३) आशय समृद्धी
४) सूचकता
५) नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता
६) वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो.
2) गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये :
SOLUTION
१) स्वप्नाळू
२) किरकिरा
३) अरसिक
४) चिडखोर
3) पानाची स्वभाव वैशिष्ट्ये :
SOLUTION
१) पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते.
२) गवतपात्याला क्षुद्र मानते.
4) गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह :
SOLUTION
१) चिमणे
२) चिडखोर बिब्बा
३) क्षुद्र
४) अरसिक
५) चिमुकले
कारणे लिहा.
कृती | Q (२) (अ) | Page 25
1) झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण ______
SOLUTION
झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली; कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता.
2) ‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण ______
SOLUTION
'अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही,' असे गळून पडणारे पान म्हणाले; कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी 'आ' सुद्धा केला नव्हता.
3) वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण ______
SOLUTION
वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पाण्यात झाले; कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती.
4) वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण ______
SOLUTION
वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पाण्यात झाले; कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती.
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
कृती | Q (३) (अ) | Page 25
1) बेजबाबदारपणा
SOLUTION
जर, जप, दाब, दार, दाणा, बाब, बाप, बाणा, बेजबाब, जबाब, बेजबाबदार
2) धरणीमाता
SOLUTION
धरणीमाता -
धर
धरणी
रणी
तार
रमा
मार
माता
3) बालपण
SOLUTION
बालपण -
बाल
बाप
बाण
लप
पण
गवताचे पाते स्वाध्याय - Gawateche pate svaadhyaay [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
कृती | Q (४) | Page 26
1) खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा.
कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय
कृती | Q (५) | Page 26
2) खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही?
(अ) ज्ञानी × सुज्ञ
(आ) निरर्थक × अर्थपूर्ण
(इ) ऐच्छिक × अनिवार्य
(ई) दुर्बोध × सुबोध
SOLUTION
ज्ञानी × सुज्ञ
स्वमत.
कृती | Q (६) (अ) | Page 26
1) माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
SOLUTION
माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा. त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावी. परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत... वगैरे वगैरे, असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच, आधुनिक काळातच, घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजांत हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते, तसे आणि तेवढेच खरे आहे, असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते.
2) गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते?
SOLUTION
मी गवतपाते असतो, तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते :
"आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पाहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात. त्या वेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हांला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्हीसुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात. मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो. विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत. त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वत:चेच बरोबर आहे, असे वाटते. समोरचा चुकीचा आहे असे वाटते.
आता हेच पाहा ना. तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हांला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्हांला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो. म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत, असे तुम्हांला वाटते. पण आजोबा, आम्ही आत्ता, या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही.
आता हे सगळे राहू दया. तुम्ही सांभाळून सांभाळून चाला. स्वत:च्या प्रकृतीला जपा.
3) गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.
SOLUTION
हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावर एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली.
पट... पट... पट...
त्यांचा तो पट... पट... पट... असा कर्णकटू आवाज
तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, "अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात! लागलंबिगलं तर नाही ना?"
पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, "काय रे बाळा? तुला त्रास झाला का रे?"
"छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?"
"काय सांगू बाळा! इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना! काय करणार?"
“असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही!"
हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले.
ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पाण्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडेतिकडे झाडांवर पाने सळसळत होती... पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!
ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले. आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला, चला, पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित!
4) खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
‘‘...एक विचारू?’’
उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले.
‘‘हं.’’
‘‘मलाही तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंय... पण..’’
‘‘पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?’’
‘‘...हो.’’
‘‘अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या..’’
‘‘पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?’’
‘‘हो! आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात...’’
...आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या
(गुलमोहर)
SOLUTION
रोप-वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपांत अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदेकानून, नीती-नियम पाळावे लागतात. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील, असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसे मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील, अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही.
रसग्रहण दहावी मराठी
1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
व्याकरण व भाषाभ्यास
कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती :
१. समास :
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा :
(i) प्रतिक्षण
(ii) बिनधोक
(iii) लोकप्रिय
(iv) नेआण
(v) रंगीबेरंगी
(vi) बारभाई.
SOLUTION
(i) प्रतिक्षण – प्रत्येक क्षणी – अव्ययीभाव
(ii) बिनधोक – धोक्याशिवाय – अव्ययीभाव
(iii) लोकप्रिय – लोकांना प्रिय – विभक्ती तत्पुरुष
(iv) नेआण – ने आणि आण – इतरेतर द्वंद्व
(v) रंगीबेरंगी – रंगी, बेरंगी वगैरे – समाहार वंद्व
(vi) बारभाई – बारा भाईंचा समूह – द्विगू
२. अलंकार :
पुढील कृती करा :
1) अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
उपमेय –
उपमान –
अलंकार –
अलंकाराचे वैशिष्ट्य –
SOLUTION
उपमेय – देवाचे नाव
उपमान – अमृत
अलंकार – व्यतिरेक
अलंकाराचे वैशिष्ट्य – उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ आहे.
2) डोकी अलगद घरे उचलती
काळोखाच्या उशीवरूनी (मार्च ‘१९)
अचेतन घटक –
मानवी क्रिया –
अलंकार –
SOLUTION
अचेतन घटक – घरे
मानवी क्रिया – डोके वर उचलणे
अलंकार – चेतनागुणोंक्ती
३. वृत्त :
पुढील ओळींचे गण पाडून वृत्त ओळखा :
द्रव्यास हे गमनमार्ग यथावकाश
की दान भोग अथवा तिसरा विनाश.
SOLUTION
वृत्त : हे वसंततिलका वृत्त आहे.
४. शब्दसिद्धी :
(१) ‘अ’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :
जसे-अरसिक
(i) [ ]
(ii) [ ]
(iii) [ ]
(iv) [ ]
SOLUTION
(i) अविवेक
(ii) अविचार
(iii) अप्रगत
(iv) अवर्णनीय
(२) सं’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :
जसे-संजीवक
SOLUTION
(i) संशोधन
(ii) संपूर्ण
(iii) संभाषण
(iv) संघटना
(३) ‘इकडेतिकडे सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा :
SOLUTION
(i) काहीबाही
(ii) इथेतिथे
(ii) वेळकाळ
(iv) भलीबुरी
५. सामान्यरूप
‘तक्ता भरा:
शब्द – प्रत्यय – सामान्यरूप
(१) गवताचे – चे – ……………..
(२) कपाळाला – …………….. – ……………..
(३) पानाने – …………….. – ……………..
(४) झाडात – …………….. – ……………..
SOLUTION
शब्द – प्रत्यय – सामान्यरूप
(१) गवताचे – चे – गवता
(२) कपाळाला – ला – कपाळा
(३) पानाने – ने – पाना
(४) झाडात – त – झाडा
६. वाक्प्रचार :
पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा :
1) झोपमोड होणे – ……………………..
(अ) मध्ये मध्ये जाग येणे
(आ) गाढ झोप लागणे,
SOLUTION
मध्ये मध्ये जाग येणे
2) चेंदामेंदा करणे – ……………………..
(अ) कुटून टाकणे
(आ) घर्षण करणे.
SOLUTION
कुटून टाकणे
3) कित्ता गिरवणे – ……………………..
(अ) सराव करणे
(आ) वाचन करणे.
SOLUTION
सराव करणे
4) तोंडसुख घेणे – ……………………..
(अ) कुशीत घेणे
(आ) खूप बडबडणे.
SOLUTION
खूप बडबडणे.
भाषिक घटकांवर आधारित कृती:
समानार्थी शब्द लिहा :
(i) माता = ……………………………
(ii) गोड = ……………………………
(iii) पृथ्वी = ……………………………
(iv) तोंड = ……………………………
(v) मालक = ……………………………
(vi) प्रवृत्ती = ……………………………
SOLUTION
(i) माता = आई
(ii) गोड = मधुर
(iii) पृथ्वी = अवनी
(iv) तोंड = मुख
(v) मालक = धनी
(vi) प्रवृत्ती = स्वभाव
जोडशब्द पूर्ण करा
(i) सुख”
(ii) अदला…
(iii) चेंदा…..
SOLUTION
(i) सुखदुःख
(ii) अदलाबदल
(ii) चेंदामेंदा.
पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा: (सराव कृतिपत्रिका-१)
(i) वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे →
(ii) दुसऱ्यावर अवलंबून असलेला →
SOLUTION
(i) वार्षिक
(ii) परावलंबी
२. लेखननियम :
अचूक शब्द निवडा :
(i) पुनारावृत्ती/पुनरावृती/पूनरावृत्ती/पुनरावृत्ती.
(ii) नीर्णय/निर्णय/निणर्य/नीणर्य,
(iii) सर्वांगीण/सर्वांगिण/सर्वागीण/सवांर्गीण.
(iv) हुरहुर/हुरहूर/हूरहुर/हूरहूर.
SOLUTION
(i) पुनरावृत्ती
(ii) निर्णय
(iii) सर्वांगीण
(iv) हुरहुर.
पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(i) मानवि जीवनातले कितितरी वीसंवाद प्रतीबिंबीत झाले आहेत.
(ii) दुरवर जंगलातुन येणारा एक लाकुडतोड्या दीसला.
SOLUTION
(i) मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतिबिंबित झाले आहेत.
(ii) दूरवर जंगलातून येणारा एक लाकूडतोड्या दिसला.
पारिभाषिक शब्द :
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा :
(i) General Meeting
(ii) Part Time
(iii) Lift
(iv) Synopsis
(v) Absence (सराव कृतिपत्रिका-१)
(vi) Dismiss, (सराव कृतिपत्रिका-१)
SOLUTION
(i) General Meeting – सर्वसाधारण सभा
(ii) Part time – अंशकालीन/अर्धवेळ
(iii) Lift – उद्वाहन यंत्र/उद्वाहक
(iv) Synopsis – प्रबंध रूपरेषा/सारांश
(v) Absence – गैरहजेरी
(vi) Dismiss – बडतर्फ.
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 7 गवताचे पाते 1
अकारविल्हे/भाषिक खेळ :
(१) पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा :
रूपांतर → स्वप्ने → अंतर → मजूर
SOLUTION
अंतर → मजूर → रूपांतर → स्वप्ने.
गवताचे पाते Summary in Marathi
पाठाचा आशय एका गवताच्या पात्याची ही कथा आहे. गवताच्या चिमुकल्या पात्यासारखीच कथा ही चिमुकलीच आहे.
हिवाळ्याचे दिवस होते. गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत गाढ निद्रा घेत होते. ते गोड गोड स्वप्नांच्या सुखद लहरींवर निवांत तरंगत होते. तेवढ्यात झाडावरून पिकलेली पाने पटापटा पडू लागली. जमिनीवर आपटताना सर्व पानांचा पट-पट-पट असा एकत्रित होणारा आवाज आसमंत व्यापून टाकत होता. तो संपूर्ण आवाज इतका कर्णकटू होता की त्या अप्रसन्न आवाजाने चिमुकल्या गवतपात्याची झोपमोड झाली. शिवाय, ज्या सुखस्वप्नांत ते पार ‘डुंबत होते, त्या सुखस्वप्नांचा चुराडा झाला. या गोष्टीचा त्या गवतपात्याला खूप संताप आला, त्या पात्याने संतापाच्या भरात गळणाऱ्या पानांना भरपूर सुनावले. त्याच्या मते, गळणारी पाने कटकट करतात. त्यांच्या आवाजाच्या दंग्याने माझा आनंद नष्ट होतो.
त्यावर गळणाऱ्या पानाने त्या पात्याला क्षुद्र ठरवले. जमिनीवर लोळणाऱ्या पात्याला उंच झाडावर सळसळण्यातला उच्च दर्जाचा आनंद कधीच कळणार नाही. पाते क्षुद्र पातळीवरच जगत राहणार, असा गळणाऱ्या पानाचा दावा होता.
गळणारे पान थोड्याच अवधीत मातीत मिसळून गेले. त्याच्या कणांमधून एका नवीन गवताच्या पात्याने जन्म घेतला, ते आनंदाने डोलत राहिले. थोड्याच दिवसांत हिवाळा आला. ते नवीन जन्मलेले पाते थंडीने कुडकुडू लागले. ऊब मिळवण्यासाठी ते धरणीमातेच्या कुशीत शिरले आणि हळूहळू झोपी गेले. झोपेत ते सुखस्वप्नांच्या लहरींवर आनंदाने तरंगू लागले. पण पडणाऱ्या पानांच्या गदारोळामुळे त्याची झोपमोड झाली. त्याची सुखस्वप्ने भंग पावली. आता ते पाते गळणाऱ्या पानांना संतापाने दूषणे देऊ लागले.
रूपककथेतून सुचवलेला अर्थ या रूपककथेतून माणसांचा स्वभाव अत्यंत सुंदर रितीने व्यक्त केला गेला आहे. या कथेत काय घडते पाहा. झाडावरून गळून पडणाऱ्या पानाला आपण उच्च स्थानावर राहतो आणि पाते क्षुद्र पातळीवर राहते. आपण उच्च दर्जाचे आहोत आणि गवतपाते मात्र अत्यंत खालच्या दर्जाचे आहे, असे वाटते. याउलट गवतपात्याच्या बाबतीत घडते. आपण खूप सुखी समाधानी जीवन जगत आहोत, आपण भाग्यवान आहोत आणि म्हणून उच्च दर्जाचे आहोत. जीवनातल्या सुखाची गोडी त्या कटकट्या, किरकिऱ्या पानाला. कधीच कळू शकणार नाही, असे त्या गवतपात्याला वाटते.
गळून पडलेले पान मातीत मिसळते आणि त्या पानातूनच नवीन गवतपाते निर्माण होते. आता या गवतपात्याला (म्हणजेच पूर्वीच्या पानाला) गळणाऱ्या पानांचा राग येतो. त्याला गळणारी पाने कटकटी, किरकिरी आणि म्हणून जगण्यातला आनंद न कळणारी आहेत, असे वाटते.
सर्व माणसे केवळ स्वतःच्या नजरेतूनच सर्व जगाचे मूल्यमापन करतात. मुलांना आपले आईवडील कटकटी वाटतात. तर, मुलांनी ताळतंत्र सोडला आहे, असे आईवडिलांना वाटते. आपण तरुणपणी कसे वागलो, हे आईवडील विसरतात. आता तरुण असलेली मुले मोठेपणी स्वतःच्या आईवडिलांसारखे वागतात. एकंदरीत, सर्व मानवी समाजात हे असेच घडते.
गवताचे पाते शब्दार्थ
संदेशपरता – संदेश देण्याचा गण.
कर्णकटू – कर्कश, कठोर.
चिमणे- लहान, कोमल, सुकुमार.
संजीवक – चैतन्य देणारे, नवीन जीवन देणारे,
चेंदामेंदा – ठेचून ठेचून केलेला चुराडा, चक्काचूर.
पैलू – बाजू.
स्वच्छंदी – मनाच्या लहरीनुसार वागणारा.
कित्ता – चांगले अक्षर काढता यावे म्हणून सराव करण्यासाठी केलेला आदर्श अक्षरांचा नमुना. (हे अक्षरांचे नमुने पुन्हा पुन्हा गिरवल्यामुळे अक्षरलेखन योग्य त-हेने करता येते. यावरून, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याला ‘कित्ता गिरवणे’ असे म्हणतात.)
गवताचे पाते वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
गिरक्या खाणे : स्वतःभोवती गोल गोल फिरणे.
मातीत लोळणे : क्षुद्र पातळीवर जगत राहणे.
जीव खाणे : खूप त्रास देणे.
कपाळाला आठी घालणे : त्रासिक भाव व्यक्त करणे. (एखादया गोष्टीचा)
चेंदामेंदा करणे : (एखादया गोष्टीचा) चिरडून चिरडून चक्काचूर करणे,
मातीत मिसळणे : जीवनाचा अंत होणे.
तोंडसुख घेणे : टीका करून, टोचून बोलून आनंद घेणे.
कित्ता गिरवणे : आधीच्या प्रमाणेच पुन्हा पुन्हा वागणे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे.
अंतर कायम असणे : पूर्वीसारखाच फरक राहणे.
गवताचे पाते स्वाध्याय - Gawateche pate svaadhyaay [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
वि. स. खांडेकर (१८९८ ते १९७६ ) :
कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथालेखक. १९७४ साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मयसेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे ‘कांचनमृग’, ‘दोन ध्रुव’, ‘उल्का, ‘दोन मने’, ‘हिरवा चाफा’, ‘रिकामा देव्हारा’, ‘पांढरे ढग’, ‘पहिले प्रेम’, ‘जळलेला मोहोर’, ‘ययाति’, ‘अमृतवेल’ आणि ‘अश्रु’ या कादंबऱ्या; ‘वायुलहरी’, ‘चांदण्यात सायंकाळ’, ‘अिवनाश’, ‘मंदाकिनी’ इत्यादी mलघुनिबंधसंग्रह; ‘वनभोजन’, ‘धुंधुर्मास’, ‘फुले आणि काटे’, ‘गोकर्णीची फुले’, ‘गोफ आणि गोफण’ हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्येयांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांतून केली. ‘सुवर्णकण’, ‘क्षितिजस्पर्श’, ‘वेचलेली फुले’ हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. यांपैकी ‘सुवर्णकण’ हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकांतून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे.
बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. िवज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यांपैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थक्षणोक्षणी अंशत: कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच.
हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट...पट...पट... त्यांचा तो पट...पट...असा कर्णकटू आवाज... तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, ‘‘पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की!’’ पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, ‘‘अरे जा! चिडखोर बिब्बा कुठला! मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही, बेटा! हे गाणं चाललंय!
जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही!’’ हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले-झोपू लागले. पण पुन:पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती...पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती! ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वत:शीच पुटपुटले, ‘काय ही हिवाळ्यातली पानं! जीव खाऊन टाकला यांनी अगदी! केवढा हा कर्णकटू आवाज...छी छी छी! माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी!’
अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टींतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्यया कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे; पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते काय? ...आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते?
तीही जुना कित्ताच गिरवत बसते! बाह्य स्वरूप कितीही बदलले, तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते अाणि पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वत:ला कल्पून त्याचे सुखदु:ख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर यादोघांच्या स्थानांची अदलाबदल केली, तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का?
गवताचे पाते स्वाध्याय - Gawateche pate svaadhyaay [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |